नाना

फ्लर्ट करण्यावरून एक किस्सा आठवला.. छान फ्लर्ट करणारे पुरूष मग ते कोणत्याही वयाचे असोत त्यांच्याशी एक छान रॅपो तयार होतो. स्त्रीही फार फार लालची असते. ती स्तुतीलोलुप असते. जर योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीने तिच्यापर्यंत मनातलं ते पोहोचवण्यात समोरचा पुरूष यशस्वी झाला तर तिच्या मनात त्याला ध्रूवपद निश्चित मिळतं. एका स्त्रीच्या मनात अनेक ध्रूव असतात हे लक्षात घेतलं व मान्य केलं पाहिजे. मग त्या सॉफ्ट फ्लर्टिंगला बहर येतो. फ्लर्ट हेल्दी असेल तर मजाच मजा.
..
माझ्या आठवणीत एक गृहस्थ आहेत त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांना दारूचा भारी शौक होता. त्यांच्याकडे मित्र जमणार.. ते रमीचे डाव खेळत बसलेले असणार.. त्यांचे मित्र मित्रांच्या म्हातार्या बायका सगळे पिणारे खाणारे मज्जा करणारे म्हातारे बच्चे.
माझी जरा जरा ओळख झाल्यावर एक दिवस त्यांनी मला हाक मारली आणि मी त्यांच्याजवळ गेल्यावर माझे दोन्ही खांदे पकडून ते एकदम जवळ झुकून म्हणाले, मयुरा तुझे डोळे ना मला फार फार आवडतात गं. आणि मग माझे खांदे घट्ट दाबून त्यांनी अचानक मला हलकं मिठीत घेतलं आणि डोक्यावर मोठ्या मायेने हात फिरवून म्हणाले, तुझ्या आईने तुझं नाव मिनाक्षी का नाही ठेवलं गं? माझ्या पालकांनी मला असं कधीही मिठीत भरून घेतलं नव्हतं. म्हणजे प्रेम करण्याची त्यांची पद्धत जरा वेगळी होती असेल. परत माझे डोळे सुंदरबिंदर आहेत, हे असलं काही म्हणायची पद्धत नव्हतीच. डोळ्यांबद्दल बक्कळ कॉम्पिमेंट मी कमावून होते. पण माझ्या पालकांच्या वयाच्या कदाचित त्याहून वयाने जरा जास्तच असलेल्या नानांनी पहिल्या भेटीत माझ्या डोळ्यांवर यावं, मला तो म्हातारा एकदम आवडूनच गेला. ही नॅक असते जिंकून घेण्याची मला समजलं होतं.
त्यांच्या मिठीत मला एकदम उबदार वाटलं होतं. त्यानंतर मी कधीही त्यांना भेटले की आधी मिठीच मारत असे. नाना. त्यांची पांढरीशुभ्र दाढी.. माझं प्रेमच होतं त्या दाढीवर. स्त्रियांची हलकीफुलकी स्तुती करून त्यांचं मन कसं काबिज करावं हे नानांनी चांगलं आत्मसात केलं आहे की काय असा खासा संशयच माझ्या मनात होता. स्तुती खोटी वाटली की स्त्रिया पळतात. मिठ्ठ गोड होण्याच्या आधीची थोडी अगोड चव स्तुतीत असेल तर त्या रेंगाळतात, हे नानांना कसलं भारी समजलं जमलं होतं.. माझी त्यांच्याशी छोटीशी दोस्तीच झाली. नाना मला काय मोठेबिठे वाटायचे नाहीत. उलट डांब्रट, मस्तीखोरच वाटायचे.
तू काय पिणारेस.. मी आले की पहिला प्रश्न हाच. अहो नाना, मी नाही पीत असं काय करता.. त्यावर ते खोटं खोटं रागावल्यासारखं करायचे. तू मला काय शेंडी लावते काय.. तोंड बघ तुझं आरश्यात. पीत नाही म्हणे.. ते काही नाही तू जर का आज इथे प्यायली नाहीस तर हाकलून देईन तुला घरातून आणि परत येऊसुद्धा नकोस माझ्याकडे कळलं का? कळलं का.. म्हणजे गुमान पी, अस्सं. तुला आवडणारी बियर आणून ठेवली आहे मी. जाजाजा फ्रीज उघडून तर बघ गं.. जाजा. किती चार्मिंग होते नाना त्यांचा आग्रह आणि त्यांचं ते फ्लर्टिंगसुद्धा. माझ्या पिण्याफुकण्याला तेच जबाबदार आहेत, असं मी त्यांना बोलले असते तर वस्सकन म्हणाले असते, ह्या ह्या असलं काही नसतं. तू पिणारीच होतीस.. हे बिंधास्त ठोकून द्यायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नसतं.
Miss you nana. Love you. आज जाम मूड होतोय प्यायचा तुमच्यासोबत. 


Comments

  1. जबरदस्त 👍👍👍👌 वाचणाऱ्याला नाना व्हावंसं वाटून जावं अस्साच रेखो तुला प्यार भरी झप्पी 👍👍👍👌💐

    ReplyDelete

Post a Comment