काल संध्याकाळी साडेपाच वाजता..

वेट लॉस करण्याचे एकदा पक्के झाले की एक गोष्ट हटकून होते ती म्हणजे वेट लॉसवरील पुस्तकांची खरेदी. ती पहिली पायरी. तिथे चढले की आपण खरच गांभिर्याने फिटनेसचा विचार करतो आहो, असे वाटून वजन हटाओ मोहिमेला स्फुरण चढल्यासारखं होतं. मग स्पोर्टस अॅक्सेसरीजची खरेदी. योगा मॅट, स्पोर्टस शूज, डंबेल्स, दोरीच्या उड्या, चालण्याच्या व्यायामाचा ट्रॅक ठेवण्यासाठी तसे आधुनिक घड्याळ, ज्यूसर, सूप मेकर हे सारे घेतले जाते आणि मग आपण आपल्यासाठी काहीच करत नाही हा गिल्ट कमी होतो. हे सारे आधी घेऊन ते तसेच धूळ खात पडले होते ह्या भूतकाळाकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे. 
आता शेवटची आणि महत्वाची पायरी म्हणजे डाएट करण्यासाठी करायचा श्रीगणेशा. हे म्हणजे भलतंच कठीण काम आहे हो. फळं भाज्यांचा स्टॉक भरून घ्यावा म्हणून मी काल संध्याकाळी पाचसाडेपाच वाजता माटुंग्याच्या भाजी मार्केटात गेले आणि तिथे दमल्यावर नेहमीच्या भेळपुरीवाल्याकडे साश्रूनयनाने पाहिले तो भेळवालाही माझ्याचकडे बघत मला 'आ गले लग जा ' हे गाणं आळवून ये गो ये करत असल्याचे दिसल्यावर मी सार्या भाज्यांच्या पिशव्या फेकून लांब लांब टांगा मारत रस्ता क्रॉस करून त्याच्या ठेल्यावर धप्पकन उडी मारली. क्या दिदी है किधर.. कितने दिन के बाद दिदी, असं तो म्हणाला. त्याच्या आवाजात ओतप्रोत प्रेम भरलेलं होतं. काऊंटरच्या आत असलेल्या गोलटम्म पुर्या मला पाहताच आनंदाने डान्स करू लगाल्या होत्या, पाणीपुरीच्या चटकमटक पाण्याचे तोंडात कारंजे उडू लागले होते. भेळेवर घातली जाणारी बारीक पिवळी शेव, बारीक कापलेला चौकोनी क्रंची कांदा, हिरवीगार कोंथिंबीर हे पदार्थ.. या या मला खा खा असा आग्रह करत होते. मग भेळवाला मला म्हणाला, दिदी आप सेवपुरी खाने के लिये बहोत दिन आये नही तो एकदम खाली खाली लग रहा था. आप तो कभी दो प्लेट सेवपुरी और एक पानीपुरी खाये बिना जाते नही है. (प्रेम करणारी माणसे मला अनावधानाने खजील करत राहतात, त्याला ईलाज नाही.) कैसा है इतना प्यार से खानेवाला गिर्हाईक हमको भी याद रेहता है. 
मला त्या अगत्याने एकदम ओशाळल्यासारखे झाले आणि मी काहीच न बोलता तिथे उभी राहिले. खरा व्यायाम आणि डाएट सुरू व्हायला अजून पाच सहा दिवस आहेत तोवर इतके ताणून धरण्यात अर्थ नाही. किती तडजोडी करत रहाव्यात आपण आयुष्यात? क्वचित आपण सूट घेतली तर इतकं मनाला लाऊन घेण्यात अर्थ नाही. मन:स्वास्थ्यही महत्वाचं आहेच की आणि आपण खाण्यासाठी जगत नाही जगण्यासाठी खातो, हे मनाशी पक्के केले असेल तर रोज रोज का भेळवाल्याकडे येणारोत आपण? हे दळण मनात दळत असताना एक भलीमोठ्ठी जड शेवपुरीची प्लेट भेळवाल्यानं माझ्या हातात कोंबली. खाओ.. खाओ. आज स्पेशल बनाया है आपके लिये ओर गरम चाय भी पिके जाना. त्याच्या दुकानाच्याशेजारीच अजून एक छोटा स्टॉल आहे चहाचा . तो त्याची बायकोच चालवते. गोडमिठ्ठ गरम सणसणीत चहा असतो तिचा. मस्त. 

पुढचा बराच काळ ह्या शेवपुरीपासून विरह सहन करावा लागणार आहे. शेवपुरीचे गोंडस रूप पाहून माझ्या काळजात चर्र झालं. कशी असते नाही शेवपुरी. शेवपुरी चावताना तोंडाच्याआत कडाक्ककड आवाज झाल्यावर पुरीवरचा मालमसाला जिभेवर पसरून लाळेत घोळला गेल्यावर डोळे आपसूक मिटले जातात. स्वर्गाची कवाडे उघडी होतात.आपण हलकेच वर जातो. घास संपत असताना खाली खाली येत असताना दुसरी पुरी हलकेच तोंडात सारली जाते आणि आपण परत वरवर जाऊ लागतो. शेवपुरी खाताना ही जी सिसॉव्ह खेळल्याची प्रक्रिया होते त्यात मज्जा आहे. 
फोन आला. माझी फिटनेस ट्रेनर. 
हॅलो रेणुका हाहाहाहा. कुठे आहेस गं काय करते आहेस..
मी मी कबीरच्या शाळेबाहेर आहे अगं.. 
हो का बरं बरं. ती शेवपुरी नीट खाऊन घे. वाटल्यास पाणीपुरीही खा. त्यातलं पाणी पोटासाठी चांगलं असतं. पण ही शेवपुरी आता शेवटची क्काय. मग तू आहेस नी मी आहे. 
मी झर्रक्कन मागे वळून पाहिलं तर अमृता तिथे पलिकडच्या रस्त्यावर उभी राहून माझ्याशी बोलत होती. मी तिच्याकडे पाहिल्यावर तिने हात वर करून हाय केलं. मला रंगेहाथ पकडल्याचा एक चमकदार भाव तिच्या डोळ्यात होता आणि चेहर्यावर, थांब आता तुला बरोबर करते एक तारखेपासून  अजून दहा सूर्यनमस्कार वाढीव तुझ्याखाती जमा रेणुका, असे भाव. अमृता गेली. अजून तीन पुर्या शिल्लक होत्या. भेळवाल्याने परत हाक मारली, दिदी पिताजीका देहांत हो गया. मी दु:ख व्यक्त केलं तोवर हातात त्याने सुखी पुरी ठेवली ते चाबडणं चालू झालं. हमारे पिताजी बहोत मोटे थे. और खानेका बहोत शौक था. थोडा कंट्रोल किया होता तो.. अभी बोलके कुछ फायदा नही. हम बच्चोने बहोत लाड प्यार किया पिताजीका. हार्ट अटॅकसे खतम हो गये. आपभी थोडी कसरत किया करो दिदी सेहत के लिये अच्छा है, तो म्हणाला. 
हा भेळवालानं फार सहृदय गोल्डन हार्टेड आहे णि तो माझी फार काळजी करतो श्या. नेहमी विचारपूस. राग येतो मला कधीकधी. साला मागे लागलेत सगळे. एक शेवपुरी तरी नीट खाऊ द्या राव. जगू द्या ह्या लेकराला.

Comments

  1. आपल्याला आता हे खायचे नाहीये... म्हटल्यावर अजून जास्त इच्छा होते... आणि डायट प्लान चे बारा वाजतात.

    ReplyDelete
  2. हाहाहा!! अगदी अगदी. Ditto! हेल्दी भूक बघावताच नाही काही जनां ना तेजायला.

    ReplyDelete

Post a Comment