वाईज वाईज



एखादा वाद झाल्यानंतर जे झालं ते तिथल्या तिथे सोडून पुढे जाणं हे का जमत नसावं? सतत त्या माणसावर डूख ठेऊन त्याच्याविरोधात लिहणं किंवा आपण जे काही नवं, सर्जक काम करत आहोत ते पाहिलं की समोरच्यांची कशी जिरेल, कसा त्यांचा काटा मोडेल हे सांगणही मन कुपोषित असण्याचं लक्षण वाटतं जर तेच तेच सारखं व्यक्त होऊ लागल्यास.
एखादा खूपच वाईट वाटणारा माणूस हा आपल्याला इथे फेसबुकवर दिसतो तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा कितिसा भाग असावा.. शितावरून भाताची परीक्षा करता येते हे जर खरे असेल तर इथे येणारी व्यक्तिची प्रतिमा ही अर्थातच त्याच्या स्वभावाचे काही कंगोरे उलगडून दाखवणारी असते. पण त्याही पलिकडे माणूस असतो जो आपल्याला माहीत नसतो. अर्थात समोरचा कसा आहे हे सारे आपल्याला समजून घ्यायचंही नसतं कारण आपल्याला प्रत्येकात परिवर्तन घडवायचे आहे, असंही काही नसतं ना हरेकाशी आपल्याला लग्न कराच्चं असतं. बरं ते घडवणारे आपण कोण असतो मोठे शाणे.
पण एखादा माणूस कसा आहे हे पक्क कळलं, म्हणजे तो ग्रह म्हणा वा समजूत पक्की झाली आणि त्याचं आपलं काही जमणार नाही हे निश्चित झालं की मग त्यापासून अंतर किती ठेवायचं हेही कळतंच की. मग परत परत त्या माणसाचा उद्धार करून त्याविषयक निनावी लिहून निगेटिव्ह लिहून काय मिळेल. आपण काही देव नाही संत नाहीच नाही. कुणाला शालजोडी सूटजोडी वनपीसजोडी असं द्यायला आपण हे करतो कैकदा पण असे न व्हावे की ज्याचा तिरस्कार करतो राग करतो तो सतत व्यक्त केल्याशिवाय जगणे श्वास घेणे श्वास सोडणे घोरणे पादणे ह्या नैसर्गिक क्रियाही करण्यास मुश्कील व्हाव्यात.
आपल्याला एखादा नाही आवडत त्याचा विषय सोडून द्यायचा एका क्षणी. आपला विरोध हा त्या व्यक्तिच्या आपणास न पटणार्या वृत्तीला असतो. त्यात काही फरक पडत नसेल तर त्या वाटेला न जाणे हेच योग्य वाटतं.
माझ्या एका बहिणीचा किस्सा आठवला. मामेबहीण माझी. मी तिच्यावर जिवापाड प्रेम केलं पण तिच्यात भयंकर मत्सर होता. मला तिच्याविषयी काय वाटतं ते आम्ही एकत्र घालवलेले सारे सुंदर क्षण तिने त्यात अक्षरश: जाळून टाकले. मग एकदा मला भडकून म्हणाल होती, तू एकटीच राहशील आणि एकटीच मरशील. मी एकटीच राहीन मला माहीत आहे ते. कोणाला टळलं आहे ते? आपण दुकटे तिकटे असतो हे सारे आभासच तर असतात नं. मला अजूनही वाटत नाही की बाबा नाहीत काकू नाहीये ते. मग ते होते तेव्हाही ते होते हा भासच तर असेल का..
त्याच बहिणीने मग विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नंतर काहीच दिवसांत मी तिच्या गावाला हजर होते तिला आधार द्यायला. मरणाच्या दारात परत जाऊन आल्यानंतर तिच्यात जास्त विष भिनले की काय माहीत नाही पण ह्या घटनेनंतरच तिचे विषारी वागणे खूप वाढले आणि मी तिला कायमचे सोडून दिले. १५ वर्षं झाली मी तिला पाहिले नाही न आता इच्छा होते. तिच्यावर फार प्रेम केलं होतं मी पण तिने इतके ताणले की सारे धागे तुटून गेले. आज वाटतं मी एकटी राहीन म्हणून ती तळतळाट देऊन गेली, विष घेताना किती एकटी असहाय्य झाली असेल बिचारी. मला शाप देताना ती स्वत: किती एकाकी एकटी आहे, हे विसरली होती. डॉक्टरांनी तिच्या शरीरात पसरलेलं विष बाहेर काढलं पण मनात जे विष पसरलं होतं त्यातून तिचा घात झाल्याचं नंतर बर्याच प्रसंगातून जाणवत राहिलं. मला समजू शकणारी माझ्यावर माया करणारी ती बहीण आणि माझा दुस्वास करणारी ही स्त्री ह्यांच्यात काहीच साधर्म्य नव्हते. मी तिला पुन्हा कधीही समजवायला गेले नाही. माझी पुढची पंधरी वर्षं मला वाया घालवायची नव्हती म्हणून.

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, हे खरंच तर आहे. आपले विरोध मारामार्या एका ठरावीक मर्यादेला ओलांडून पुढे चालल्या आहेत, असं वाटू लागलं तर सतत समोरच्याच्या पाप्या घेणं सोडून शांतपणे तिथून निघून जाणं आणि ओठ टेकवायला योग्य गाल शोधणं हेच वाईज वाईज. 

Comments

  1. ABsolutely. मला उत्तमच अनुभव आहे याचा. आणि बहुधा प्रत्येकालाच येतो.
    Well said.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. असे अनुभव येण्यासाठी आधी थोडे आपलेच रक्त जळावे लागते मग जरा डोक्यात प्रकाश पडतो.

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment