गुडबाय मि. रोतलु

प्रिय,
( हे संबोधन फार मनाला लाऊन घेऊ नको बे.. नाहीतर मी तुला प्रिय म्हणाले म्हणून तू परत रोमियो मूडमधे जात त्या शब्दाकडे दोन दिवस बघत बसशील. मला आस्था आहे तुझ्याविषयी. प्रिय आहेस तू. तुला गमवायचं नाही मला म्हणून हा अखेरचा प्रयत्न. )
सगळ्यात महत्वाचं. तू मला सलग दहा दिवस फोन केलेस म्हणून मी तुला अकराव्या दिवशी फोन करेनच अशी अपेक्षा करणं बरोबर असेलही. पण मी इतकी पर्फेक्ट कधीच नव्हते. फोन करावासा वाटतोही पण जाऊंदेना असंही होतं. का असं होतं सांगते. मला ना सतत प्रेम या विषयावर बोलायला कंटाळा येतो. माझं तुझ्यावरच प्रेम महिरपी कंसात आकर्षण, सेक्स, साखरपुडा, लग्न असं कधीच नव्हतं. मग मी त्या विषयात तुझ्याइतकं गढून नाही नं बोलू शकत. सतत हां हू होहो नाही नं करू शकत. चहा थंड होतो माझा.
ओळख झाल्यापासून तुझ्याबाबत मनात निर्माण झालेल्या जागेला मी काही नाव देण्याचा, त्याला कुंपण घालण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणूनच आजही तुला वाटतं माझ्याशी बोलून हवेशीर प्रसन्न. त्या जागेच्या सीमा निश्चित करून तिथे मालकी दाखवत कुलूप ठोकण्याचा प्रयत्न का करतोयस ? मग मी पळायला लागते. कितीतरी विषय आहेत बोलण्यासारखे. मला बघण्यासाठी माझ्या मागेमागे धावत धावत येत होतास.. हा फ्लॅशबॅक सतत. सतत उगाळण्याची काय गरज ? किती वेळा ऐकू तेच तेच तेच तेच. मला माहीत आहे. पुढे पुढे पळणारी मीच तर होते नं. लगातार फोन आणि मग त्यात सतत भावूक होणं. ऑकवर्ड होतं मला. मी हो का नाही म्हणाले हे तूच सांगत बसणं. घड्याळ्याच्या पेंड्युलमसारखा टाकटूक टाकटूक इथून तिथे तिथून इथे येणारा एकच विषय- तुझं माझ्यावरचं प्रेम. तिच्याआयच्या गावात त्या प्रेमाच्या..
गहिर्या प्रेमाची कांडरून खरूज करायची मग बसायचं त्याला कुरवाळत. मी का पाहू हे सगळं? फोनच्या पलिकडे माझे डोळे घड्याळावर. मला चहा प्यायचा असतो नेमका तेव्हाच येतो तुझा फोन आणि मी तो घेते. तुझं नाव पाहिलं की माझ्या कपाळावर आठी येते पण मी फोन घेते कारण मला माहीत आहे, की तू नाराज होशील. तुला टाळणं बरोबर नाही. मी किती चांगली. पण तू इतका बिचारा.. माझ्या मित्राने इतकं बिचारं असणंही मला नाही आवडत. समोरची नाही म्हणाली तर दुखेल. पण नव्या संधी शोधणारे मित्र मला जास्त आवडतात.
पाण्याची तहान लागली तर इतकंही घटाघटा पाणी पिऊ नये रे की त्यातच बुडून जायला होईल. तू तर मलाही तुझ्या त्या गजलभर्या प्रेमसागरात बुडवायच्याच तयारीत. अरे मेल्या किती दिवस ऐकू? किती दिवस? लग्नबिग्न ज्याच्याशी करायचं होतं ते केलं मी दणकून माझ्या मनासारखं. माझाही प्रेमभंग झाला होता. त्यात काय एव्हढं. पेलता आलं पाहिजे. तो नाही म्हणाला. मी लाथ मारली त्या विषयाला. तू तसं केलं नाहीस कारण तुला मला गमवायचं नव्हतं. मग जे कमवायचंय ते काय हे का कळत नाहीये अजून तुला?
