गवार

आपल्या घरी भाज्या फळं कशी येतात कुठून ह्याचा आपलं लग्नं होईपर्यंत काही पत्ता लागत नसतो. हो पण परिस्थिती बेतास बात असेल, वय अजाणते असल्यापासून कमावण्याची अंगावर जबाबदारी आली असेल किंवा बाजारहाट करण्यासाठी आईबाबा सोबत नेत असल्यास भाजीवाल्यासोबत होत असलेल्या घासाघासीत रस घेतलेला असेल तर भाज्या फळांच्या किंमती लक्षात आलेल्या असतील. तेव्हाच्या किंमतीत आणि आताच्या किंमतीत झालेला चढा फरक लक्षात येतोच. 
सगळ्यांच्या किंमती वाढल्या वाढत जाणार हे सहाजिक आहे असं आपण म्हणतो. पण रोजच्या खायच्या चिजवस्तूंचे इतके महाग असणे भयंकर वाटते. किराणा आणि भाजीपाला घ्यायला बाहेर गेलं की दोन हजारापासून सात आठ हजार असे कसेही पैसे खर्च होऊ लागलेले आहेत. एखादा महागडा ड्रेस घेणं, साडी घेणं आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणं हे आता एका पंक्तीत येऊन बसलं. वयस्करांच्या औषधांचा खर्च वाढला. टेलिफोन, वीज, गॅस ह्या सुविधांचे भाव वाढले. सिगरेट महाग झाली.
बायांचे पगार वाढले.. पण ते ज्या प्रमाणात वाढले तेही त्यांच्या घरातल्यांचे जीवनमान राहणीमान उंचावण्यात काही कामी येत नाही. एखाद्या घरी कामांला जाणार्या स्रीचा पगार १० हजारही असेल तरीही तिला किती काटकसर करावी लागत असेल ह्याची कल्पना करवत नाही. 

काल दोन फ्लॉवर गड्डे, एक दुधी आणि ३०० ग्रॅम गवार ह्यांच्यासाठी मला २०० रू. भाजीवाल्याने सांगितल्यावर जिवाचा कोबी झाली. चार पेरू १०० रू. दीड दोन हजार रूपये खर्च होऊनही भाजीची पिशवी मला मरगळीश वाटत होती. कोथिंबीर जुडी ४० रू. गड्डी आधी मेला ६० सांगत होता. काय हे.. कोथिंबीर वडीत नको पण पोह्या उपम्यावर भुरभुरायला कोथिंबिरीचे सुख घेतानाही आता जरा जपून गो बाय.. असं मन आतून सारखं बोलत असेल तर काय मजा राहिली श्या.. हे खरंच भयानक आहे. रोज हॉटेलात जाऊन पैसे उडवत नाही आपण. पण घरात नीट खातानाही तडजोड करावी लागत असते. आणि आहे त्यातून कोंड्याचा मांडा करून खाल्ला म्हणून मी सुगरण असे म्हणावे लागणे फार चीड आणणारे आहे.
घरी नेहमीप्रमाणे कविता कामाला आली संध्याकाळी. तिचे वडील इस्पितळामध्ये.त्यात सासूही वारली आणि ते पाहून नवर्यालाही हार्ट अटॅक आला. हे सारं एक साथ कसं झालं ते मला माहीत नाहीये. पण हे सारे इस्पितळामध्ये आहेत. चार पाच दिवस सुट्ट्या केल्यावर ती उजाडली.
आसपास कुणी असताना माझे मोठ्याने स्वगत चालू होते. आज दोन फ्लॉवर गड्डे, एक दुधी आणि ३०० ग्रॅम गवार ह्यांच्यासाठी मी २०० रू. दिले. हो ना ताई, कविता म्हणाली. तिला मी तीन हजार रूपये देते महिना. तीन हजार तिला देताना मला जिवावर येतं पण त्यात ती महिना कसा चालवित असेल.. नवरा खूप दारू पिणारा, तिला मारझोड करणारा रेग्युलर. ती एक वेगळीच कथा आहे. सासू जाम छळायची ती मेली ते एक बरे झाले पण नवरा सतत आजारी पडतो आणि दारू पितो म्हणून भरीस भर म्हणून तिला कालच फोन आला होता त्याच्या कंपनीतून, त्याची नोकरी गेली. आराम करा घरी म्हणे. म्हणजे महिन्याची ती सहा हजार रूपयांची आवकही बंद झाली.  

मी तिला विचारलं अगं इतकं सगळं महाग आहे तुला कशी परवडते भाजीबिजी?
ताई मी खरं सांगू का.. आम्ही गेल्या अनेक वर्षांत भाजीच आणली नाही. आम्ही रोज वरण भात खातो. सकाळ संध्याकाळ भात. नाश्ता करतच नाही. पोरं पण हेच दोनवेळेला जेवतात. काय करणार... झोपडपट्टीत राहतो तिथेही भाडंं भरावं लागतं. नवरा तर कसा आहे माहीत आहे तुम्हांला काय करायचं... कुणीतरी माझ्याच कानाखाली खण्णकन आवाज काढावा तसं झालं आणि मला काही परवडत नाहीये ह्याची तिच्यासमोर मी करत असलेली पीरपीर बंदच झाली. माझ्या घरी फ्रीजमधे इथे तिथे काही उरलेलं असेल तर कविता स्वत: शोधून काढते आणि नीट बांधून घरी नेते. तिला दोन मुलं आहेत. तिची एक मुलगी येते अधेमधे माझ्याकडे. काही खायला दिलं तरी लाजत मान खाली घालून नको म्हणते.
गवार बाजारात महाग आहे. पण गवार लोकांना जगात किंमत नाही. त्यांच्या पोटासाठी पोटच्या गोळ्यांसाठी परवडणारी फक्त एकच गोष्ट आहे. तडजोड.

Comments

  1. Ek dum sahi!! Mi job karunhi mahinabhar katkasar karane he tharlel aahe.

    ReplyDelete
  2. वंदन तुला , खूप छान शब्द न शब्द थेट हृदयाचा ठाव घेतात असच लिहीत रहा ..!👌👌👌💐

    ReplyDelete
    Replies
    1. माझं नाव रेणुका खोत आहे वंदना नाही श्याम.

      Delete
  3. एवढ्या महाग होतात भाज्या मुंबईत येईपर्यंत?

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment