कुणी नसतं आपलं. कुण्णी कुण्णी नाही

काय आता सांगते. म्हणजे आपणही गंडतो तेही सांगितलं पाहिजे. नेहमी आपणच कसं शाणे ते सांगितलं नं की, बाप्पा पाप देतो. 
तर मी अगदी जाम जाम ठरवलं होतं की, मी कध्धी कध्धी केसांना रंग लावणार नाही. अगदी केसांची चांदी झाली तरीही नाही. नो हेअर लवर. सॉरी नो हेअर कलर. पण अंगात किडे जास्त असलेली माणसं स्वत:चंही ऐकत नाहीत. ये गए साल की बात है. 

लाल रंग करायचा ठरवलं थेट. ठरलं. एकदा ठरलं की ठरलं. बी ब्लंट मधूनच करणार बै मी. आय डोंट वॉन्ट टू टेक एनि रिस्क बाय गोईंग इन एनि सॅंटरफॅंटर पाल्लर HUH. तिथे गेल्यावर त्या हेअर स्टायलिस्टशी गप्पा मारत मारत कॉफीचे घुटके स्सक्क स्सक्क क्रत क्रत, चार तास मी फॉईल लाऊन बसले होते. सहा हज्जार...बिल.

सहा हज्जार? रडू नकोस. बी ब्लंट हवं होतं ना थोबाडे.. मग? कर कधी स्वत:वर खर्च. मी मलाच खडसावले. एकतर तुझे केस कुरळे त्याचे काही होणे नाही. त्या माधुरी दिक्षितच्या नादाला लागून शंभरदा स्टेप कट केलास, त्यातली एकही स्टेप कधी कळली नाही मुस्काडतोंडे.. कधी एखादा रंग मारून घेतला जरा तर इतकं अपराधी वाटून घ्यायला नको. जरा नटायला मुरडायला नको. अगदीच गावठी. 
हेअरवॉश केल्यावर तो हेअरस्टायलिस्ट म्हणाला, OMG OMG धिस कल्ल इज लुकिंग जस्ट अमेsssझिंग ऑन युव हेए. मी त्याला फारच डीटेल दिले होते. रेड कलर भडक दिसता कामा नये. पण तो दिसायला हवा. तो केसांच्या अधे मधे दिसला पाहिजे. त्याचे फराटे मारल्यासारखे दिसायला नकोत. तो माझ्या काळ्या केसांत मर्ज व्हायला हवा. त्याने माझे केस खराब व्हायला नकोत. इ. इ. 
मग त्याने जॉब डन करून एक शांपू कंडिशनर माझ्यासमोर आणला. हा हेअरकलर प्रोटेक्ट करेल. किंमत अडीच हजार. म्हणजे मला जी सणक आली केस रंगवण्याची त्याची किंमत साडेआठ हजार. आज रात मेरा खून होनेवाला है पक्का. माझ्या नवर्याचा कधीही न दिसणारा भयंकर रागावलेला चेहरा कसा दिसेल ते मी इमॅजिन करू लागले. माझ्या केसाला लावलेल्या लाल रंगासारखं लाल रक्त त्याच्या डोळ्यातून येत आहे आणि तो दातओठ खाऊन माझ्यामागे चाकू घेऊन धावतो आहे, असं कायकाय दिसू लागलं. नवरा माझा कधीच विचारत नाही की, काय बाय किती खर्च केलेस नी काय त्ये. तो ह्या कश्यात नसतो. पण मलाच इतकं कायच्या काय वाटत होतं की तो रागवेल की काय, ह्याने धडधडत होतं. 
हेअरस्टाईलवर लाखांनी खर्च करतात स्त्रिया. पण आपण केसांच्या वळकट्या वळून तश्याच मिरवल्या. एकदा कधी ते केस सरळ केले ते नंतर केरसुणीच्या हिरासारखे दिसू लागले. खाली केस सरळ आणि डोक्यातून उगवणारे न्यूडलसारखे दिसू लागले. ते पुन्हा पुन्हा सरळ करावे लागतील, असं पार्लवाल्यांना सांगितलं. त्याचा खर्च माझ्या तेव्हाच्या नोकरीला परवडण्यासारखा नव्हात. मग मी केस सरळ करायचा नाद नै केला. आणि मनापासून माझ्या कुरळ्या बटांवर प्रेम करू लागले. ईलाज को नाविलाज.
कुरळ्या केसांमुळे मला ' ए सुनिता राव ', असं चिडवणारा माझ्या क्लासमधला एक गुजराथी मुलगा माझ्या मैत्रिणीला आवडू लागल्याची भयंकर विनोदी आठवण अजूनही ताजी आहे. हाहाहा. नाना मुझे छुनाना दूरही रेहना परी हू मै.. इतकंच ते म्हणायचे. त्या क्लासला जाताना एकदा मी पांढरा डेनिम शर्ट आणि जिन्स घातली होती. तेव्हा माझी ती मैत्रीण विचित्र हात हलवत धावतच आली माझ्या दिशेने. ह्या रेणका.. सही सही. आज तर सुनिता रावचे सगळे आशिक फूल टू उभे राहणार आहेत. ऐकत नाय ऐकत नाय. मी इतकी हासले होते तेव्हा की डोळ्यातून पाणी येऊन येऊन काजळ उतरल्याने माझे गाल काळे झाले होते. ते अजागळासारखे हाताला पुसून तेच हात शर्टालाही पुसले होते. 
स्वत:वर खर्च करायचा म्हंटला की माती खाणार्यांपैकी मी एक आहे. माझी सवय नवर्याला लागली. फारच ब्वा काटकसरी झाल्याने आता आम्ही एकमेकांचे सारखे खर्च काढच असतो. इतके खर्च केलेस, इतके इतके..? आपल्याकडे अजिबातच पैसे बिसे नाहीत असं वाटायला लागतं. अजूनही बाटाची चप्पल घेऊ की मेट्रोची, मॅक्समध्ये कपडे घ्यावे की जाऊंदे घ्यावा एक फॅब इंडियाचा कुर्ता.. मग नको नको त्यात मॅक्सचे तीन टॉप येतील, हा गोंधळ मनात होतोच. रद्दीवाला देतो ते पैसे अजूनही मी वेगळे साचवते आणि त्यातून घरासाठी एखादी वस्तू विकत घेते. महाग घड्याळ घ्यायची इतकी इच्छा आहे. पण टायटनचं आठशे रूपयांचं घड्याळ तीच वेळ दाखवतं की, असं सांगून महागड्या घड्याळाची इच्छा मी कैक वर्षं गाडून ठेवली आहे. 
मुळात उठलं की साटकन भलेमोठे पैसे खर्च करण्याला जीव धजावत नाही. गेल्या अनेक वर्षांत पालकांच्या औषधोपचारात होणारे भयावह खर्च पाहून आणि त्यासाठी होणारी मारामार पाहून बाकीच्या गोष्टींवर खर्च करताना ह्याची गरज आहे का, हे शंभरवेळा विचार करते. सवयच लागली. कपडे घेताना टॅग बघायची दळभद्री सवय लागलीये. पाच सहा हजाराची साडी, ड्रेस मी इमॅजिनच करू शकत नाही. पण चांगल्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत तिथे खर्च केला पाहिजे. तिथे करते. जसा आता एसी घेणार आहे. आयच्चा उकाडा. 
अडीच हजाराचा शांपू म्हंटल्यावर मी म्हणाले, नको घरी 'डव' ची बाटली आणि कंडिशनर आहे अजून आधी ती संपवते. त्यावर त्या हेअर स्टायलिस्टचा चेहरा असा आतून सुजला. जशी तुमची इच्छा, असे म्हणून त्याने मला टाटा बाय बाय केले. मी डव शव सांगितल्यावर तो काय करील बापडा.
मग घरी आल्यावर मी नवर्याला उन्हात आणून वाकडं तिकडं उभं राहून राहून केस हलवून हलवून, कसं दिसतंय कसं दिसतंय करू करू वात आणला. लाल रंग दिसतोय का.. असं नाही चष्मा लाऊन बघ. माझ्या हक्काच्या माणसांना मी फार नाडते राव. तिसर्या दिवशी मी न्हायले. पुढचं मी नाही सांगणार जॉ. नाहीच सांगणार. .
..
फ्लोअरवर लाल रंगाची नदी वहात होती. त्यातून माझे कष्टाचे सहा हजार वहात होते. मी इतकी खचले ते पाहून की काय सांगू.. फारच लागलं ते माझ्या मनास. मग जेव्हा कधी आंघोळीला जायचे तसाच रंग वहायचा. लाल लाल लाल लाल. माझ्या हेअरकलरचं कुणी कुणी कधी कधी कौतुक केलं नाही. मी तो केलाय हेही कुणाच्या लक्षात आलं नाही. बाकी किती मुलींचे हेअरकलर किती छान दिसतात. माझेच तेवढे छान दिसत नाहीत म्हणून मी छान हेअरकलर असणार्या सार्या नटमोगर्यांवर भयंकर जेलस आहे. मी पण केला ना खर्च. दिलाताना वेळ मग मलाच का नाही चांगला हेअरकलर ? का? 
आता तर रंग चांगला धुतला जाऊन केस पुन्हा पहिल्यासारखे जैसे थे काळे झाले आहेत. मी ह्या सार्या प्रकारावरून इतकी खट्टू खुळखुळा झाले आहे की, बी ब्लंट वाल्यांशी भांडायलाही गेले नाही. वर माझा नवरा एक दिवस सांगतो कसा, ते बरं तू सहा हजारच खर्च केलेस. माझा एक कलीग सांगत होता त्याच्या बायकोने २३ हजार खर्च केले हेअरकलरवर आणि ते केस धुवायला तेवढीच महागडी प्रोडक्ट ती अमेरिकेहून मागवते. त्यापेक्षा गुंडू तू तर फक्त सहा हजारच खर्च केलेस ठीकेय गं. तू कधीच पार्लरला जातही नाहीस. तिथे कधीच काही खर्च करत नाहीस. मग एखाद्या वेळेस खर्च केलास तर मनाला इतकं लाऊन घेऊ नकोस. म्हणजे मी पार्लरमधे जाऊन हेअर कलरवर सहा हजार खर्च केले तर केले आणि वर तो रंग निघूनही गेला, ह्याची चर्चा ह्याने बाहेर केलीन. किती जालिम आहे ही दुनिया. कुणी आपलं नाही. आपला हेअरकलरही.

Comments