बस

त्या म्हातार्या विकलांग अशक्त बाईला
पकडून चौघांनी एका बसमध्ये चढवलं
जगाला तिचा तिचा जगाला काय उपयोग होता म्हणा

एक थकलेलं शरीर लायबलिटी असतं अखेर
आंथरूणावर पडल्या पडल्या वेदनांनी
तडफडताना ती अख्ख्या जगाला शिव्या द्यायची
आता मात्र तिला या जगातून हद्दपार करण्यासाठी बाहेर
ढकललं जातय.

लगेच म्हातारीला तिच्या आंथरूणांच्या
सुरकुत्यांविषयी अभिलाषा निर्माण झाली
म्हातारी जोरजोरात किंचाळत होती,
मला राहू द्या इथेच मला राहू द्या कृपा करा माझ्यावर
तिला नेणारी बस कुठल्या स्टेशनला जाणार
तिला मला कुणालाही माहीत नव्हतं

बसच्या खिडकीतून तिचं लक्ष माझ्याकडे गेलं
तिने मला पोटातून बेंबीतून प्रेमाने हाक मारली
थंडी येणार आहे थंडी येणार आहे
मी तुझ्यासाठी स्वेटर विणते आहे
तो अपुरा आहे निदान निदान
तो विणून पूर्ण होऊन तुझ्या अंगावर चढलेला
पाहण्यापुरतं मला थोडी मुदत वाढवून मिळेल काय
थांबव ह्या लोकांना कुठे घेऊन चाललेत मला..

अजून हवाय वेदनांसोबतचा सहवास
हवी आहे सहानुभूती कधी जोरजबरदस्तीने मिळणारी असली तरीही
दुर्लक्ष करणारे मधेच
पाठीवर हात फिरवूनही जातात ती ऊब सोडवत नाही
थंड पडणार्या शिरांना स्पर्श हवाय
एकटीला लोटू नका थांबवा मला थांबवा ही बस 

म्हातारी किंचाळत होती
कुणीच पुढे आलं नाही तिला आतून बाहेर ओढून घ्यायला
बरं झालं लोढ जाईल आता गेली कटकट
मग म्हातारी एकदम शांत झाली आणि आम्ही सारे हबकलो
ती परत माझ्याकडे रोखून पाहू लागली
ती किंचाळत असताना मी थंड निर्विकार चेहर्याने तिच्याकडे पहात होते
पण आता मला भीती वाटू लागली आणि माझे ओठ विलग झाले
तशी ती फिस्सकन हसून म्हणाली,
माझ्या शिरांमध्ये रक्त नाही आणि तुमचं रक्त थंड आहे
भेटू की लौकर जीव जडलाय तुम्हा सगळ्यांवर


बस गेल्यावर मी तिच्या बेडपाशी आले आणि
मेडिसिन बॉक्समधली म्हातारीची सगळी औषधं
कचरापेटीत टाकून दिली
बेडवर नवं बेडशिट खोचलं ताठ
माझं इथेतिथे पडलेलं सगळं सामान 
तिच्या टेबलवर आणून नीट लाऊन ठेवलं
म्हातारीचं पांघरूण छान नक्षीदार मऊमऊ होतं
त्यात स्वत:ला लपेटून पाय पोटाशी दुमडून 
डोळे बंद केले.
पण ती साली औदसा आतल्या अंधारात
पणतीच्या मद तेवणर्या ज्योतीसारखी प्रसन्न हसत होतीच. 

Comments

Post a Comment