आयुष्य जगणं म्हणजे एक अॅडजस्टमेंट आहे. ( हे माझ्या डोक्याची मंडई करणारे डायलॉग्ज मी फार काळ ऐकू शकणार नाहीये, असं फाडकन बोलता येईल मला पण...) आपलं आयुष्य म्हणजे अॅडजस्टमेंट असेल तर त्याला आपण जबाबदार आहोत. आपण अन्य सुंदर मुलींकडे का नाही बरं पाहिलंत? तसंच मुली आणि आयुष्य हे समानार्थी शब्द नाहीत. प्रेम झालं त्यांच्यासोबत लग्न करणारे अख्खावेळ डान्स करत असतात का? बौळट. सॅंपल आहेस खरंच.
सकाळी एक फोन, दुपारी एक संध्याकाळीही ! आपण विक्रम आहोत भले पण समोरचा चक्रम आहे हे इतक्या वर्षांनीही तुला कळू नये? हाहाहा. यातलं विनोदाचं गुलाबपाणी कधीही उडून जाऊ शकतं माझ्या दोस्ता. मित्रांनी कधीही फोन करावा. कधीही. बिनधास्त. तोंडात फक्त प्रेमाचं चिंगम नको बास ! मी चक्रमसारखी वागले तर बेक्कार बोलीन बघ.. म्हणून हे पत्र खरडून काढलं. मनातलं कुठेतरी बाहेर यायला हवं होतं. तुला फड्डाफ्फड बोलले तर तू रडशील. शिट्ट.
प्रेम काय असतं शेवटी? जी व्यक्ती आपल्याला खूप आवडली होती तिच्यादृष्टीने का नाही पाहता येत त्याकडे छानसं. मला खूप आवडेल आपण कॉफी प्यायला गेलो तर. काहीच नाही बोललो तर.. कधी पोटभर गप्पा मारून आपापल्या घरी परतलो तर. निवांत होण्यासाठीही भेटावं, हसावं. नव्या आठवणी बनवाव्यात. त्यावर बोलावं. मोकळ्या कराव्यात वाटा ज्या खास असतात आपल्यासाठी. घुसमट होते माझी तुझ्या त्या माझ्यावरच्या असफल प्रेमकहाणीचे रीपीस्ट ऐकताना.
मी चहा प्यायले का? तो गरम आहे का? कोमट झालाय की थंड? मी कोणत्या रंगाचा ड्रेस घातलाय? माझ्या मुलाने हॉटेलमधलं खाल्लं, का? असं बरोबर नाही. त्याने वेळेत घरंच ताजं खाल्लं पाहिजे, आयशप्पत. मला मित्र हवाय आई नको. माझा मूड खराब आहे, का, नवर्यासोबत भांडलीस की तो भांडला तुझ्याशी, नवराबायकोची भांडणं म्हंजे अळवावारचं पाणी. नकोना नको नको यार. आम्ही नवरा बायको कुत्र्यामांजरासारखी भांडू, जीव घेऊ एकमेकांचा. पण बाहेर मला नवे विषय हवेत की नाही काही. तू कशाला लोड घेतो? तुझी काळजी म्हणून असं सांगणं तुझं. किती ते असीम प्रेम. आवर रे तुझ्या लाटा. घरी पोहोचले आहे की नाही? बाहेर पडताना कायम सुट्टे पैसे घ्यावेत. चावी विसरले.. अं ओह असं.. का अशी कशी तू विसरलीस चावी? आणि काय बोल. आणि काय बोल. मूड खराब का आहे तुझा? माझा नवराही मला हे काही विचारत नाही. चीडचीड होते यार. स्वत:वरतीच.  का मी अपमान करू शकत नाहीये तुझा. तुला नकार देऊन जबर्या दुखावलं होतं एकेकाळी ह्याचं गिल्ट 
का काढू शकत नाहीये.. का इतके चांगले आहोत आपण ? अमम मी म्हणजे. 
हे पत्र वाचल्यावर तू परत जखमी होशील. पण मित्र म्हणून धडधाकटपणे आपल्यातल्या नात्याकडे पाहू शकत असशील तर ठीकाय. विचार करून फोन कर नाहीतर गुडबाय. मी तुझ्या आयुष्यात नाही म्हणून नैराश्याने वर्षानुवर्ष गाभण राहिलेलं तुझं आयुष्य खतम करण्याविषयक तू जे काही मला आडून आडून सांगत असतोस.. तर प्लीज गो अहेड. माझ्यावर त्याचा काही परीणाम होणार नाही. मला माझ्या आयुष्यातले बरेचसे विषय खतम करायचे आहेत. आयुष्य सुंदर आहे ह्यावर पूर्ण भरौसा आहे माझा. 
संपल.



Comments

  1. भारीच की!!
    हे नक्की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी सोडायला हवी!

    ReplyDelete
  2. छान! खूप दिसांनी ब्लॉगवर वाचलं. योग्य लिहिलं आहे. सहानुभतीतून प्रेम निर्माण होत नाही! भिकेच्या काटोर्यात प्रेम पडत नाही!😊😊😊

    ReplyDelete
    Replies
    1. हो. खूप ताणलं की जी काही आस्था ममत्व आहे तेही संपून जातं.

      Delete
  3. खरंय अगदी.. मागचं पाऊल उचलल्याशिवाय पुढे जाता येणारच नसतं!माणसं नात्यांच्या गुंत्यात अडकत राहतात,अडकवत राहतात. वेळीच बाहेर पडायला हवंय यातून. शेवटी प्रेम हासुद्धा गाळच - ओढत राहतो आतआत सतत.

    ReplyDelete
  4. प्रेम कितीही असलं तरी ते सारख उगाळत बसण्याची गरज नसते. रेखो तू जे लिहिलंय ते थोड्या फार फरकाने बऱ्याच जणांचं होत. वेळीच सावरायला हवं नाहीतर आयुष्य गटार होत जुन्या आठवणींचं
    पुन्हा एकदा thanku मस्त लेख

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्यावर जी व्यक्ती इतकं प्रेम करते त्यास दुखावणं आणि हे सांगणं की व्यक्त होऊ नकोस, हेही फार जीवघेणं आहे. सोपं नाही ते. ती वेळ आपल्यावर येऊ नये ह्याची समोरच्याने काळजी घ्यायला हवी.

      Delete
    2. एक नंबर गो ...पोरी !

      Delete
    3. एक नंबर गो ...पोरी !

      Delete
  5. hi, follow karto me tumch likhan facebook var, thank you for this. tumchya lekha madhla "to" mazyat suddha hota. It helped me.

    ReplyDelete
    Replies
    1. तो जो कोणी आहे ना तो प्रत्येकात असतो. तो माझ्यातही आहे. मग माझंच मला असं सुनवावं लागतं कधीकध नात्याचे नवे आयम पाहण्यासाठी. :)

      Delete
  6. किती वर्णन करु... प्रत्येक शब्द ओळ वाक्य असं वेगळं धरुन गहिरा अर्थ लावत बसावंस वाटतं... ईश्वराने इतकं भरभरुन दिलंय रेणुके तू खूप खूप मोठ्ठी लेखिका हिणार ह्यात शंकाच नाही तुझा झोका ऊंच ऊंच आभाळा पर्यंत जावो हेच मग्न सर्वेश्वराला..👍👍👍👌💐

    ReplyDelete
  7. रेणुका मॅडम
    तुम्ही प्रेमभंगाच्या दुखातुन स्वताला कस सावरल ह्या विषयावर लेख लिहिला आहे का???????
    प्रेमभंगाच दुख कस सावरतात ह्यावरचा तूमचा उपदेश खरचं खूप कामी येईल बर्याच जणांना specifically मला

    ReplyDelete
  8. Match n mismatch. सगळीकडेच असतं. काय किती ताणलं जातं यावर नात्याचा success ठरतो. अनेक पदर असतात प्रत्येक नात्याला. कुठल टिकवायच हे आपल्या comfort leve . वर अवलंबून असतं

    ReplyDelete
  9. Match n mismatch. सगळीकडेच असतं. काय किती ताणलं जातं यावर नात्याचा success ठरतो. अनेक पदर असतात प्रत्येक नात्याला. कुठल टिकवायच हे आपल्या comfort leve . वर अवलंबून असतं

    ReplyDelete
  10. काही दिवसांनी नक्कीच हा धडा सहावीच्या यत्तेला येणार, यायलाच हवा. ;)

    ReplyDelete
  11. 👍👍👍👍👍👌👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment