नशीबवान

नेटफ्लिक्स अॅमेझॉन प्राईम हॉस्टस्टारवरचे सारे मुक्त थेट उघडेवाघडं मनसोक्त पाहता येतं आता. परत परत पहायचं असेल तरीही.. अब सब प पॉसिब्ल है.
एक काळ होता क्वचित आमचे सवंगडी गच्चीवर जाऊन अॅण्टिना हालवून हालवून गच्चीच्या रेलिंगवरून वाकून वाकून विचारायचे.. दिसतंय का.... दिसतंय का... आम्ही खालून हाकारे द्यायचो भयानक अश्लील वाटावेत असे.. नाही अजून अजून थोडी हलव.. हा दिसलं.. गेलं.. हलव जरा नीट माठ्या.. अरे कसं हलवतोएस, मुंग्या आल्या सगळ्या पुन्हा. परत हलव.. मग तो वरचा भाऊ, दोस्त ओरडे.. कुठे वळवू डावीकडे.. हा.. अजून फिरवू तिथे.. दिसलं का.. हलवू का अजून.. दिसलं दिसलं ये आता खाली ये..
बापरे.. आमच्या शेजारच्यांच्या घरात कृष्णधवल टिव्ही होता. त्यातही एक्सरे दिव्यापुढे धरून जसं पाहतात तसं पाहिलं की कसं दिसायचं आठवलं का.. तसं दिसे. त्यात एका ३१ डिसेंबरला कुठल्याश्या चॅनेलला टायटॅनिक दिवसभर दाखवला होता. मधेच चित्र दिसे मधेच एक्सरे मोड. मग माझा मित्र टिव्हीला एक हलका धक्का चापटी मारत असे आणि मग परत जरा बरं दिसायचं. त्या टिव्हीत बोटीवर हात पसरून उभ्या राहिलेल्या देखण्या केटचे मी कोडॅक कॅमेर्याने फोटो काढून ते डेव्हलप का केलं होते आणि मग त्या मित्राला दाखवल्यावर तो समाधानाने का हसला होता, काहीच माहीत नाही. असं लहान असताना बरंचसं जे आपण काही ध्येय नसतानाही झगडत करत असतो त्याने फार्फार निर्मळ आनंद मिळतो. कॅप्रियो ने त्याच्या प्रियो केटंचं नग्नावस्थेत काढलेलं चित्रप्रसंग पाहून आम्ही मुग्धावस्थेत गेलो होतो. पण ते परत परत पाहण्याची सोय नव्हती. त्याने तिला दिलेली पप्पी मात्र तेव्हा तो केट विन्स्लेटपुढे जरा कोवळा दिसत असे म्हणू गोडमिठ्ठ जिलबीसारखी डोळ्यांना उगाच लागली. आता कसला दिसतो तो. आता जरा खरखरीत मस्त मर्द दिसतो तो.
काकांच्या घरी असताना तिथे ऑर्सनचा टीव्ही घेतला होता. तो टीव्ही त्यांच्याकडे ३२ वर्षं होता. माझ्यापेक्षा जरा एक दोन वर्षांनी लहान वगैरे. तर त्यात १६ चॅनेल्स होते. त्यात हात घालून काय काय ते फिरवून चॅनेट सेट करता येतात हे मला हळूहळी किडे करताना कळत गेलं. एकदा असेच उपद्व्याप करत असताना स्टार मूव्हीज समोर आलं आणि तिथे थेट घासाघीसीच दिसली आणि डोळेच गरम झाले. मग घरातले झोपले की हाच उद्योग ट्यूनिंग करणे आणि गरम गोष्टी शोधणे. पण त्यातही चित्रपटात सतत चुम्माचाटी नसते. पोर्न वगैरे असतं हा शोध नंतर लागला. मग फॅशन टीव्ही दिसला आणि दाणदाण चालणार्या त्या ललना पाहूनही वेळ मजेत जायला लागला. रिमोट बिघडलेला होत. एकदा काका ताम्हनातलं पाणी तुळशीत ओतायला म्हणून बाहेर हॉलमधून बाल्कनीकडे जात होते. त्याच वेळेस टीव्हीवर करकचून स्मुचिंग सुरू होतं. मी ते पाहण्यात दंग झाले होते. पण काका आल्यावर रिमोटने चॅनल बदलतच नव्हतं. काकांनी पाहिलं आणि हे हे हे असलं पहायला हवं तुला, असं जोरात ओरडून मला कानकोंडं करून त्यांनी माझीच पूजा घातली. आता मात्र सेक्स, हिंसा, चोर्या मार्या काही पहायचं असेल तर सगळं हातापाशी आलं आहे. प्रगतीच प्रगती.



सर्व नवे जुने चित्रपट, अवॉर्ड विनिंग कण्टेंण्ट, रॉमकॉम, हॉरर, अॅक्शन, लहान मुंलांचे चित्रपट, लहान मुलांचे टीव्ही शो, डॉक्युमेंट्री, गॉट, बिलियन्ससारखे टीव्ही शो मी घरी सोनी ब्राव्हियाच्या नितांत सुंदर स्क्रीनवरती करकरीत पाहू शकतेय. केट विन्स्लेटची प्रमुख भुमिका असलेला ' मेलड्रिड ' हा शो पाहून मी मराठीतल्या भुक्कड मालिका पाहणं काही वर्षांपासून बंद केलं ह्याचं कोण समाधान आहे.
मान्य करते सगळ्यांसमोर. मी गरोदर असताना ' पुढचं पाऊल ' नावाची भिकार सीरियल रोज बघत होते. मग अचानक थांबलं पाहणं. आपणं हे बघत होतो हे मी कधी कधी कुण्णा कुण्णास सांगायचं नाही असं ठरवलं. गेली सहा वर्षं कधीच टीव्ही सीरियल पाहिल्या नाहीत.
हल्ली परत पाहण्याचं धाडस केलं.. काहे दिया परदेस.. एक एपिसोड पाहिल्यावर मी अर्धा तास टीव्ही बंद करून शांत बसून राहिले होते त्या चपट्या काळ्या स्क्रीनकडं पहात. काय मातेरं झालं हे टीव्हीचं असा विचार करत बसले होते बापडी. नुक्कड आठवली, मालगुडी डेज आठवली, ब्योमकेश बक्षी आठवलं.. गंगाधर टिपरेही आठवले. डेली सोपसारखं मनोरंजन नाही.. पण हे सासू सुना आणि त्यांच्या मठ्ठोत्तम भांडणांवर एपिसोडच्या पिलावळ्या पाडणारे कार्यक्रम पाहणं नकोच वाटू लागलं आणि टीव्ही सुटला होता कायमचा.
एक दिवस नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम सबस्क्राईब केलं आणि परत टीव्हीचा रीमोट माझ्या हाती दिसू लागला. बिग लिटिल लाईज झपाट्याने पाहिलं मग नाईट ऑफ, स्ट्रेंजर थिंग्ज.. सारे एपिसोड धपाधप पाहिले. किती मॅगी किती लॉलिपॉप्स आणि किती चहा प्याले गेल्या काही काळात. अहाहा काय अनुभव आहे हा टीव्हीचा. आज गेम ऑफ थ्रॉन्स पाहून संपवलं आणि पुढचा सीझन २०१८ मधे येणार हे ऐकून अंगावर काटा आला. हा विरह कसा सहन करायचा...
कथा, चित्रण, पात्रं.. इतकं अत्युच्च दर्जाच्या देणार्या ह्या मालिका पाहताना आपण वेगळ्या जगात जातो. चित्रपटांनाही मागे टाकतील अश्या पद्धतीने ह्या मालिका बनवल्या जातात. त्यांचं इतकं भीषण वेड लागतं की मालिका संपल्यावर बराच काळ आपण विड्रॉवल सिम्पटममधे जातो आणि रिकामं वाटू लागतं.
टीव्हीचे सोनेरी युग आले आहे असं म्हणतात, ते काही खोटं नव्हे. आता सेटटॉपबॉक्सडे वळावसं वाटतही नाही. कोणतीही जाहिरात मधेच व्यत्यय आणत नाही. हे सारं आणि टीव्ही मोबाईल कॉम्प कश्यावरही कुठेही पाहू शकतो. खर्या अर्थाने हे मनोरंजन हाती आलेलं आहे.
आता स्मार्ट टीव्हीवरती यूट्यूबवरून वाटेल ते व्हीडियो पाहू शकते, मोबाईलवरून हॉटस्टारवरचं कण्टेंट टीव्हीवर कास्ट करू शकते. बाहेर लागणारे सारे चित्रपट मला घरबसल्या पाहता येतात. खूप पैसे वाचतात. तंत्रज्ञानाने केलेली ही प्रगती अफाट आहे. अफाट, अचाट, अलौकीक, अोह माय ग्वाड प्रगती आहे ही.. मी ह्या काळात जन्माला आले.. मी किती नशीबवान आहे खरंच. आपण सारेच.

Comments

  1. संजीव उपाध्ये8 November 2017 at 00:31

    डँ बि स...

    ReplyDelete
  2. आवडलं. छान आहे. एक दोन मराठी, हिंदी आणि इंग्लिश चॅनेलच्या पलीकडे जायला पाहिजे. नवीन तंत्रज्ञान शिकायला पाहिजे!

    ReplyDelete
  3. आगे आगे देखो रेखो होता हैं क्या...💐

    ReplyDelete

Post a Comment