मुता मनसोक्त जब दिल चाहे..

दरवाजा उघडला आणि आत गेल्यावर प्रश्न पडला की आता मी इथे कसं बसू आणि पुढे.. ? पुण्यात पेईंग गेस्ट म्हणून रहात असताना हा बाका प्रसंग उद्भवला. मिळून चौघीजणी रहात असू. त्यातल्या दोघी गावाकडून आलेल्या, मी एक मुंबईची आणि एक पुण्याचीच होती. गावाकडून आलेल्या दोघी माझ्याकडून खूप लाडकोड करून घेत. पुण्याची होती ती ज्यादा शहाणी होती. ती रूमवर फार नसे. मी फार बाहेर पडत नसे. तिथे रहायला गेल्यावर बाथरूम साफ करण्याचं काम धुणंभांडी लादीपोतं करायला येणारी बाईच करे. पण नंतर ती यायची बंद झाली मुली जास्त कपडे टाकतात म्हणून. मग ज्याने त्याने आपापले काम करावे असे ठरले. संडास बाथरूमचा वापर सार्यांचाच होता. पण सफाई कोण करणार हा विषय काढल्यावर तिघींना तोबो तोबा केलं. मी सांगितलं, आठवड्यातून किमान एकदा प्रत्येकीने ही जबाबदारी घेतलीच पाहिजे. त्यावर सगळ्यात धाकटीनं नाक मुरडलं वरताण ती तसंच वागली. तिनं कधीही त्या कामाला कंबर वाकवली नाही. दिवस पुढे पुढे गेले आणि टॉईलेटमधून अभद्र वास येऊ लागले. पण सगळ्याजणी तश्याच निर्लज्जपणे जात होत्या. मला त्या चिकचिकाटात बसता उठता येईल का, असा विचार करून मी नाक दाबून पुढे होत असे. पण ज्यांच्यावर क्रमाने नंबर आले होते त्या फिनेल खराटा घेऊन पुढे आल्या नाहीत. आश्चर्य वाटायचं. मी बाथरूम टॉईलेट साफ करून पंधरा दिवस झाले तरी ह्या मुलींना काहीच लाज कशी वाटत नव्हती. लाजेचंही बाजूला राहू द्या, पण स्वच्छता असायला हवी. आपल्याला इन्फेक्शन होईल ह्याचीही त्यांना काळजी नव्हती त्या बेफकीर असत. तश्या त्या घाणीत हगायला मुतायला कसं जमायचं त्यांना ? संडासचे पिवळेजर्द रूप आणि चिकटा पाहून संडास कुणी घासायचा, हा प्रश्नं बाजूला ठेऊन निदान मला माझ्यासाठी तरी ती जागा साफ ठेवणं आवश्यक आहे तेव्हा मीच साफ केले पाहिजे हा विचार केला आणि सारे स्वच्छ धुऊनच मग मी तिथे मोकळी झाले.
त्या पेईंगेस्टांसोबत राहण्याआधी मी भंडारकर रोडला असलेल्या एका छोट्या जागेत पीजी म्हणून रहात असे. तिथे एक बिहारी आणि एक बंगाली मुलगी पीजी होत्या. त्या सुट्टीसाठी घरी गेलेल्या असताना मला त्या जागेत प्रवेश मिळाला. पूर्ण धुळीने भरलेली ती जागा मी आरश्यासारखी लख्ख केली. तिथेही हीच तर्हा. घाणेरडे टॉईलेट बाथरूम. सगळ्या खोलीत घाण होती. त्या मुली परत आल्यावर मी ती रूम इतकी साफ केली म्हणून त्यांचा माझ्यावर राग होता. मी साफ करायचे आणि ह्यांनी हगून ठेवायचे आणि मग चकाचक पावडर लिपस्टिक फासून बाहेर उंडारायला फिरायचे हे नेहमीचं झाल्यानं मी ती जागा कंटाळून सोडली पण दुसर्या पीजीत गेले आणि तिथेही भेटलेल्या मराठी मुलींचा असाच वाईट अनुभव आला. तुला घाण वाटते तर तू साफ कर असे उत्तर मिळाल्यावर मी त्यांच्यासाठी मायेने करत असलेली भजी, धिरडी प्रकार बंद केले. कुणीकुणी माझ्याकडून उधार घेतलेले पैसे परत करा, असे बजावले. तर त्यासाठीही त्या मुलींनी शिवीगाळ केल्यावर रणचंडिकेचा अवतार धारण करून ते पैसे मिळवले. तीही जागा सोडली आणि मग पुण्यात भाड्याने स्वतंत्र घर घेऊन काही महिने राहीले.
एकुणच संडास बाथरूम साफ ठेवणे, ही आपलीही जबाबदारी आहे असे अनेकांना वाटत नाही. ती घाण टाकण्याची घाण जागा आहे, असेच वर्तन असते. सार्वजनिक ठिकाणी ही समस्या अधिक ओंगळ ओकर्याबोकर्या रूपात सामोरी येते. जिथे तिथे टॉईलेट पॉटला लटकलेले केस, त्यावर मम म्हणून शिंतडलेले मुताचे थेंब आणि हेही कमी म्हणून कधी पाळीच्या रक्ताचे थेंब आपणच टीश्यूने साफ करून मग पुढचे विधी उरकायला बसावं लागलं की जाम राग येतो. आपण सू शी केल्यावर तिथे पाणी टाकावं. आपण आदल्या दिवशी काय खाल्लं ह्याची जाहिरात न करता दुसर्याला साफ निर्मळ टॉईलेट लीगसी म्हणून मागे सोडून जावं, अशी ईच्छा स्त्रियांना का होत नसेल ?
एकदा मॉलमधे गेले होते. बराच वेळ रांगेत उभी होते. दरवाज्यापर्यंत पोहोचेपर्यंत अंतर्वस्त्रात ठीबकसिंचन सुरू झालं होतं. एक मस्त चकाचक मेकअप केलेली मुलगी बाहेर आली आणि ती आरश्यापाशी जाऊन सिंकमधे हात धुवायला उभी राहिली. इतकी नेटस मुलगी म्हणजे तिने माझ्यासाठी आतमधे संडासचे भांडे स्वच्छ सोडले असेल अश्या माझ्या बावळट अपेक्षा होत्या. ती बाहेर आल्यावर मी येडचापासारखं तिच्याकडे बघून एक स्मितहास्य फेकलं आणि आत गेल्यावर माझा तोच सुहास चेहरा अक्राळविक्राळ दिसायला लागला.
मी टॉईलेट क्युबिकलच्या आत गेले तर तिथे कचरापेटीचे आ वासून उघड्या पडलेल्या भांड्यात रक्ताने भरलेले पॅड आणि टिश्यू माझ्या स्वागताला पंचारती घेऊन हजर होते. तेही कमी म्हणून टॉईलेट पॉटचे झाकण खालीच आणि त्यावर लाल रंगाचे पाणी सांडलेले होते. मी प्रेग्नंट होते. मला ते सहनच झालं नाही. संपूर्ण लादीवर पाणीच पाणी. सगळे ओले रक्ताळलेले घाण वासयुक्त गिळगिळीत. त्या बुळबुळाटाकडे पाहून वानखेडे स्टेडियमधले टॉईलेट आठवले. असेच घाण गचाळ गटार टॉईलेट्स, ओतायला पाणी नाही, देमार गर्दी, रडणारी पोरं अशी परिस्थिती मी एका मॅचला गेले होते तेव्हा अनुभवली होती. आधार घ्यायला बाजूच्या भिंतीवर हात टेकायलाही घाण वाटते अश्यावेळी. मला ओकायला होईलसं झालं आणि तिथे त्या हगुरड्यावर बसायचं ह्या कल्पनेनं जी शिसारी आली ती मी तिरमिरत बाहेर आले आणि त्या मुलीला सगळ्यांच्या समोर जोरद्दार झाडले. तू जी काय घाण आत टाकली आहेस तो हगुरडा आधी नीट साफ कर त्याशिवाय तू बाहेर कशी जातेस ते बघते. तिला ते अनपेक्षित होते. ती आधी बधली नाही. पण बाकीच्या स्त्रियाही तिच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहू लागल्यावर मिस टिकटॉक टिकटॉकने नमते घेतले. आत जाऊन थोडे पाणी टाकल्यासारखे करून बाहेर आली.
'' वो टॉईलेटका ढक्कनभी उपर करके रखना.'' तिने केलं मगच मी आत गेले.
अस्वच्छ मुतार्यांची ही अडचण सगळीकडेच आहे आणि त्या मुतार्या लोकांच्या दुर्लक्षाने जास्त घाण होतात. तिथे जाण्यावाचून पर्याय नसतो. लोकांना साध्या आपल्या गूमुतावर पाणी टाकणेही जड जाते. फ्लश असतात ते ओढणे जड जाते. वयस्कर लोकांचा तर किती मोठा प्रश्न आहे. आजारी वयस्कर स्त्रियांना, गरोदर स्त्रियांना तर खाली बसण्यावाचून पर्यायच नसतो त्यांनी काय करावे... त्या बिचार्या हतबल असतात. जे आहे त्यात करून मोकळ्या होतात. बाहेर गेलो की वाटेत सू दाटून फुटून येऊ नये म्हणून समोर आलेल्या कोका कोल्यास पाण्यास नाही म्हणावं लागतं. मग ह्यावर काही पर्याय आहे का?
 कुठेही उभे राहून मुतण्याची सोय पुरषांना असते तशी ती स्त्रियांना नाही ह्याचे वाईट वाटायचे. जागा अस्वच्छ असल्या तरीही पुरूष एक सेकंदात काम तमाम करू शकतो. त्याला मुतण्यासाठी खाली बसावे लागत नाही. यष्टी थांबली एक आडोसा बघून चेन झर्कन खाली केली की पुरूष मोकळा होऊ शकतो. बायांचे वांदेच असतात. अश्यात ' PEEBUDY ' आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. हे सोबत असताना आपण मनसोक्त मोकळेपणी कुठेही गाणी गुणगुणत चक्क ' धार ' मारू शकतो.
प्रवासात हे फार फार उपयोगी. मुलांसाठी म्हातार्या माणसांसाठीही उपयुक्त, असे वाटते. हे कसे वापरायचे त्याचे व्हिडीयोसाईटवरती आहेत. अॅमेझॉनवर २०० रू. ला मिळतं.  २०० रू. १० हे फार महाग आहे वाटतं. पण खेळायला गेल्यावर, व्यायामासाठी गेल्यावर.. मॉलमधे, डिस्कोमधे जिथे जागा अस्वच्छ असतात तिथे हे वापरायला हरकत नाही.
जंतूसंसर्ग होऊन हॉस्पिटलात व्हिव्हळत पडण्याचा ज्यांना अनुभव आहे त्या पूर्वाश्रमीच्या यूटीआयग्रस्त ( युरिन ट्रॅक इन्फेक्शन ) महिलांना हे कळेल पटेल लौकर. जिथे स्वच्छ टॉईलेट असतात तिथे प्रश्नच नाही पण जिथे ते नसतात तिथे शूशू सूसूसू वेगाने आली असेल आणि आता धरण फुटेल अशी परिस्थिती असेल तिथे उभं राहून हे पीबडी आपल्या व्हजायनाला लाऊन आता मुतणे सहजसाध्य झालं आहे. मुतायचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. कित्येकदा मुतायची घाई तोंडापर्यंत आलेली असताना रांगेत आपल्यापुढे उभं राहिलेल्यांना, ' सू कर जरा लौकर मला जायचंय तुझ्या नंतर.. ' हे छूकर मेरे दिलको; ह्या गाण्याच्या चालीत गाऊन आर्जवं करावी लागतात, त्याची आता गरज पडणार नाही. आपल्याकडे चार चाकी, दुचाकी वाहन असेल तर सार्वजनिक मुतार्यांच्या इथे न थांबता गार गार हवेत रस्त्याच्या कडेला, झाडाच्या सावलीत झाडांच्या मुळाला पाणी घालण्याचे काम पीबडीच्या साथीने करता येईल.
पीबडी सारखे अनेक चांगले पण स्वस्त पर्याय भविष्यात येतील अशी आशा आहे. तसं काही वर्षांपूर्वी असतं तर त्या पीजींचे संडास मी कधीही धुतले नसते उभ्यानेच सू केली असती आणि त्यांना त्यांच्याच वासाच सडू बसू दिले असते. ह्यांनी त्यांच्या व्हिडीयोत सांगितलं आहे, हे स्त्रीमुक्तीबद्दल नसून हायजिन स्वच्छतेबद्दल आहे. खरंय ते. वापरून पहा मी ऑर्डर केलं आहे.
http://www.peebuddy.in/



Comments

  1. रेणुके तुला साष्टांग दंडवत... अश्या विषयावर इतकं सडेतोड लिहिता येणं... खरंच हे येऱ्या गबाळ्याचं काम नक्कीच नाही...मनापासून शुभेच्छा अभिनंदन ..👍👍👍👌💐

    ReplyDelete
  2. मोठ्या गंभीर विषयाला हात घातलास तू। 100 नाही 200 टक्के अशीच परिस्थिती असते
    अगदी खरं आहे
    स्वतः ची जबाबदारीच कळत नाही तर दुसऱ्याचा के विचार करणार हे लोकं

    ReplyDelete
  3. मोठ्या गंभीर विषयाला हात घातलास तू। 100 नाही 200 टक्के अशीच परिस्थिती असते
    अगदी खरं आहे
    स्वतः ची जबाबदारीच कळत नाही तर दुसऱ्याचा के विचार करणार हे लोकं

    ReplyDelete

Post a Comment