सखूबाईच्या सात पोरी

एकमेकांचं आकाश तोलून धरायंच असतं. सगळ्यांचाच देव तिथे असतो म्हणून.
काकू वारली तेव्हा सखूबाई आली होती. पूर्ण म्हातारी झालेली माझ्याजवळ बसली. माझ्या पाठीच्या कण्यावर एक वाळका हात वरपासून खालपर्यंत फिरला. तेव्हा खूप बरं वाटलं. मी चड्डीत सू शी करायचे तेव्हापासून सखूबाईने मला मोठं होताना पाहिलेलं आहे. काकूचं जाणं माझ्यासाठी काय असेल ह्याची तिलाच खरी जास्त जाणीव असेल. ती भोकाड पसरून रडत होती. आयआयआय काकी गेली माझी काकी काकी. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांची बारीकसारीक खूसफूस सखूबाईच्या आवाजाने शांत झाली.
आम्ही स्मशानात जाऊन आलो तोवर घरातली सारी जागा सखूबाईने पुसून घेतली होती. सगळ्यांसाठी गरम चहाची सोय केली होती. कुणाकडूनही पैसे तिने घेतले नाहीत. मी आल्याआल्या बाकी सार्यांना मागे टाकून मला लगोलग दोन चहाचे कप तिने आणून दिले. मयुरा, काकीने खूप केलं तुझं. तू इथे येत जा गं मला आधी फोन करसन मग मी तुझ्यासाठी गावचे तांदूल आनून ठेवीन. ती सारखी माझ्या तोंडावरून हात फिरवत होती.
मी दहा बारा वर्षांची होते तेव्हा कश्यावर तरी रूसून जेवणारच नाही असं सांगितलं. काकांना गळ्याखाली मग अन्न जाईलच कसे? मला त्यांनी मांडीवर ओढून घेतलं आणि तू खाल्लं नाहीस तर मग तुझा काकाही जेवणार नाही, असं म्हणाले. काकू त्यांना दटावू लागली. इतका जीव लाऊ नये कुणाला नाहीतर पुढे जड जातं. काका मला भरवत होते ह्याची मला मौज वाटत होती.
तेवढ्यात बेल वाजली. मी धावत जाऊन दरवाजा उघडला तिथे सखूबाईची सहा नंबरची सोनी आणि चार नंबरची शोभा उभी होती. शोभाचे डोळे लालभडक दिसत होते. चेहर्यावर शेंबूड पसरलेला होता. '' माझा बाप मेला. आई बोलली का काकीला भेटून ये. ''
मी आत धावत गेले आणि काकूला सांगितलं, शोभा आलीये बाहेर तिचे बाबा वारले. काकू हातातला घास खाली टाकून धावत बाहेर गेली. काका तडक बेडरूममधे गेले आणि कपाटातून पाच हजार रूपये काढून आणलिनी आणि ते काकूच्या हातात देऊन मुलींकडे दे असं म्हणाले.
त्या पाच हजाराची सखुबाईला किती मदत झाली असेल त्या काळात.. पंचविस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. काकी आपल्याला काहीतरी मदत करेल हा विश्वास होता तिला म्हणून पाड्यातून इतक्या लांबवर तिने मुलींना धाडलं.
आम्ही परत जेवणाच्या टेबलावर आलो. मग मी माझा रागबिग गुमान गुंडाळून ठेवला आणि माझ्या जागेवर जेवायला बसले आणि मुकाट्याने गपागपा घास गिळू लागले. घडलेल्या प्रत्येक प्रसंगावर काकांची एक स्पेशल टिपण्णी असे.
'' आता बोलू नये; पण मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे म्हणून सखूबाईच्या नवर्याने तिला ओलेत्यात पण सोडले नसेल अगदी. सात पोरी झाल्या. आता हा गेला म्हणून कारखाना बंद पडेल नाहीतर चालूच राहिले असते. अगदी ओवाळलेला माणूस हो.'' काका
'' सात मुली. आपली सकूबाई कमवेल काय नी पोरींना खायला घालेल काय..'' काकू
'' अगं मग काय करणार काय? आता सखूबाई तशी करायची नाही; पण बोलू नये.. मुलींना मग धंद्याला लावतात. खाणार काय नाहीतर.. '' काका
'' पुरे मयुरा बसलीये इथे. बोलण्याचा पाचपोच तुम्हांला नाहीचे अगदी. '' काकू
'' सखूबाईकडून ते पैसे परत घेऊ नकोस.. कठीण आहे तिला पुढे. अजून लागले हजार पाचशे तरी दे. आपले पैसे सारे आपल्यासाठी नसतातच, त्याला अश्या नी तश्या वाटा फुटायलाच हव्यात. ईश्वर ईश्वर. '' काका
तेव्हा अळूची पातळ भाजी होती मला अजून आठवतं. मी आपलं सण्णासण्ण खाऊन घेतलं. त्या काळात मी भावना आणि खाणे ह्यांना स्वतंत्र ठेवायचे. काकांनी मात्र त्या दिवशी दोन पोळ्या कमी खाल्या होत्या. काकूही ज्येमत्येमच जेवली होती.

Comments

  1. Kharrch Renuka tai mast lihlay..ekun ek drush dolyapudhe ubhe rahile ( Sanjeevani Kulkarni-Niralgi)

    ReplyDelete
  2. रेणुके तुझ्या ह्या साऱ्या आठवणी अश्या लिहितेस की ते प्रसंग जश्याच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात हृदयाच्या तळाचा ठाव घेतात मनापासून सलाम ����������

    ReplyDelete

Post a Comment