खेळमधे माझ्या कविता .. फीलिंग मी कवी कधी झाले?



हा महिना किती भारी उगवलाय.. खूप भारीये. गेलं वर्षं तसं का नव्हतं हे सांगणं आणि आठवणं फार रटाळ आहे. गेली दोन वर्षं पथेटिक होती एका अर्थाने. म्हणजे त्यात मी जे काही करत होते त्याने समाधान मिळत होतं. पण ते सालं सारं महत्वाचं घरगुती इ. जे मला आवडतं जे केल्याने मला किक बसते असं काहीच त्यात नसायचं आणि त्याने संपल्यासारखं फीलिंग यायचं.
फेसबुकवर गेली दोन वर्ष वाट्टेल ते लिहीत सुटले होते. लोकं हसायचे. हसतात. गेले उडत. हिंतचिंतकांना वाटतं ही वाया गेली. त्यात तथ्य आहे. ( निर्लज्जम सदा कोडगी ). इथे लिहताना अचानक एक उभट फॉर्म लिहायला घेतला. त्याला लोक्स कविता म्हणू लागले. रेणुका तू कविता करतेस ह्यावर मला अजिबात विश्वास बसत नाहीये, असं अमिता एके दिवशी म्हणाली. हीच माझी खरी मैत्रीण म्हंजे. तिला पर्फेक्ट कळलय मला काय वाटत असेल ते. पण ती कविता आहे का बिविता आहे.. ते जे काही होतं मला लिहायला मजा येत होती हे महत्वाचं आहे बाकी सारं गेलं तेल लावत, हा विचार करून दणादणा लॅपटॉपचा कीबोर्ड बडवणं सुरूच ठेवलं. 
काही आसपास घडलं की त्यावर लगेच रीएक्शनरी लिहून काढत काढत मी एक दिवस संपून जाणार आहे. त्याने काय होतं की जे वाटतंय ना ते आत आत साचून फर्मेंट होऊन त्याचं मस्त चिझ होत नाही. वाटलं की लगेच बाहेर काढलं ह्यासारखी चुत्या सवय लिखाणाची ठासून मारते एक दिवस, असं माझा एक कधीच न बघितलेला साहित्याध्यात्मिक मित्र नेहमी म्हणत असतो. हा अदृष्य मित्र काय बोलला असता हे मला आता माझं माझं कल्पिता येऊ लागलं आहे. कल्पिता.. ह्याह्याह्या. 
पण तेव्हाच्या तेव्हा जे वाटतं ना साला ते तेव्हाच लिहून काढलं की जे मस्त ऑरगझमिक फीलिंग येतं त्याला कश्याचीच सर नाहीये. नंतर करू नंतर करू म्हणलं की त्या सरीतले काही शब्दांचे वाक्यांचे सुचलेले मोती घरंगळून जातात आणि बेचैनी येते. ते उभट फॉर्म लिहताना हे लक्षात येऊ लागलं की कविता लिहणं हा प्रकार किती कठीण आहे. त्यात तो जो अर्क येतो डोक्यातल्या कल्पनेचा तो सहजी उतरवणं खायचं काम नाहीये. पण आपला ह्यातला आवाका काय, अक्कल ती किती, आपला पगार किती आपण बोलतो किती हा काही विचार न करता लिहणे चालूच ठेवले. परिणामी ज्याला लोकं कविता म्हणतात असं काही लिहून समोर आलं आणि वाटलं की अरेच्च्या हे लिहायला मजा येतीये की. 
जानेवारी २०१८ च्या ह्या ' खेळ 'च्या अंकात नव्या कवयत्रिंच्या कामासोबत माझ्या आठ कविता एकसाथ छापून आल्या आहेत. ह्या अंकासाठी निवड झालेल्या कवयित्रिंच्या एकाहून अधिक कविता एकसाथ अंकात असणं हे ह्या अंकाचं वैशिष्ट्य आहे. चित्रकार शुभा गोखले ह्यांच्या बाजार ह्या चित्रमालिकेतील एक चित्र ह्या अंकाचे मुखपृष्ठ आहे आणि ते फारच गोड दिसतंय. फेसबुकवर लिहलेल्या कवितांना इतक्या चांगल्या पद्धतीने अंकातील एकसौएक कवयित्रिंच्या कामासोबत स्थान मिळेल हे... भारी वाटतंय राव खूप. 
अंक अतिशय सुंदर आहे. वेधिका कुमारस्वामी ही मी थोडीबहुत वाचलेली आणि फार भावलेली आवडणारी कवी आहे. तिच्या चक्क १८ कविता अंकात आहेत. बहोत बढिया लग रहा है. सोबत चहा आहे मी केलेला. मसाला मखानाही आहे मी केलेला.. मग काय ही तर पार्टीच झाली भैय्या. 

Comments