मी माणूस आहे. ब्राह्मण, ख्रिश्चन, साऊथ वेस्ट नेक्स इंडियन नाही



माझा जन्म ब्राह्मण जातीत झाला ( त्याला मी काय क्रू? ) आणि माझ्या नवर्याचा भंडार्यांमधे. आम्ही दोघंही आडनावांवरून जाती ओळखण्यात सुदैवाने ढ आहोत. आम्हां दोघांनाही जातपात करणार्यांशी बोलायचा कंटाळा येतो. ' असं का.. हे जाणून घेणं कधी महत्वाचं वाटलं नाही का? ' अश्या प्रश्नांनी जातीवरून ज्यांचे शोषण होते किंवा झाले त्याबद्दल कळवळा नसल्याचा निष्कर्ष काढणारे; ज्यांना ह्यात रस नाही त्यांविषयी समाजात हे असंवेदनशील असल्याचा सहज निर्माण करता येणारा भ्रम फैलावण्याचं काम करत असतात. हेही एकप्रकारचं शोषणच आहेत. नशिबाने ह्यावर फार गंभीर विचार सतत न करणार्या सर्व जातीधर्मांचा मित्रपरिवार आहे. तिथे कुणाची मस्करी केली, शिव्या घातल्या तरी त्यामागे जात आहे, असे घाणेरडे संशय कुणी घेत नाही. इथे साधं ब्राह्मण, असं लिहणं म्हणजेही ' तुम्ही माज करता ' हे बोलणं ' ब्राह्मणही मांस मच्छी खात असल्याने ती महाग झाली ', ह्या तोलाचंच मी समजते आणि दणकून मासे चिकन मटण खाते.
मुळात डोक्यात जातीचं भान ठेऊन सतत बोलणारे वागणारे मी अव्हॉईड करते. मला राजकारण, समाजकारण, धर्म ह्यात नाही इंट्रेस्ट. त्यामुळे त्याबद्दलचं जास्त वाचन नाही, समजत नाही. तेव्हा त्यावरून विचारल्या जाणार्या फैरीझाड प्रश्नांना उत्तरं देण्यात मी असमर्थ ठरते. पण हे असमर्थ असणं माहितीच्या अभावी... ती माझी दुर्बलता नव्हे. आपल्या जातीचे प्रश्न, त्यातल्या स्त्री व पुरूषांचे समाजातले स्थान, त्यातल्या कुणाचे साहित्य वाचण्यासारखे आहे, त्यात काय वाचायला मिळेल, क्रांती, समाजसुधारकांचे योगदान ह्याबद्दलच्या शांतपणे चालणार्या चर्चा मला जास्त भावतात. जातीयवाद करणार्यांपासून मी ४०० हात लांब राहते. मला अॅलर्जी आहे असल्या विषयांची. पण ही अॅलर्जी म्हणजे कुणास कमी लेखणं नाहीच.
