शेळ्या


मी हे अमान्य करू शकत नाही. प्रेमाबद्दलच्या साचेबद्ध बांधीव अट्टहासाने बांधलेली धरणं डोक्यात नसलेले FEW मेंटली RICH OLD बास्टर्ड्स आणि बिचेससोबत जाऊन एखाद्या निवांत कोपर्यात बसून कार्ल्सबर्गचे घोट घेत राहणं. तिथे मनात जे असेल ते बोलता येणं. एकमेकांना किस करण्याचाच काय ओरबाडण्याचाही खुला अधिकार असणं, त्यात का कु के के क्या की नसणं.

चांगलं अन्न खाणं, सिगरेट ओढणं, पुस्तकं वाचणं, एखाद्या पेंटरच्या नशेत राहून त्याच्यावर वाईट जीव लावणं. त्या तारेत राहणं.. ऐश करणं. कमिटमेंट अंडर येणारी एकही गोष्ट न करता पलंगतोड प्रेम करत राहणं. जगाला शिव्या घालत राहणं. शहर नकोय. तिथला पेपर नकोय घरात यायला.. बातम्या नकोएत. डेडलाईन नकोएत. गोळ्या घाला एकमेकांना.. नकोय ते जग.

म्हशीच्या शेणाच्या पोआसारखे गळणारे पसारे जिथे आवरावेच लागणार नाहीत अश्या इतक्या छोट्याशा घरात राहून बाजूला एक डोंगर उपभोगणं. तिथे सूर्यास्त होत असताना कुणाच्यातरी मिठीत बुडणं. सूर्यादय होतो पण दिवस उगवतो की नाही ते माहीत नाही. त्यावेळी असावं कुणी शेजारी झोपेच्या अधीन आपल्या मिठीबाहेर. त्याचा माझ्या सुटलेल्या पोटावरचा हात अलगद बाजूला ठेवणार मी.

त्या घरात मला चुलीवरची गरम गरम टम्म भाकरी, हिरवीलस्स पालेभाजी, काळ्या मसाल्याच्या रश्श्याचं चिकन कधी मटार बटाटा घातलेला खिमा, चटणी, ताजं ताक.. वाटेल तेव्हा बदामी रंगाचा चहा देणारी नववार साडीतली एक मावशी असणं. तिचं काही दुखत असेल तर मी तिला सॅण्डविच खाऊ घालणं. मग खिडकीला लावलेल्या टेबलवर ठेवलेल्या लॅपटॉपशी रोमांस करणं. एक दिवस त्याच्या किबोर्डवर रक्त ओकून मरून पडणं. तोवर एका कोपर्यातल्या कुणी सुरकुत्या सोडून गेलेल्या उसवलेल्या बेडशीटला गुरफटून पाय वर करून झोपणं. सकाळ होताच ब्रश न करता घराबाहेर पडणं आणि तिथे साडीच्या पदरासारख्या झुळझुळूत वाहणार्या निळ्या नदीच्या प्रवाहात विवस्त्र बसून राहणं.. डोंगरावर असतील प्रभाकर बर्वेंच्या चित्रातल्या चरणार्या बुद्धशांत शेळ्या.. हे आणि हेच माझं स्वप्नं आहे. याव्यतिरिक्त मिळवायला लागतं ते थकवणारं यश. मग गूळ होणार आपण उघड्यावर पडलेला..












एक ढगरट शाईचा थेंब पसारा घेऊन चाललेला.. Bye Bye. एक टक्कल नसलेला डोंगर ओडोमॉसच्या झाडाचा. एक बडबडत वाहणारी जांभूळनिळी रेघ पाण्याची.. एक बकुळ, रातराणी, एक प्राजक्ताचा सडा घोरणारा एक दम मारलेला सुगंध झुळूकपॅक एक मी... नशेत. उसवलेली बॅग फाट्यावर मारून आकाशाखाली पडलेली. बर्याचशा सिगरेट्स आणि तू. " लायटर विसरू नकोस, इथेच बुडवीन "

Comments

  1. तुझ्या most of the columns मधून तू एकदम बिनधास्त वाटतेस...
    आणि जीवनाबद्दल असेच साधे, simple माझे पण स्वप्न आहे.

    ReplyDelete
  2. क्या बात है रेणुका..
    काय लिहिलस यार.. असही व्यक्त होता येऊ शकतं आणि ते सुद्धा या शब्दांतून.. मजा आ गया..
    हा मनाच्या एका कप्प्यातला आवाज असतो..
    सही बात..

    ReplyDelete
  3. Aas vatat ki he sampuch naye fakt vachatch rahav....best... Mast

    ReplyDelete

Post a Comment