.. आणि मोबाईल सापडला

पहाटेचं स्वप्न
.
.
.
मी - जाने जा ढुंढते फिर रही हू तुझे रात दिन मै यहॉं से वहॉं, मुझको आवाज दो छुप गये हो सनम तुम कहॉं...
सेलफोन - ( फ्रीजमधून) मै यहाSSSS
मी - तुम कहॉं....
सेलफोन ( कबीरच्या लेगोबॉक्समधून ) मै यहाsssss
मी - तुम कहॉं....
सेलफोन ( कबीरच्या शाळेच्या दप्तरातून ) मै यहाsssss
..
स्वप्नांचा मी फार विचार करत नाही. ह्यातल्या बर्याचश्या जागा काल शोधून झाल्या होत्या.. कशाला त्या लेकराला त्रास द्या उगाच. माझं गोलूमोलू ते. आईसारखं भोळंभाबडंयेडंगबाडं त्ये..
सकाळी वॉटरबॉटल ठेवायला गेले आणि दप्तराच्या साईडपॉकेटमधून स्वप्नातून दृष्टांत देणारा फोन खरंच हाती आला. ऑं.... फोन म्हणाला, ' तेरी दुनिया मे जिने सें ये बेहेतर है के मर जाये..'
कबीssssssssssssर
मला खरंच नाही माहीत फोन इथे कसा आला ते खरंच. खरंच आही मी खरंच सांगतोय बाबा. लगेच रडायला सुर्वात. हुकमी अस्त्रच आहे रडणं. त्यातून शाळेत जाण्यासाठी आता त्याला बायबाय करत असताना हे सारं कळल्याने चांगली खरडपट्टी काढायला वेळही नव्हता माझ्या हातात. त्यामुळे तिथे पटकन रडून सुटका करून घेणं हे ओळखण्याइतपत 'आजकालची' पिढी हुषार झालेली आहेच. आमच्यावेळेस असं नव्हतं. आम्ही फक्त एकदा आमच्या बाबांच्या घरी रहायला आलेल्या तरूण उमद्या पीजीच्या गादीखालचा पोर्नअंक त्यातल्या उफाड्याच्या स्त्रिया कश्या दिसतात हे मैत्रिणींना दाखवून त्यांना शॉक देण्यासाठी हळूच दप्तरातून नेला होता. तो त्या पाजी पीजीला कधीही परत केला नाही. हे सारं स्मार्टली करायचं असतं.. पण कबीरने हे पहिलीतच चालू केल्याने त्याला हा घोटाळा नीट हॅण्डल करायला जमलेलं नाही. असो. शिकले हुलूहुलू.
काल हा शाळेतून घरी आला तेव्हा विचारलं काय रे, डबा तसाच परत आला. तो डबेवाला लावलाय ते त्याला शाळा ते घर परत घर ते शाळा असा सायकल चालवून व्यायाम व्हावा म्हणून...... आही उद्या खातो पॉमिश. उद्यापासून खातो ना. ऐकतेच नाही तू माझं. हमममम.
अरे वा.. तारीख लिहून वह्यांची पान आजही कोरी.. आज काहीच शिकवलं नाही शाळेत... Wow कबीर मज्जा ना.. आमच्यावेळी शाळेत बाई शिकवायच्या, त्या जे शिकवतात ते आधीच माहीत असावं, सगळ्या प्रश्नांची आपणच उत्तर द्यावीत असं एक वेड होतं मला. मीच सगळी उत्तरं देई म्हणून बाकींच्यांना राग येई म्हणून बाईंनी पुढचे दोन धडे रेणुका एकही शंका विचारणार नाही हात वर करणार नाही उत्तर देणार नाही, असा फतवा काढला होता. कबीरचं असं काही नाहीये. अश्या फालतू स्पर्धेचं टेंशन तो घेत नाही. द्या बापडे सगळे जण उत्तर द्या. मी शांत बसून ऐकतो, अश्या विचारांचा तो आहे.
का लिहलं नाहीस....काल माझा आवाज चढला होता. फोन मिळत नसल्याने आधीच जरा वैतागले होते. आही ऐक... मी ना तोडंसं लिल्लं. तोडं हा... का थोडं का लिहलं, मी. मी ए ना मी तोडा टाईमपास करत होता आही. त्यावर मला काल हसू आलं मी त्याचा गालगुच्चा घेतला प्रेमाने. पण हा पोरगा खरंच म्हणजे सीरीयसली टाईमपास करत होता हे माझ्यासारख्या भोळ्याभाबड्या बावळ्या अडाणी आईस कसे कळावे? दिवसभर फोन शोधशोधून एकदाही ह्या कारट्यानेे माझा फोन शाळेत नेला असेल, असं वाटलं नाही. त्यातून घरी आल्यावर लेकाने मला मोजून अडीच मिनिटे फोन शोधायला मदतही केलीन. मधे मधे मी फोनला हातच लावला नाही.. मी खलंच घेतला नाही, असा बचाव चालूच होता. हा माझा फोन घेऊन शाळेत गेला होता, हे ह्याच्या लक्षातही राहिलं नव्हतं. किती निरागसं असतात मुले. मुले म्हणजे देवाघरची फुले. सणासण्ण चापट्या माराव्या वाटतात असे ह्यांचे कुले.




Comments

  1. आई शप्पथ काय लिहितेस ग रेणुके ...👌👌👌💐

    ReplyDelete
  2. संजीव उपाध्ये8 November 2017 at 00:24

    भारीच..!

    ReplyDelete
  3. मुले म्हणजे देवाघरची फुले. सणासण्ण चापट्या माराव्या वाटतात असे ह्यांचे कुले.
    >>> हहलो 😅😂

    ReplyDelete

Post a Comment