तुम्ही का लिहलं पाहिजे?

बोळे फेका
..
आसपास घडणार्या प्रत्येक घटनेकडे, माणसांकडे आणि स्वत:कडे शांततेने पाहता यायला हवं असेल तर आधी चंद्रावर जाऊन यायला हवं. लोकं, तुम्ही, तू आणि मी का आहोत अशांत माहित्ये? कारण आपलं अवाक होणं संपलेलं आहे आता. वितळणं संपलेलं आहे. विझलेलं आहे जे अगोदरच आहे वांझोटं आहे आणि म्हणून संताप आहे बाळसेदार. तो वाळत नाही.
सगळ्या घटना शब्दांत आणि छायाचित्रांत येऊन बंद होऊ लागल्या आहेत. माहितीच्या स्फोटाने भाजलेले मेंदू घेऊन देवचार गल्लोगल्ली फिरतात. कापायचं कोणाला असा प्रश्नं पडलाय त्यांना. रक्ताऐवजी पहावं त्याच्या नसांमधून वाहतेय माहिती माहिती आणि माहिती. माहिती सतत उपलब्ध आहे त्यामुळे आणि त्यातून प्रश्नं पडतात लाखो अजून माहिती मिळण्यासाठी. त्यात उत्सूकता आहे का? अजून माणसं जिवंत आहेत की भास आहे हा सगळा?
आपण जे लिहतो त्याचे बोळे करून फेकून देता येण्याची क्षमता यायला हवी. माझ्यात ती नाही. च्यायला आपण तेच बोळे उघडणार आणि सेलिब्रेट करणार आतल्या सुरकुत्या. मी भुक्कड आहे आणि भुक्कडच राहणार अशी भीती वाटते कधीकधी. सगळं विकायचंय आपल्याला शार्प करून सेलेबल करत करत. त्यात मी असणार आहे का? तू.. तू जे काही विकतो आहेस.. विकते आहेस त्यात तू आहेस का? बोळे फेकत रहा
अत्ता या क्षणापासून तुला विसरून जायचं आहे कुणी काय लिहून ठेवलं होतं कुणी काय करून ठेवलं होतं याआधी ते. विसरून जा, शेक्सपिअर नावाचा प्रेमाचा नकाशा सगळेच घेऊन फिरत आहेत ते. तुला त्याच रस्त्यांवर का बरं चालायचंय? जिथे करोडो पाऊलखुणा रोज फाकवतच राहतील तो रस्ता. विसरण्याची गरज आहे कुणी काय करून काय लिहून थोर करून ठेवलंय याआधी ते. तुला खरंच विसरण्याची गरज आहे तूही काय करून ठेवलं आहेस आधी ते.
घे ते सारे नकाशे, उचल ते लिखाणातले मैलाचं दगड आणि बोळे करून टाकून दे. थोर लेखकांच्या कथाबोळ्यातून उंच उंच होणारा डोंगर बघ. तो अवाक करणारा आहेच. पण त्याचा आकार डोक्यात घेतल्याशिवाय काय खरं नाय बघ.. हे फार सिरीयस्लि घेतलंस तर तोच आकार तुझ्या मेंदूच्या गोट्या करून त्यांना शंभर दिशांना फेकून देण्याचंही सामर्थ्य बाळगून आहे हे विसरू नकोस. या साहित्याच्या डोंगर पर्वतांकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून तुला परत मागेही जाण्याची सोय आहे. हातात कोणताही नकाशा न घेता परत जा. तुझी वाट तुला सापडेल. लिहीत रहा. बोळे करत रहा. बोळे फेकत रहा

बिनधास्त
..
आपण काही लिहितो, चितारतो, म्हणतो, गातो ते दाखवण्यासाठीच ! पण ते लोकांसमोर आणताना भीती बाळगता कामा नये, हे मी माझ्या काही खास मैत्रिणींकरिता लिहीत आहे. लोकांपुढे अमुक ते सादर करताना एखाद्याचा 'ok go ahed' असा सिग्नल पुरेसा आहे. पण ते चार भल्या, विचारी कलाकार माणसांना अजिबात दाखवू नये. आईला आपलं बाळ कसंही काळं कुंद्र पारोसंओरोसं असलं तरी प्रिय असतं. त्या अपत्यामधलं आणि आईमधलं कनेक्शन तेच जाणत असतात. दुसर्या आईकडे ते बाळ न्याल तर तर ती तुमच्यातल्या; तुमच्या मुलातल्या खूप उण्या जागा दाखवील आणि मग हिरमोड होईल. आपल्या म्हणण्या असण्याबाबत आत्मविश्वास महत्वाचा आहे. बाहेरच्यांना कधी वेळ असणार मग ते कधी बघणार मग त्यावरून आपण ठरवणार की हे लिखाण, गाणे इ. पुढे न्यायचं की नाही? नका असं करू. मी वेडंवाकडं मला हवं तसं माझ्यासाठी लिहते. त्याला मी सरळ समजते. लिहायला मजा येते म्हणून लिहते.
समोरच्याला चांगलंच वाटेल, ते शाब्बास म्हणतील म्हणून तसं भीत भीत लिहत राहिलो तर संपलंच. आपल्या कामाला फक्त आपल्या सर्टिफिकेटची गरज असते. फक्त आपणच असायला हवं या प्रोसेसच्याआत हलणार्या प्रत्येक अणूरेणूमधे. बिनधास्त लिहा, नाचा, गा, लोळा तुमच्या आवडीच्या चिखलात मळून जा..आपटा. धोपट मार्गांना धोपटा आणि वहिवाटांवरूनच लेखणी टेकत टेकत वाकड्या तिकड्या वाटांवर निघा. टीका करणार्यांबद्दल ममत्वही बाळगा. टीका करण्यासाठीही त्यांना काही काळ तुमची सोबत करावी लागेलच ना !
..
आपण का लिहलं पाहिजे?
..
लिहणं ही एक खूप महत्वाची प्रक्रिया आहे. कुणासाठीही, कारण शब्द पोटातून बाहेर पडतात. जसं.. तुम्ही गर्दीत असता आणि अचानक तुमचा हात सोडून तुमचं मूल गायब होतं तसंच कित्येकदा आपल्याला जे वाटतं, सुचतं त्याची नाळ पकडून जन्मलेले शब्द जराश्या दिरंगाईत हात सोडून जातात. शब्दांंना ठाऊक नसतात लिहणार्याचा हात पकडून न ठेवण्यातले धोके. मग ते भरकटतात आणि हरवतात. लिहणार्याचं मन कासावीस होतं. तुम्ही त्या मुलाला शोधायला लागता. पण विचारांच्या केऑसमधे नक्की कोणत्या दिशेने ते शब्द धडपडत पळून गेले ते समजत नाही. ते भेदरलेलं मूलही भांबावून गर्दीत मधेच थांबलेलं असतं तुम्ही नक्की कुठून तरी येणार या विश्वासाने. त्याचाही धीर सुटत चाललेला असतो. ते मूल सापडण्यासाठी लिहलं पाहिजे. तोच एक मार्ग आहे म्हणून.

Comments

  1. चार पाच वेळा वाचल्याशिवाय झिरपतच नाही इतक्या छान लिखाणाला प्रतिक्रिया देण्याची कुवत हवी न ? सलाम मनापासून

    ReplyDelete
  2. Thanks😊एवढेच म्हणेन

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलय तुम्ही. मनात असणार सगळ ओठावर कुठ येत. जमतच नाही. प्रयत्न नक्कीच करणार तोच एक मार्ग आहे म्हणुन.

    ReplyDelete
  4. बस्स नेहमी सारखचं अप्रतीम

    ReplyDelete
  5. You write so different ... Something that i can easily connect but not capable of writing in the same tone ..Your articles are for the next generation and for our generation to understand them ... Good luck ... Is this only one one article ? would love to read more ...even from facebook

    ReplyDelete
    Replies
    1. yes this is the first one on this blog. Now I will stick to this platform. Atleast I will try to. thankd for reading priya. love you.

      Delete
  6. परफेक्टं...��������

    ReplyDelete
  7. Great. Thanks for writing. Appreciate. Good that you started to write blog and was very much needed. All the very Best.

    ReplyDelete
  8. धर्मवीर पाटील28 October 2017 at 05:23

    खूप छान लिहिलं आहे! लिहू इच्छिणाऱ्या लोकांना ऊर्जा मिळेल असं!

    ReplyDelete

Post a Comment