रंग माझा वेगळा

आजीची आठवण येत्ये. नगरला मे महिन्यात गेले की आजी मला बंबात तापलेल्या पाण्याने आंघोळ घाली. न्हाणीत एक खरखरीत दगड होता ज्यावर नेम धरून आमचा धाकटा मामेभाऊ शू ची धार मारत असे आम्ही टाळ्या वाजवायचो. त्याच दगडाने चांगलं घासून घासून माझं अंग आजी धूई. मामी शिकेकाई दळून आणायची. काय सुंदर सुगंध होता त्या शिकाकाईचा... तीही पाण्यात कालवून माझी पाठ घासत असे.

मग मी देवाच्या पाया पडायला आल्यावर आजी न्हायलेल्या केसांवर परत तेल थापे म्हणे, बघ मुंबईहून किती काळी होऊन आली होती आता कशी मस्त गोरी झाली मये. वाह म्हणजे आजीने एक आंघोळ काय घातली आणि मी लगेच गोरी झाले ढिंच्यॅक्क ! एप्रिल मे महिना सारे नगर डोक्यावर घेऊन हुदाडून झाले की मुंबईला गेल्यावर काकू माझ्याकडे बघून किंचाळायची. काकू किंचाळायची हे जरा एक्झॅजरेटेड व्हर्जन. कारण नगरच्या उन्हाने मी खरच जाम टॅन होऊन परतायची. मग काकू आंघोळ घालायची आणि म्हणायची नगरहून कावळा परत आला आता बगळ्यासारखा लख्ख झाला बघ. गोरे व्हा गोरे व्हा गोरे व्हा भेंच्योत गोरे व्हा.

आमच्या गोरेगावच्या इमारतीत एक ब्राह्मण कुटुंब होतं. त्यांचा लिंबाच्या गोळ्यासारखा लोण्यासारखा रंग असलेला बोदल्या मुलगा होता. कामसू होता स्वभावही चांगला पण माझ्यासारखा दिसायला सणसणीत नव्हता. मी त्यांच्या घरी जाई खेळायला. त्याला मोठ्या गोर्यागोर्या बहिणी होत्या. त्याची आई गंमतीनेच म्हणाली पण लक्षात राहिलं आजवर. मयुरा तू जामच काळी. जरा रंग उजवा असता तर तुला सूनच करून घेतला असती. होय पण मी सून व्हायला तयार झाले असत्ये काय ह्यांची? आता त्याची बायको पाहिली. खडूसारखी पांढरी आहे. छान आहे उगाच कशाला है है. गोरेगावमधे काळे आडनावाने जन्म होणे अशीही थट्टा व्हायची.. पण ती ठीकाय अशी थट्टा मीही केली असती कुणाची ज्याच्या अंगास ती फार लागत नाही.

कॉलेजमधे असताना माझ्या मैत्रिणीला गंधालीला छेडायला अतिशय काळीकुळी हडकी पोरं नेमाने वर्गात यायची. त्यांना चांगली ओरडले होते. त्यातला एक मला म्हणाला होता, स्वत: तर कावळ्यासारखी काळी आहे तुला कोण बघतं. मी आणि गंधाली हसलो होतो त्यावर. परत ते फिरकले नाहीत. त्यांच नाव आम्ही कौआ गॅंग ठेवलं होतं. ह्या रंगावरून मला जेव्हा हिणवलं जाऊ लागलं तेव्हा ही देखणेपणात कमीपणाची बाजू समजली जाते, ही लक्षात आलेली बाब टोकदार होऊ लागली. पण हो त्याने मी कुरूप आहे, कुणाहीपेक्षा कमी आहे ही जळमटं मनावर चढली नाहीच. गंधाली रंगाने उजळ गोरी होती. मग ह्या रंगामुळेही तिचे मवाली लोकांच्या छेडछाडीपासून रक्षण झाले असे आहे का.. नाही. उलट तो एक देखणेपणाचा निकष आहे असं समजणारे तिला कॉलेजात फिरणे मुष्कील करत होते. तिला सतावत होते.

मयुरा काळीसावळी असली तरीही दिसायला तरतरीत आहे हो, हेही घरी कित्येकदा नातेवाईक आले की बोललं जायचंय. हे काळीसावळी असली तरीही... हे काय आहे राव? एकूणच रंग गोरा असणं ह्याला आपल्याकडे अवाजवी महत्व फारे. त्यामुळे कितीतरीजण न्यूनगंडाने पझाडून जातात.
मी लहान असताना मला विचारत गंमत करायला तू कोण? मी सांगायचे मी काळ्यांची काळू.
इंग्रजी माध्यमात होते. तिथे डान्समधे मला सर्वात मागे का ठेवलं ह्याचं कारण विचारायला आई तरातरा शाळेत गेली तिथे ही सावळी आहे खूपच नं त्यामुळे मागे ठेवलं, असं सांगितल्यावर आईने चिडून त्या शाळेतून काढून मला मराठी शाळेत घातलंन. आईचं चुकलंच. नाहीतर आज मी माझी तलवार इंग्रजीत चालवली असती. असो पण माझी नंदादीप शाळा सुंदरच होती. तिथे कधीही मला हे रंगप्रकरण आणि त्यामुळे डावललं जाणं अनुभवायला लागलं नाही.
मोठी व्हायला लागले तसे माझा काळसर रंग खुलायला लागला. माझे हात त्वचा मलाच खूप आवडू लागले होते. मानेच्या इथले कॉलरबोन मस्त बाहेर आले. तिथले खड्डे मीच आरश्यात येताजाता निरखू लागले. चेहर्याचा ओव्हल शेप, सुंदर मान आणि त्यावर रूळणारे कुरळे केस मला खूप आवडू लागले. तेव्हा केस फार दाट होते. मला कधीही केस सरळ करावेत किंवा रंग गोरा होण्यासाठी फेअरनेस क्रीम वापरावीत असं वाटलं नाही. मी कधी कधीही फेअर अॅण्ड लव्हली वापरले नाही. 




त्वचेच्या रंगापेक्षाही माणसाच्या मनाचे रंग मला लुभावतात. तो रंग माणसाच्या डोळ्यात दिसतो. तिथे कोणताही मेकअप फेसपॅक लाऊन त्या रंगाचा पोत सुधारता येत नाही. खूप लांबून तिची काळीकुट्ट मान दिसते, असं म्हणणार्या रंग वजन ह्यावरून महिलांना चिडवणार्या एका माणसाने मला यथेच्छ चिडवण्याचा प्रकार अलिकडं केला. त्या व्यक्तिचा स्वत:चा रंगही सावळा काळसरच आहे. मग त्याने असं का केलं असावं असा विचार मी केला. कदाचित त्याच्या डोळ्यात मळ भरलेला असावा, असे उत्तर डोक्यात चमकून गेले. 

रंगावरून आजही लोकांची तारीफ करणं किंवा त्यांची छी थू करणं आणि त्यालाच सौंदर्याच्या मापदंडात बसवणं हा मुर्खपणाचा सगळ्यात भाबडा अवतार आहे. रंग कोणता आहे यामुळे माणूस अधिक उणा ठरू शकत नाही.
डोंगर दर्यांमधे उतार चढाव असतात, तिथे कुठे ऊन पडते कुठे आकाशात आलेल्या ढगांमुळे खाली सावल्यांचे खेळ होतात. खड्डे, उंचवटे, मोठे वृक्ष लहान रोपं गवत ह्यांच्या उंचीतली विसंगती, अंधार उजेड ह्यांचा खेळ ह्यांमुळेच तर निर्माण झालेले वैविध्य एखादा नजारा प्रेक्षणीय बनवून जातो. एकसारखे दिसणारे एक सपाट प्रतल सतत पाहणे कंटाळवाणे वाटते. सगळी माणसं गोरीच असती तर ते तसे पाहण्यानेही तोचतोचपणा निर्माण झाला असता. ह्याचा विचार निसर्गाने माणसाला बनवतानाही केला. मातीप्रमाणे माणसांच्या त्वचेचा रंग बदलला.

रंगामुळे आपण कुणापेक्षा उणे दिसतो असं समजणं हे वाईट आहे. आत्मविश्वास हाच एकमेव रंग असू शकतो ज्याने आपण उजळतो हे लक्षात आलं की गोरं होण्याचा दिसण्याचा ध्यास हे ध्येय बनत नाही आणि मग निराशेच्या काळोखीने घेरलं जाणं कधीकधीही होत नाही. काळ्या सावळ्या वर्णाचे खूप मोठे कलाकार, लेखक, अभिनेते, मॉडेल्स, नेते जगभरात प्रसिद्ध आहेत. ते केवळ त्यांच्या रंगात अडकून राहिले असते तर आज इतके नावारूपाला आले नसते.
एक खूप मोठे रंगभूषाकार मला पाहिल्यावर म्हणाले होते, तुझा रंग किती सुंदर आहे. फक्त चेहरा धुऊन आलीस तरीही किती फुलते तुझी त्वचा. त्यांनी माझा पाच मिनिटात एकदा मेकअप केला होता. तेव्हाही मला जराही गोरं बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नव्हता. बॉलिवूडमधली अशी एकही मोठी सेलिब्रिटी नाही ज्यांचा मेकअप त्यांनी किंवा त्यांच्या टीमने केलेला नाही असे झाले नाही. दोन वेळा त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांना जे समजले ते सगळ्यांनाच समजेल अशी अपेक्षाही नाही माझी. ज्याची त्याची समज. का बा.. 

Comments

  1. किती छान लिहिलंय बिन देखे बिन पहचाने तुम पर हम कुर्बान 👍👍👍👌💐

    ReplyDelete
  2. Replies
    1. thank you renuka. your words means a lot dear.

      Delete
  3. Actually mi pun lahan pana pasun he sagale face kela ahe. Mala ajun Kalat nahi why only fair is lovely? Lovely tar apan pahije boss..color bilar Kay gheyun basatat lok devas thauk.

    ReplyDelete
    Replies
    1. कसं आहे की माझा रंग सावळा आहे ह्याहून अधिक जास्त गहिरा रंग असणारे ह्या सगळ्या टवाळीला कसे तोंड देत असतील.. हे भीषण आहे. ह्याची तीव्रता लक्षात येत नाही पण समोरच्याचे मानसिक खच्चीकरण करणारे असले प्रकार स्वत: रोखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी धीट बनून तिथेच समोरच्याला ठोकून काढणारे उत्तर देणे महत्वाचे.

      Delete
  4. देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे
    सावळे की गोमटे या मोल नाही फारसे
    देखणे ते ओठ जे ओवती मुक्ताफळे
    आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे

    बा. भ . बोरकर


    तुझा लेख अप्रतिम

    ReplyDelete
  5. �� कसली मज्जा येते ना अशांची? मला तर 'काळी असूनही..' अशी सुरुवात होणाऱ्या वाक्यांची मांदियाळीच पाठ झालीये! मागच्या वर्षी मीही लिहिलं होतं यावर.. तुझी प्रतिक्रिया आवडेल.. :) Link:

    https://m.facebook.com/story.php?story_fbid=1302559443097789&id=100000312367502

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की वाचते रूचिता आणि कळवते.

      Delete
  6. मला स्वताला काळासावळा रंग आवडतो ..कारण मी तशीच आहे ! गोर्या लोकाँबद्द्ल अजिबातच असूया नाही .. पण सावळा रंग तरतरीत वाट्टो ..बाकी तुझे लिखाण आवडलेच ..त्यात काय नवीन ? ? ❤

    ReplyDelete
    Replies
    1. हो मलाही गोर्या रंग असणार्यांबद्दल असूया नाहीच. पण त्याने नाक वर करणार्या लोकांचं हसू येतं खरं.

      Delete
  7. Love you for everything, As Usual...

    ReplyDelete
  8. Ka re bhulalasi varaliya ranga... Kharokhar Santanna je shekdo varshapurvi kalal te ajunahi aaplya samajachya pachni padat nahi aahe.

    ReplyDelete
  9. मनानं खूप उजळ आहेस!!!

    ReplyDelete
  10. मी तर म्हणतो तुझ्यासोबत एक फोटो हवाय मला .
    मी माझ्या मैत्रीणींना पण बोललोय तुझ्या रंगाबद्दल म्हणटलं ती रेणुका बघ सावळी दिसते पण किती आकर्षक वाटते . स्वतंत्र जगतेस . अशीच रहा.शुभेच्छा

    ReplyDelete
  11. अप्रतिम लेख !!! ब्लॅक ब्युटी एक्दम !!!

    ReplyDelete
  12. माणसांच्या डोळ्यांत दिसनारा रंग ��������

    अप्रतिम लेख नेहमी सारखा

    विवाह मंडळात तर खुप मज्जा येते ख़ास करुण मुलींच्या लग्न असेल तेव्हा

    तशी चांगली आहे मुलगी तुमची पण कलर मध्ये गेली ना
    n all

    ReplyDelete
  13. Very basic but still people fail to understand it!
    Liked it

    ReplyDelete

Post a Comment