स्वप्न सॅण्डविच

काल रात्री स्वप्न पडलं. किती छान होतं ते, जिने मेरा दिल लुटेया ओहों जिने मेनु मार सुटेयां असं अगदी. मी मटण सॅण्डविच आणि एक कटिंग चाय गरम विकते आहे. अतिशय प्रेमाने आपल्याहाती बनवलेली लुसलुशीत यमयमीत मटण सॅण्डविच. तुफानी खप. तशी ती कुणीही बनवू शकतात पण ती मी बनवत असल्याने.. बरं का मी हे महत्वाचं.. त्याला एक वेगळंच वलय प्राप्त झालं आहे. ( माझीच लाल  ) लोकं तोबा बाबाबा गर्दी करत आहेत. मला हवा तितका वेळ सॅण्डविच बनवून मग कंटाळा आला की आता पुरे म्हणायचं. दुकान बंद बंद असा पुणेकरी माज करून मी वाटेल तेव्हा दुकान बंद करून सुट्टी खेळत आहे. बरं हे मटण सॅण्डविच असं आहे की माणूस कितीही आणि कितीही वेळ ते खाऊ शकतो. त्यामुळे ओघ ओघ पैसेच पैसे पैसेच पैसे. 
मी केवळ मटण सॅण्डविचेस विकून आणि त्याच्या खचाखचा ब्रांचा टाकून फचाफच पैसा खेचून जाम जाम श्रीमंत झाले आहे आणि मला आवडणारे पाच सहा लाखाचे सॉलिटेएर घेऊन तनिष्कमधून दिमाखात बाहेर पडले आहे, ह्या नोटवर ते स्वप्नं संपलं. उठल्यावर मी कान चाचपून पाहिले. कानात ६०० रूपयाचे खोटे पण मस्त चमकणारे सॉलिटेअर होते. हरकत नाही.
मी आरश्यापुढे जाऊन उभी राहिले. केस पिंजारलेले. सर्दी झालेली असल्यानं, रात्री एसीत नाकाच्या पायपातून बाहेर येणारा एक ओघळ वाळून त्याचा छान गोळेदार पिवळाघट्ट मेकडू तयार झालेला दिसत होता नाकाच्या भोकाच्या परिघावर. तो मी भोकाच्या आत बोटं घालून कोरून कोरून बाहेर काढला आणि त्याकडे दोनतीन सेकंद शांतपणे पहातही बसले. मला नाकात बोटं घालायला आणि वळकट्या करायला आवडतं ब्वा. मी लहानपणापासून शेंबडी कधीही नव्हते. पण नाक कोरण्यात एक अजब सुख असतं. माझा चेहरा हल्ली रात्री मी जागरणं करत असल्याने सुजला होता. डोळे पफले होते. कानातले स्वस्त आणि मस्त सॉलिटेअर छान चमकत होते. 



खरच आपण सॅण्डविच करून विकली तरी आरामात जगू शकतो नाही का.. कश्याला इतकी मारामार करू करू मरू मरू जगायचं ते.. महाबळेश्वरला एमटीडीसीच्या बाहेरच्या रस्त्यावर एक छोटंसं दुकान आहेत. तिथे वडापाव, भजी आणि मस्त चहा विकला जातो. स्ट्रॉबेरीवाले तिथे फेरी मारतात. त्या लालभडक स्ट्रॉबेरी कोवळ्या सुती उन्हात मस्त चमकत असतात. ते विकणार्यांच्या चहा गाळणार्यांच्या भजी तळणार्यांच्या चेहर्यावर एक शांत भाव असतो. मुंबईतल्या भागादौडीने आपल्यासारख्यांच्या चेहर्याला प्रप्त झालेली वचवच नसते. किती सुखाचं असावं ते साधं आयुष्य.. का राहत्येय मी ह्या शहरात? सगळं सोडून जावं आणि कुठल्यातरी थंडगार शहरात एखाद्या दरीच्या टोकावर, नदीच्या काठावर बसावं सॅण्डविचसाठी ब्रेडच्या कडा कापत, त्यावर मस्क्याचा मुलामा देत आणि त्यात मटणाचे गुलाबी मांस टोचतच रहावं. मग रात्री मस्त सिगरेटचे झुरके घेत हाडात घुसलेल्या थंडीला शेकून खावं. हे सुख तर त्या सॉलिटेअरने मिळालेल्या सुखापेक्षाही किती किंमती असेल नाही का.. मोकळी हवा, साधं जगणं. केवळ सेक्सी.
नाही पण मला हवायच्चे सॉलिटेअर, मी पुन्हा आरश्यातल्या प्रतिबिंबाला सांगितलं. कानातले ते सहाशे रूपयांचे खडे काढून ड्रेसरच्या आत फेकले. मग स्वयंपाकघरात आले आणि कुकरमधे मटण टाकून शिजायला ठेवलं. मुलाचा शाळेचा डबा धुऊन ठेवला आणि नवर्याला ' ब्रेड आणा उठा आता शाळेची वेळ झालीये लेकाची ' म्हणून जोरदार हाळी दिली. आयांच्या अश्या हाळ्या झोपलेल्या घरांच्या पेकाटात लाथ घालून उठण्याची ताकद ठेवतात. उद्या डब्यात मटण सॅण्डविच हवं आहे, असं काल रात्री फर्मान सुनावण्यात आलं होतं एका आईला. मधल्या झोपेत मटण सॅण्डविचचा बिझनेस करून आले मी चक्क असं असतं एकेक. कुणाचं काय तर कुणाचं काय. 

Comments