थेरडा

माझी चुलत आत्या. तिचा नवरा तिला खूप हाणायचा. घाणेरडं नको नको ते बोलायचा. एकुणच स्त्रियांविषयक त्याच्या मनात डोळ्यात डोक्यात घाण भरलेली होती. दिसायचाही मळकट. आत्याला तिच्या मैत्रिणींना कुठल्याही बाईला सतत कुत्री कुत्री म्हणून येताजाता चारचौघांत बायकोला कानकोंडं करायचा. वर्षं सरली. दारू सिगरेट ह्यात पडलेला असायचा. पेश्याने वकील होता पण नालायक होता. कायद्याची दहशत दाखवून ह्याला छेड त्याला छेड असले उद्योग करायचे आणि रात्री कुठल्या तरी लेडीज बारमध्ये जाऊन लोळायचा. हळूहळू लोकं त्याच्यापासून लांब झाली. जी जवळ राहिली ती सारी त्याच्यासारखीच आळशी, व्यसनी, मवाली ज्यांना कुणीही विचारत नाही अश्या वृत्तीची चार डोकी असत. ही चार डोकी म्हणजे बारकी बारकी गटारं. ह्या वकिलाच्या मोठ्या गटाराला येऊन मिळालेली. त्याच्यासारखीच सडकी होती. आत्याला ह्याचे फार वाईट वाटे. नवर्याचे नाव घेतले तरी लोकं बोलायचं टाळतात. ह्या नवर्याच्या गळ्यात अगदी धोंडा टाकून त्याला विहिरीत का न टाकून द्यावे असे तिला वाटे.
एक दिवस तिचा हा नवरा रात्री खूप उशीरा घरी आला आणि त्याने घरात असल्या नसल्या लोकांना फैलावर घेतले. बायकोला मारहाण सुरू केली. हेही काय कमी झाले म्हणून त्याने त्याच्या आईलाही जोरात ढकलेले आणि म्हातारी भिंतीवर जाऊन चांगलीच आदळली. दुसर्या दिवशी तिने आपल्या सुनेला जवळ बोलावले आणि सांगितले, जी माणसं दुसर्यांना सतत घाण बोलत असतात त्यांना ती घाण प्रथम आपल्या स्वत:च्या तोंडात घ्यावी लागते. ती आपल्या कर्माने मरतात. असली औलाद खूप वर्षं जगली जरी तरी त्या जगण्याला तसाही काही फायदा नसतो. मी त्याची आई आहे माझे नशीब फुटके आहे अजून काय सांगू. मला माफ कर.
आत्याने त्या थेरड्याला त्याच्या अगदी उतार वयात सोडून दिले आणि ती तिच्या भावाकडे रहायला आली. मग तो जगला की मेला तिने कधी वास्तपुस्त ठेवली नाही. कुणीही आपल्यावर मनापासून प्रेम करणारे राहिले नाही हे त्याला सतत आतून खात राही आणि तो रात्रीबेरात्री जुनीपानी गाणी विव्हळत एक खंबा कवटाळून कुठल्यातरी कोपर्यात पडलेला असायचा असे कानावर आले होते. एकट्या पडलेल्या लोकांबद्दल वाटणारी सहानुभूती प्रेमही कधी त्याच्या वाट्याला आले नाही. वाट्यास आली ती फक्त लोकांना त्याच्याबद्दल वाटणारी घृणा. कधी चुकून विषय निघालाच तर नवरा कसा हरामखोर होता ह्याच आठवणी आत्याकडे आजही आहेत.

Comments