हे असे अत्याचार माझ्या किंवा माझ्या पूर्वजांच्या वाट्यास आले नाहीत म्हणून मी ह्याबाबत इतकी नॉन चलान्ट राहू शकते, असेही काही म्हणतील. हे मी अमान्य करत नाही. कदाचित माझे त्यानुषंगाने शोषण झाले नाही म्हणून तिथे जास्त लक्ष वेधले गेले नाही. पण म्हणून उच्चवर्णीय समजल्या जाणार्या कोणत्याही स्त्रीस मग ती शहरात असली तरीही तिला कोणत्याच गळचेपीतून, अत्याचारातून झगडत पुढे यावे लागत नसेल? एखादी स्त्री ही तिच्या आसपासात जे घडते त्या अनुभवविश्वाच्या परीघात राहूनच लिहणार.
गंमत वाटते. जे. के रोलिंगने तिचे लहानपणीचे अनुभव आणि त्याला दिलेली अचाट कल्पनाशक्तिची जोड ह्यावर हॅरी पॉटर लिहले तिला कुणी नाही विचारलं की तुम्ही जात धर्म युद्ध अर्थव्यवस्था ह्यावर का लिहीत नाही.. तुम्हांला बै लोकांबद्दल काही कळवळाच नाही? हे किती खुळचट आहे.., असं कधी असतं का.. असो.
उच्चवर्णीय आमचे शोषण करतात, अशी बोंब मारणारे महागड्या गाड्या घेऊन फिरणारे, चांगलं शिकलेले व टवाळ्या करणारे अनेक जातीयवादी रडे आसपास दिसतात. जातीच्या राजकारणात खरंच भरडल्या जाणार्या कित्येक गरीबांना व सामान्य माणसांना आपल्या जातीतल्या लोकांच्या रक्षणासाठी न्यायव्यवस्थेने काय कायदे बनवलेले आहेत ह्याचीही अनेकदा कल्पना नसते. किंवा ती असली तरी त्याचा फायदा आत्मबचावासाठी करण्यापासून विविध गोष्टी त्यांना मागे खेचत असतात.
माझा विकासवर जीव जडला तेव्हा तो कोणत्या जातीचा असा विचार मी त्याला ५०० वेळा प्रपोज करतानाही मनात आला नाही. पण... जेव्हा मी याविषयी घरी जाहीर केलं तेव्हा..
च्यायला काहीच झालं नाही. मी काकाकाकूंची अतीलाडकी असल्यानं मला तीन मिनिटात परवानगी मिळाली. पळून जाऊन लग्न करणं. विरह, चोरून पत्र, चोरून फोन असं काही सुख पालकांनी मिळू दिलं नाही.
विकास माझ्या बाल्कनीखाली ताटकळत उभा आहे, असं चित्र मला कद्दी कद्दी दिसलं नाही. (एकदा मी त्याच्यासाठी सहा तास थांबले होते दादर ठेशनला तेव्हा तो फोन बंद करून घरात झोपला होता.  ह्या भंडार्याने मला वाट पहायला लाऊन माझ्यावर फार अन्याय केला.
मी ब्राह्मणेतर माणसाशी लग्न करू नये अशी पालकांची इच्छा होती. विकासला तर लग्नच करायचं नव्हतं. पण मी त्याच्या आयुष्यात हो की नाही हो की नाही ची त्सूनामी रोज रोज आणू लागल्यावर बिचारा कधी या किनार्यावर तर कधी त्या किनार्यावर जात होता. मग आपली खसकली. मी चक्क काकांना घेऊन विवाह मंडळात गेले आणि नाव नोंदवलं. 

तिथे जायच्या आधी ' मी तुझा छान फोटो काढून देतो. तो दाखवल्यावर तुला खूप छान मुलगा पटकन मिळेल ' असंही विकास मला म्हणाला होता. त्याचा गंमत्या स्वभाव मला इतका बोचेल याची त्याला कल्पना नव्हती. मी चक्क विवाहमंडळात जाईन असं त्याला १०० टक्वे वाटलं नव्हतं. पण त्याच्या होनाहोनावर मला घरच्यांना काहीच सांगता येत नव्हतं. 
काकाकाकू हे माझ्या आजीआजोबांच्या वयाचे. त्यांना हे सगळं झेंगट समजणार नाही आणि ते त्यांना सहनही व्हायचं नाही, हे माझ्या लक्षात आल्यावर मी एक समुद्र रडून विकासला अच्छा टाटाबायबाय म्हणण्याचा निर्णय घेतला. पण मग त्याच दिवशी संध्याकाशी त्याने मला बॅण्डस्टॅडला बोलावलं आणि तुझ्याशी नै तर अजून कुणाशी मी लग्न करणार असं खोचकपणे सांगितलं. अहाहा काय संध्याकाळ होती ती.. मग ते घरात सांगितल्यावर एक मिनी भूकंप झाला. पण काकांचा माझ्याबाबतीतला हळवेपण होकारात बदलला. काळेची खोत झाले आणि कधीकधीही परत जात हा विषय निघालाच नाही. 
माझ्या पालकांना माझ्यापेक्षाही माझा नवरा खूप प्रिय होता. गेल्या १३ वर्षांत विकास हा आमच्या घरातला एक अविभाज्य भाग बनलेला आहे. एरव्ही खूप कर्मठ वाटणार्या माझ्या काकूने जावई दुसर्या जातीचा आहे, याविषयी न केलेली तक्रार ही मला तिची तडजोड वाटत नाही. तिला गेल्या ८ १० वर्षांपासून पार्किन्सन्सचा विकार होता. जिणे मुष्कील झालेले होते. पण असे असतानाही मला गोडाच्या शिर्याची विशेष आवड नसताना मी जेव्हा माहेरी जाई तेव्हा तो जावयासाठी नेहमी तयार असे. विकास आला नाही तर तो डब्यात भरून दिलाच्च जायचा.
रवा भाजताना हात भरून यायचा तेव्हा काकू तो लादीपोतं करणार्या आरतीकडून परतून घेत असे. स्वयंपाक घरात कुणाकुणालाही हात लाऊ न देणारी माझी काकू आरतीच्या हातचे कसे खायचे असले फालतू विचार कधीही करत नव्हती. पाठीत वाकल्याने तिला ओट्यावर गॅसवर ठेवलेल्या भांड्यातलं दिसायचं नाही. पण विकास येणार म्हंटल्यावर तिच्या अंगात काय ते संचारे आणि मदतीला कुणी असो नसो ती शिरा करतच असे. विकासला आवडतं म्हणून काका आईस्क्रीम आणत. मला फोन केल्यावर माझ्याआधी त्याची चौकशी करत..
माझ्या माहेरी घेतल्या जाणार्या प्रत्येक निर्णयात विकासचं मत महत्वाचं मानलं जाई. मी कधी नाही म्हणाले तर विकास हो म्हणतोय ना.. मग तू का ऐकत नाहीस हे एक नवीन सुरू झालेलं होतं. विकास आणि माझ्या पालकांमधे निर्माण झालेला बंध याच्याशी जातीचं काहीच देणंघेणं नव्हतं. माणूस त्याच्या स्वभावाने खाली किंवा वर जातो जातीने नाही.
सासरी अजून वेगळंच. तिथे सारे देव न मानणारे. माणसात देव पहा आधी ह्याबाबत कट्टर. तिथे मी ब्राह्मणची आता भंडारी झाले आणि बघा आता कशी मासे खाते चुटूचुटू ह्यावरून कधीही टवाळी झाली नाही. न कधी मी उच्चवर्णिय समजल्या जाणार्या जातीतून आले आहे म्हणून छळ झाला. ही ब्राह्मण ब्राह्मण असे टोचून टोचून बोलून एका डॉक्टरशी लग्न केलेल्या माझ्या एका एमडी डॉक्टर मामेबहिणीला मात्र ह्या जातीच्या भयानक विखारी राजकारणाला तोंड द्यावं लागलं होतं.
प्रेमविवाह झाल्यावर तिचा नवरा हिच्या पगारावर घर सोपवून तिच्याच पैशावर परदेशात पुढील शिक्षणासाठी शिकायला गेला. तो गेल्यावर झाडूपोते करायला येणारी बाईही तिच्या सासरच्यांनी काढून टाकली आणि तिला त्यात लोटले. पहाटे उठून सार्यांचा स्वयंपाक करून लादी पोतं भांडी करून मग ती प्रॅक्टिसला हॉस्पिटलमध्ये जात होती. सासू नणंदेचे टोमणे टवाळक्या नवर्यावरच्या प्रेमापोटी तोंड दाबून सहन करत होती. एक दिवस आपली सुटका होईल म्हणून भाबड्या आशेने नवर्याची वाट पहात होती.
