इथे छत्री म्हणजे तुमचा माझा पूर्वग्रह हं..

को असतात सततचे प्रश्न कुणालाही. का, कुठे, कधी, कशाला, केव्हा, कुणासाठी, कुणामुळे, कधी कधी, कशाचे. चाळणीसारखी माणसं. शुद्ध, अशुद्ध करत राहतात एकसारखी. चाळत चाळत चाळत मरतात एक दिवस. अमकं बरोबर तमकं एकदम बरोबर. हे चूक आणि ते म्हणजे पापचूक. त्यांच्या अॅनालेटिकल स्वभावाचा हेवा वाटता वाटता अचानक आपणच आपणास बरे वाटू लागतो. एक बाई आहे आमच्या माहितीतली. तिला सगळ्याचाच त्रास होतो. शेजारी दरवाजाच जोरात लावतात. तमके मोठ्यानेच बोलतात. नवरा घोरून घोरून रात्री जीवच घेतो. फलाणीची फोडणीच जळते, मला आतल्या रूममधूनच वास कळतो बरोब्बर जळलेल्या हळदीचा..
चड्डीची घडी ही अशीच घातली गेली पाहिजे नाहीतर जग बुडेल. सुट्टीत मुलं रात्री बारापर्यंतच क्रिकेट खेळतात. ही काय ढॅण ढॅण गाणी लावलीत, याला काय गोडवा आहे. सोलकढीला मुताची पण चव नाही. अमक्याने ५० पुस्तकंच वाचलेली नाहीत ह्याच्या यड्याच्या गांडीत काय अक्कलच नाही. तमकी फेसबुकवर उगाच दहा दहा वर्षांपूर्वीचे फोटो लावते. ढमकीला एक साधी फुसणी कविता काय जमत नाही आता करूदेत काही पोस्ट मी तिथ्थेच कोथळा काढते. अमका तो इतके पोस्ट का लिहतो रोज रोज, ठमक्याला सामाजिक पिच्चर तेवढे बनवायचे असतात. अवॉर्ड्सच गणित असतं सगळं. इ. इ. का नाही राहू शकत आपण थंड? का नाही आपल्याला सहन होत दुसर्याच त्याच्याचसारखं असणं. का घुसमटता आपण समोरच्याच्या श्वास घेण्याने?
आपला माज आपल्या घामटलेल्या कपड्यांसारखाच उतरवावा लागतो एक दिवस. आपल्याच दोन डोळ्यांना पहावं लागतं एकाकीपण. प्रेम लावणारे सारे विटून फिसकटून जातात पाणी पडलेल्या चित्रावरच्या रंगासारखे. रिकामी फोटोफ्रेम कुणीतरी भेट देऊन जातं फक्त.
..
पावसाची वाट सगळेच पाहतात. पाऊस पडला की सगळ्यांना गारेगार वाटतं. अगदी पावसाच्या पाण्याने झोपडीवाल्याची दाणादाण उडवलेली असली तरी त्यालाही किंवा ५० व्या मजल्यावर ५० कोटीच्या घरात राहणार्या धनाढ्य माणसालाही पावसाची आस असते. पावसात भिजायला आलेली माणसं जेव्हा आकाशाकडे चेहरा करतात. तेव्हा डोळे घट्ट मिटले जातात. चेहर्यावर टोचणार्या थेंबांचं अतीव सुख विलगलेल्या ओठांमधून झिरपताना दिसतं. अशा भिजलेल्या सगळ्या चेहर्यावरचे आनंद तंतोतंत जुळतात.
निवांतपणा हवा असतो. आवाज ऐकायचा असतो थेंबांचा. पहिल्या पावसात सगळ्यांची नाकं मातीचा ओलसर चंदन घुसळलेला वास घ्यायला बाहेर येतात. चूक बरोबर वागणारी, उंचखुजी, पुस्तकं वाचणारी, रद्दी घेणारी विकणारी, खोल पाण्यात सूर मारणारी आणि लाटांचं भय वाटतं म्हणून किनार्यापासून अंतर राखत लांबूनच सूर्यास्त पाहणारी सारीच मस्त असतात. पावसाचे थेंब झेलायला कधी सर्वांसमोर तर कधी कुणाच्या नकळत खिडकीतून हात बाहेर काढतात. खूप पाणी प्यायलेल्या सुरकुतलेल्या कुठल्याही हाताला एक प्लेट भजी आणि एक कटिंग चहाची हाव असते. आशा असतात इवल्या इवल्या प्रत्येकाच्या. थोडी हवा, थोडा पावसाचा हबका, थोडं प्रेमाचं खतपाणी मिळायचा अवकाश, भरगच्च झाडासारखा वाढावायचा असतो हरेकाला आपला आनंद.
आपण सगळे थोड्याबहुत फरकाने सारखेच असतो. कुणी कमी भिजतं तर कुणी जास्त. पण कोरडं मात्र कुण्णी कुण्णी राहत नाही.




तात्पर्य : समोरच्याबद्दल पटकन मत बनवणं म्हणजे एक झाड कापून ती जागा ओसाड बनवल्यासारखं आहे. म्हणूनच पाऊस कमी पडतो. किंवा तो पडतो पण तुम्ही आपली छत्री काही सोडत नाही असं..

Comments

  1. सुंदर लिहिते आहेस.

    ReplyDelete
  2. जी लोकं फेसबुक च्या भिंती नुसत्या scroll करत जातात त्यांच्या मनातल्या exact भावना असणार या, कारण इतर लोक्स कॉमेंट रुपी पानाच्या पिंका टाकत च असतात...

    सुंदर रेणुका
    मनकवडे पणा तो हाच का?

    ReplyDelete
  3. क्या बात है रेणूका एकदम ढासु आणि जबरी लिहिलय..
    तुजी शब्दांची निवड मात्र फार चवदार असते..
    सोलकढी सारखी..

    ReplyDelete

Post a Comment