बार्बी

खरोखर लहान होते तेव्हा कुण्या नातेवाईकाने मला एक बार्बी डॉल भेट दिली होती. मला खेळणी फार मिळायचीच नाही त्यामुळे कोण आनंद झाला होता. मी हरखून गेले होते. माझ्याकडे स्केचपेन्स होते. तिचा मेकअप करत असताना मला हे माहीत नव्हतं की ते मार्क्स बाहुलीच्या तोंडावर कायम राहणार आहेत. तिला आंघोळ घातली. तिच्या केसांना मी तेल लावलं आणि तिला मी रंगवलं. त्यानंतर सुंदर दिसण्याविषयकचे जे खांब पुरले गेलेले आहेत तशी न दिसता ती पाहणार्यांच्यादृष्टीने विदृप दिसू लागली. मी जे केलं त्याने मात्र तिच्याशी माझा बंध निर्माण झाला होता. ती मला अजून आवडू लागली.
एक दिवस मात्र तिच्या अंगावरचे कपडेही गायब झाले. मी कापले असतील. मला तिच्यासाठी नवे कपडे करायचे असतील बहुदा. किंवा तिचे आहेत ते कपडे उगाच काढून टाकावे असं वाटलं असेल. ती उघडी नागडी बार्बी माझ्या पालकांना दिसली आणि मला सुनावण्यात आलं. यापुढे तुला एकही खेळ मिळणार नाही. बार्बी कोपलीच जणू माझ्यावर.
खरंच त्या बाहुलीशी न खेळता मी तिला तसंच प्लास्टिकच्या आवरणात शोभेला ठेऊन द्यायला हवं होतं. कारण माझे पालक जे बोलले ते त्यांनी निभावलं. मला लहानपणी बाजारतला एकही खेळ, बॉक्स गेम आणून दिल्याचं स्मरत नाही. किंमत नाही मुलांना.. किती मोठी किंमत मोजली मी दिलेल्या खेळण्याची किंमत न केल्याबद्दल. आज ह्याच बार्बीबाहुल्यांना तयार करण्याचे विविध कॉन्सेप्टचे तयार किट मी जेव्हा दुकानांमध्ये पाहते, तेव्हा वाटतं खरंच काय चूक केली होती मी? एकदा पाणीही आलं होतं डोळ्यात त्या बाहुलीकडे पाहून. लगेच कुत्सित हसलेही. मेलोड्रमॅटिक भावना. रीअॅक्शनरी बिहेविअर.


आज इतके पैसे आहेत माझ्याकडे की हॅम्लीजमधलं अख्खं बार्बी सेक्शन मी विकत घेऊ शकते मनात आणलं तर. पण.. मन नाही ते माझ्याकडे. ते बालपण नाही आता माझ्याकडे. त्या बाहुलीने हरखून जाण्यासारखं इतकं काय आहे, असं वाटावं इतकं मरून गेलेलं आहे चूक बरोबरच्या बडग्यात. चितारलेल्या, उघड्यावाघड्या, केस पिंजारलेल्या, खोटं खोटं वरण भात शिजवून, लाल पिवळे निळे चहा करून आपल्याला ट्रेमधून खाऊपिऊ घालणार्या असंख्य लहान मोठ्या, उघड्या बागड्या, अस्ताव्यस्त, पारोश्याओरोश्या बाहुल्यांच्या घोळक्यात मी बसलेली आहे आणि भान हरपून खेळत्ये आहे, याची मी निव्वळ कल्पना करू शकते. पण मला त्यात सुख नाही. लहान असताना वास्तवात खेळण्यांमध्ये जी जगबुडी असते त्यात पुन्हा घुसता येत नाही. जे झालं ते झालं तो काळ परत आणू शकणार आहोत का, पालक मलाच प्रतिप्रश्न करतात. मग आपण हसायचं हं हं हं. शेअर करावीशी वाटत नसलेली एखादी बाहुली असतेच प्रत्येक लहान मुलीकडे. असावीच नं. हक्कच आहे तो तिचा.
लहान असताना असे अनेक अपराध हातून घडतात 

ज्याची शिक्षा सुनावली गेल्यावर हळूहळू शिक्षा करणार्यांच्या जगात 
आपला हळूहळू प्रवास व्हायला सुरवात होते. 
आपण मोठे होतो. मला बार्बीविषयी आता काहीही वाटत नाही. भयंकर राग येतो मला तिच्या सौंदर्याचा. काही बाबतींत मी फार क्रूर झाले आहे, असं वाटतं मला. त्यात माझा काय दोष? बर्याच लहान मुलांना बर्याच गोष्टी लहानपणी मिळत नाही. तुला हळहळ वाटत्ये त्याचं काय एवढं कौतुक, असं म्हणून मी आजही बार्बीचा विषय डोळ्यासमोर आला की चाबूक काढते.
मला अजूनही त्या उघड्यावाघड्या रंगलेल्या बार्बीची आठवण येते. मला अजूनही तीच्च हवी आहे.

Comments