पाच वर्षांना नवरा परतल्यावर त्याने तिथेच एकीशी सूत जमवले असल्याचे समजले आणि ती आयुष्यातून उठली. वेगळ्या जातीत लग्न केले म्हणून ह्या उच्चशिक्षित मुलीवर रागावलेले तिचे वडील पुढचे हे सारे कळल्यावर अजूनच ढासळले. केवळ ब्राह्मण म्हणून वाट्याला आलेला इतका रोष पाच सहा वर्ष काढून अखेर घटस्फोट घेऊन काही मूल बाळ न होता संसार असाच अर्धवट सोडून माझ्या ह्या बहिणीला परत यावे लागले. ती आजही अविवाहीतच आहे. का ते माहीत नाही. कुणी तिला ह्या प्रश्नावरून छेडायला जात नाही. तिचे वडील म्हणजे माझ्या काकूचे भाऊ. माझ्या ह्या ताईच्या जन्मापासून ह्या आत्याने बरेच कोडकौतुक केले होते. तिच्यावर गुदरलेले प्रसंग पाहून माझी काकू जे आपल्या भाचीसोबत झाले ते पुतणीसोबत होऊ नये, असा विचार माझ्या लग्नाच्या वेळेस करत होती.. तिचे काही चुकले नव्हते. काकांनी तेव्हा तिला आपल्याच घरात अमकीचे काय झाले... तीही ब्राह्मणच होती गो. अगदी हाल हाल केले नर्याने तिचे.. असं काही नाही माणसं कशी असतात त्यावर सारं अवलंबून. शेवटी आपले नशीब असे सांगत तिचे मन वळवले व जे माझ्या नवर्याने नंतर जिंकले.
एका समारंभाला गेले होते. तिथे सासूबाईंनी एका नातलगाच्या सुनेशी माझी ओळख करून दिली आणि त्या गेल्या. ही मुलगी अॅडव्हाेकेट होती. तिने सगळ्यात आधी माझं माहेरचं आडनाव विचारलं आणि नंतर काळे म्हणजे ब्राह्मण ना.. असंही विचारलं. असा प्रश्न आला कीच माझा त्या माणसाशी बोलण्यातला रस संपून जातो. हे पहिलं आधी जात विचारणं.. तू सीकेपी ना... तू मराठा ना.... तू सोनार ना.... तू देशस्थ मी कोकणस्थ हे गंमतीने नव्हे एक मूलभूत माहिती म्हणून अगदी प्रामाणिक निष्पाप चेहरा करून विचारणारे भेटतात तेव्हा सॉलिड सटकते. मग अजून एकजण आली. तू साऊथ इंडियन आहेस का.. नाही. मग ख्रिश्चन.. नाही.. मग अय्या.............. ब्राह्मण वाटत नाहीस... स्साला ब्राह्मण गोरेच असावेत हा काय नियम आहे का? त्यांना ब्लिंक होणारे शिंग असतात. का झाडून सारे ब्राह्मण धार्मिक असतात. त्यांनी नॉनव्हेज खाल्लं तर त्यांना जानवं घालता येत नै का?
मी म्हणाले, मी माणूस आहे हे पुरेसं नाहीये का? वैताग स्साला. डोळे मोठे करून तरातरा निघून गेल्या त्या बै. मी पण नाक वाकडं करत हू करत गेले तिच्यापेक्षा जास्त जोरात तरातरा.

Comments

  1. Khupach chann aahe lekh ani tumchi manuski chi paribhasha pan.

    ReplyDelete
  2. खरच तुझा अभिमान च वाटतो...👍👍👍👌💐

    ReplyDelete
  3. Hi ...really experienced since last 37 years. Specifically when you are a child of two different cast couples. It sucks..
    त्यात मी सावळ्या रंगाची..त्यात जुळ्या बहिणी..त्यात उंचीला कमी..त्यामुळे जन्मा पासून आम्ही कश्या जगण्यास लायक नाही हेच नातेवाईकांनी पटवण्याचा प्रयत्न केला.. आजही करत आहेत.
    पण आम्ही दोघी खरंच खूप आत्मविश्वासाने जगत आहोत. आणि मला तर वाटतं की लोकांच्या अशा वागण्याने आमचा आत्मविश्वास वेळोवेळी वाढतच आहे.

    ReplyDelete

Post a Comment