ब्लॅंक कॉल मॅजिक. तवा गरम

मिस कॉस्ल ब्लॅंक कॉस्ल देऊन समोरच्याचं हॅलो हॅलो हॅलो ऐकताना इथे आपण गरम होणं मी फार एंजॉयच केलंय. घरी अवाढव्य टेलिफोन बिल यायला लागलं तसे घरचे दातओठ खाऊ लागले. मग त्यांनी नंबर पॅडला एक चौकोनी लॉक आणून बसवलं. ते सुरीने सर्वबाजूंनी सोडवून रात्री ब्लॅंक कॉलमधून वास मारणे प्रकार मी करतच होते. सकाळ झाली की ते गमने चिकटवून ठेवायचं असं चाललं होतं. बिल काय कमी होईना. काय करता.. कार्यकर्त्यांची संख्या विपुल असल्याने त्यांचे शंका समाधान करण्यासाठी टेलिफोन लावणे एवढेच काय ते माझ्या हातात होते. बाकीच्या लावालाव्या कश्या काय करायच्या याबद्दलची चर्चा विचारविनिमय करण्यासाठी लोकसंपर्कात राहणं ही गरज होती त्या काळची.

माझ्या गरम प्रकारांनी घरचं वातावरण बिलाचे आकडे पाहून चांगलंच हॉट व्हायला लागलं. बिलांच्या आकड्यांनी सगळ्यांची तोंड वाकडी होऊन त्यांस आकडी येईपर्यंत वेळ गेली हो. मग त्यांनी नंबरच्या डीटेल्स मागवल्या. मी इतकी बिथरलेते की ती लांबलचक कागदाची भेंडोळी घरच्यांच्या समोर पाण्याच्या बादलीतच टाकली. मरा तिच्यायला. प्रेम सहन होत नाही दुनियेला. सगळे डोळे मोठे करून माझ्याकडे पहात राहिले. "ही, ही ही, ही आजची पिढी " हीहीहीही. किती तो जळफळाट माझ्यावर होत होता बै बै.

एकदा कुणीतरी पलिकडून किस देत असताना मी फोनचा रीसिव्हर माझ्या गालावर ठेवला आणि डोळे बंद करून घेतले. फार मस्त वाटत होतं काय सांगू.. डोळे उघडले. झालं का किस देऊन हे विचारायला फोन परत कानाला लावणार तर माझा हा सगळा प्रकार मोठ्यामोठ्या बटाट्याएवढ्या डोळ्यांनी माझ्या ढूला अगदी ढू लाऊन उभं असलेलं कुणीतरी पहात होतं. मी घाबरून फोन ठेऊन दिल्यावर त्यांनी मला काय विचारावं? "हा कोण मुलगा आहे, ह्याचा धर्म कोणता, कोणत्या जातीचा आहे? " धर्म कोणता जात कोणती.. साला हे प्रश्न तेव्हा पडलेच नाहीत. आपला एकच सवाल - तवा गरम होतोय का बास.. तवा म्हणजे मन हो..

दरम्यान आमच्या घरीही कॉस्लपेक्षा ब्लॅक कॉल्सचं प्रमाण वाढलं. ते घेऊन घेऊन घरातल्यांचे कान आणि हॅलो हॅलो... हॅलोSSSS हॅलोSSSS करकरून ओठ बाहेर येऊन त्यांना चंबूशेप येऊ लागले. मग भूस्स अशी वाफ सोडायचे त्यातून.

अनेक मुलांच्या आयांचे हॅलो मला कळू लागले होते. मुलांच्या आयाही डाम्रट. उगाच आपल्या मुलाचा आवाजही काढायचा प्रयत्न करणार. मुलांना आणि मुलींना माहीत असायचं कोणत्या वेळेला कोण मिस कॉल देतंय ते.

ब्लॅंक कॉलबाबत माझा अभ्यासच झाला होता त्यातून. शाळेतून घरी आलं की त्यानंतर जेवण झालं की मी झोपायचे. मग अभ्यास करायचे मोजून दोन तास हे माहीत होतं आमच्या एका क्लासच्या बाईच्या मुलाला. मग तो बरोब्बर पाच वाजता एक ब्लॅंक कॉल द्यायचा. काही नाही मी नुस्तं इथून हॅलो हॅलो हॅलो हॅलो असं आवाजात वेरीयेशन देत म्हणणार बस. त्यात काय ते सुख मिळे त्याला. एकाला गाण्याची आवड होती. त्याचा फोन सकाळी यायचा. तो रियाझाला उठायचा. तेव्हा त्याच्या घरचे झोपलेले असत. कुणाला कळू नये म्हणून मी फोनच्या रिंगरचं व्हॉल्यूम कमी जास्त करायचं गोल चक्र फिरवून आवाज बंद करून ठेवायचे. सकाळी योगाला उठते असं सांगून लवकर उठायचे आणि फक्त साडेपाचला फोनमधला एक लुकलुकणारा लाल लाईट दिसला की फोन घ्यायचे. तिथेच उभी असायचे. मग नंतर माझ्या घरातली एक आदरणीय व्यक्ती योग शिक्षकाचा कोर्सच करून आली आणि ती त्या अभ्यासासाठी पहाटे साडेचारला उठू लागली व आमचा मिस कॉस्लचा रीयाझ संपला.

एकाची रिंग लांबलचक यायची. हा ब्लॅंक कॉल मुंबई क्षेत्राच्या बाहेरून यायचा. ते हळूहळू लांब रिंग, आखूड रिंग अशा फरकाने घरी कळू लागलं होतं. घरच्यांना सगळं कळलंच पाहिजे का? पोरांना नीट वयात येऊ द्यावं की जरा. काही काळानंतर घरातले तरबेज झाले होते. फोनची रिंग वाजली की एकाच वेळेला घरातले सगळे सुसाट वेगाने धावत सुटत. सगळे एकदम फोनजवळ.. सगळ्यांच्या जिभा धापा टाकत टाकत बाहेर आलेल्या. हफ्प... हफ्प... हफ्प...हफ्प.. हफ्प. घरच्यांचा पायला वेग आला होता वेग. फोनपाशी आले की सगळ्यांचे हात अकदम रीसिव्हरवर खाप्पक्कन. मग मी काय करे..... सगळे माझ्याकडे, हं आता कसं पकडलं अशा विजयी भावनेने बघत असताना मी रिसिव्हर उचलून परत क्रेडलवर दाणकन आपटून ठेवत असे. फोनच कट करत असे. हॉहॉहॉ. बोंबला.

हे मोबाईल आल्यापासूनना ब्लॅंक कॉल्सची गंमत गेली नाही का? पण मी एकदा त्यावरही उपाय केला. प्रवासात एसटी जिथे जिथे थांबेल सूसू ब्रेकसाठी त्या त्या बसस्टॅण्डच्या पीसीओमधे जाऊन मी ब्लॅंक कॉल मारायचे आणि तिथू छू व्हायचे.. मग समोरून फोन यायचा.. पीसीओवाले सांगायचे.. हा हा आई थी एक लडकी उसने किया रहेंगा आपको फोन. निला था ड्रेस. सावली थी. वो गयी अभी.. मतलबके जा रही है.. मी हातवारे करून त्यांना सांगत असे.. गेली गेली असं सांगा म्हणून. फार मज्जा होती त्यात.

Comments

  1. व्वा..
    काय सर्जनशीलता आहे तुझी..

    ReplyDelete

Post a Comment