साडीच्या दुकानात टाईमपास कसा करावा..

साडी प्रकार - कांजिवरम. अंगाचा रंग गुलाबी, पदर निळा निळा निळा आणि निर्यांमध्ये निळ्या गुलाबी चौकड्या येतील असं डीझाईन आहे. काठ दिसताएत तसे. साडीवर बुट्टी खुट्टी कुठेही नाही. किंमत आठ हजार. 



साडीच्या दुकानात
१. आपण साड्या निवडत असताना जरा खुर्ची सोडून साड्या पहायला उठतो आणि आपल्याजागी खुर्चीवर दुसरी बाई येऊन बसते. मग तिला आपण सांगतो, मी इथे बसले होते. ती म्हणते सॉरी आणि उठते. तेव्हा मजा येते.
२. साड्या दाखवताना मरगळ आलेल्या सेल्समनला पळवायला मजा येते.
३. पळत असलेल्या सेल्समनला बघायला मजा येते. कारण असे दुर्मिळ असतात.
४. आपण निवडलेल्याच साड्यांमधे बाजूलाच उभ्या बायकांच्या घोळक्याचा जीव अडकून पडलेला आहे. त्यातल्या एका साडीचा पदर त्यातल्या एकीने पहायला घेतल्यावर आपण सेल्समनला, मी निवडलेल्या साड्या बाजूला ठेऊन द्या. मग मिक्स होतात. परत निवडत बसायला मला वेळ नाहीये, असं सांगतो. त्या बायकांचे चेहरे पडतात. मग मजा येते.
५. त्या तरीही थोडा प्रयत्न करतात.
वो उन्होंने लिया है ना वैसीही दिखाओ ना.
कौनसी.. सेल्समनच्या चेहर्यावर तेराव्याचा कंटाळा.
वो ब्ल्यू.
आरे एकही पिस बनता है. हम सब सिंगल पिस बेचते है. रीपीट नही होता. आप बाकी का देखो. मग त्या थोड्या आंबट चेहर्याने दुसर्या साड्या नाईलाजाने बघू लागतात. आपण निवडलेल्या साड्याच त्यांच्या मनात पदर हेलकावत राहतात पण त्या साड्या त्यांना मिळणार नाहीत ह्याबद्दल त्यांचे मन दुखायला लागते. असं दुसर्याला दुखायला लागलं की फार फार मज्जा येते.
६. मग आपण त्यांनाच आवडलेली ती निळी साडी अंगावर घेऊन पाठीमागे लावलेल्या आरश्यापाशी जाऊन मांजरीसारखं गोल गोल फिरून फिरून अलट पलट करून पाहू लागतो. त्या सर्व स्त्रिया त्यांच्या समोर लावलेल्या आरश्यात माझ्या प्रतिंबिंबाकडे तिरक्या नजरेने पहात असतात. लै भारी मजा येते.
७. मी निवडलेली अजून एक गुलाबी साडीही मी अशीच अंगभर घेऊन गोलगोल फिरून आरश्यात बघते. तेव्हा त्यांतली एक बाई हळूच सेल्समनला खोपच्यात घेऊन विचारते, ब्ल्यू नही है.. लेकिन वो अभी पिंक दिख रही है ना आपको वैसेमे अलग कलर भी चलेगा. मज्जा मज्जा मज्जा. अरे म्याडम आपको सब उनकाही साडी पसंद आ रहा है.. आपको मै दिखा रहा है ना. वो साडी गया अभी भुल जाओ. यूहूहूहूहू साडी घेण्यापेक्षा हे असले माईंड गेम खेळण्यात मज्जा आहे. एकच साडी घ्यायची असली तरीही आपण दहा साड्या निवडायच्या आणि त्या बराच वेळ अडवून ठेवायच्या. त्या उघडून उघडून पहायच्या पण अजून काही ठरलं नाही नक्की कोणती साडी घ्यायची ते, असं दाखवत मस्त टाईमपास करून बाकीच्या बायकांचे जीव टांगणीला लाऊन ठेवायचे.
८. मग त्या बायकांजवळ जात..
मला नं ह्या दहा साड्यांमधली एकच साडी घ्यायची आहे. तुम्हांला ही निळी साडी आवडली आहे नं..
नाही नाही नाही, त्या ओशाळून म्हणतात.
अरे अस्सं नाही.. तुमच्या आईला फार आवडलीये ही साडी नं तुम्हीच ठेवा मी ही गुलाबी घेते. ही सुद्धा कमाल ए.. गुलाबी साडी, त्याला निळा पदर. वेगळंच कॉम्बिनेशन आहे, मी साडीकडे कोतुकाने पहात म्हणणार. तायाबाया परत कन्फ्यूज..  पण चला ती निळी साडी ही काळीकलुटी कधीपासून चेमटावून बसली होती ती आता आपल्यासाठी सोडायला चक्क तयार झालीये.. त्यांच्या चेहर्यावर लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, असे भाव. त्या खूष पण तरी त्यांचीही बॅटिंग चालूच.
अहो तुम्हांला आवडलीये ती निळी साडी फारच. असं नका करू तुम्हीच दोन्ही ठेवा. म्हणझे जसं काय ह्या मला पैसेही देणारेत च्यायला. मग माझीही बॅटिंग चालू .. ठेवा हो ठेवा तुम्हीच ठेवा. माझ्याकडे निळ्या साड्या खूप पडल्यात. 😀 त्यांच्या हातातली बॅट गळून पडते. 😮🙄😏😰 फूल मज्जा. तर्ही त्यातली एक मैना सांगते, भैय्या वो साडी अभी यहां दो.. कसली मस्त आहे गं ही.. होहो सुंदर छान दिसेल माई तुझ्यावर. त्या अवसान ढळू देत नाही. हमम असं पाहिजे.
९. मग जाताना सांगायचं.. चला तुम्हांला मगाचपासून ती साडी हवी होती मिळाली तुम्हांला मी पण खूष हाहाहा. त्या पण खुदकन हसत हाहाहा करतात. निळ्या साडीचा आकाशाएवढा आनंद. कुणाचं काय तर कुणाचं काय बै.
पण मजा अजून अजूनच करायची माझी हाव आणि खाज कमी नसल्याने मी जाण्याच्या आधी एक टाकते. साडी भारीच आहे ही. एकदम रॉयल पण तिला ना तिथे तिथे नाही तिथे तिथे हं हं... डाग आहे असा उभा.. मग इतकी सात आठ हजार घालवून.. दुकानदार म्हणतात आम्ही फिनिशिंग करून देतो पण ते फिनिंशिंग करणार आणि मग दोन दिवसांनी आपण ती परत घ्यायला या, इतका वेळ कुणाकडे आहे.. 😉 आवडलं की फटकन घेता आलं पाहिजे. पण तुम्ही घ्या.
त्या माझ्याकडे बघतच राहतात. मज्जानु लाईफ. साड्या अश्या मजा करत करत घ्यायच्या असतात. आनंद तिप्पट होतो. 😇😈

Comments

  1. खूप खूप छान मज्जा आली जणू तो अनुभव ह्याची डोळा ह्याची देही अनुभवत होतो💐

    ReplyDelete

Post a Comment