सौंदर्य


खूप लोकं सौंदर्य कसं टिकवावं कसं वाढवावं ह्याविषयी बोलतात पण सौंदर्य म्हणजे नक्की काय आणि ते कशात असतं हे फार कमी लोकांना कळतं. फार कमी लोकं सौंदर्याचा आदर करू शकतात जे त्वचेच्या आत शिरलेलं असतं. ही त्वचा फक्त माणसाचीच असेल असं नाही.

शेतकर्याला ते भेगाळलेल्या मातीतही अजून असल्याचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळेच पावसाच्या पाण्याचे काही थेंब पडल्यावर त्याने पेरलेलं उगवायला लागतं. सुरकुतलेले थरथणारे हातही किती सुंदर वाटायला लागतात जेव्हा मी त्यांच्यात शिल्लक असलेली ऊब घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करते. सकाळच्या कोवळ्या ऊन्हात उभं राहिल्यानंतर डोळे बंद केल्यावर जसं वाटतं तेच थेट फीलिंग. खूप जुनी जीर्ण झालेली काही पत्रं आहेत माझ्याकडे. त्यातली माणसं निघून गेलेली आहेत. ती पुरायची होती मला. समुद्रात फेकून द्यावीत असंही ठरवलं होतं मी. त्यांना मारलेल्या घड्या कागद उलगडताना जश्या जश्या मोकळ्या व्हायला लागतात तसतसं बेंबीच्या देठातून एक कळी बाहेर येत उमलायला लागते. एक परिचित वास जाणवायला लागतो पत्र लिहणार्या माणसाच्या मी अनुभवलेल्या आसपासाचा.

टीनेजमध्ये जेव्हा खरं तर गरज नसे तेव्हा मी सतत लावायचे फेसपॅक. नगरला सुट्टीला गेले की तिथे खूप बहिणी होत्या. त्यांनी लावलं की आपणही लावा फेसपॅक चला असं.. आता खरी हे सारे करण्याची फार गरज आहे. नाही करत मी काहीच करत नाही.

जेव्हा खूप काही झडझडून काम केल्यावर डोळ्यात जी चमक येते किंवा क्वचित लिहताना एक नशा चढत जाते आणि ते संपत आलेलं असताना एक ऑर्गझमिक फीलिंग येतं तेव्हा डोळे चमकायला लागतात. ताठलेले अपुरी झोप झालेले डोळे.. पफी आईज. त्यातही चमक दिसायला लागते. माझं सौदर्य टिकवून ठेवण्यासाठी आता मला वेगळ्या फेसपॅकची गरज आहे बहुतेक. शब्द, शाई, त्यात राहणं ते अंगाला लाऊन बैठक जमवणं लिहणं हे त्यातले सारे घटक असणार.

मला आवडणार्या स्त्री पुरषांबद्दलचेही माझे चॉईस आता बदलायला लागलेले आहेत. चमकदार बोलणारी माणसं जास्त चमकदार वाटायला लागलेली आहेत. शांत माणसं डोळ्यांनी माझ्याशी खूप काही बोलतात असं वाटू लागलेलं आहे. मी खूप खूप देखण्या दिसणार्या पुरषावर आता नाही भाळू शकणार कदाचित.. भाळले तरीही ते सुपरफिशियल फीलिंग असेल. स्त्री किंवा पुरूष यांच्याशी एका पातळीवर मनातून जोडले जाणारे दुवे आकर्षक वाटू लागले आहेत. मी एकदा माझ्या मित्राला सांगितलं होतं कधीच प्रीटेंड करू नकोस मला कळेल ते. तो म्हणाला की, तू सांगितलेलं हे मी कधीच विसरू शकत नाही. पण तो ते कधीकधी विसरतो हे मला लक्षात येतंच कारण मी कनेक्टेड आहे त्याच्याशी. हसू येतं मनातल्या मनात अशावेळेस. लक्षात येतं की क्वचित प्रीटेंड करणं ही त्याची गरज आहे. आपण थोडं डिस्काऊंट दिलं पाहिजे.

मी आई झाले आणि तीन चार केस चंदेरी झाल्याचं लक्षात आलं. आता त्यात वाढलेही असतील एक दोन किंवा जास्त. केसांत हलकी हलकी चांदी मिसळू लागलेली आहे. चांदीच्या दागिन्यांचा मला शौक आहेच. सोन्याचं आकर्षण कमी. नाहीच.

कमरेवरचे स्ट्रेचमार्क्सही मला सुंंदर वाटतात. त्यावरून अलगद हात फिरवताना मला बाळाने पोटात मारलेल्या लाथांची आठवण येते. खरं सांगायचं तर मी त्या अजूनही फक्त आठवूनही फील करू शकते जश्याच्या तश्या. माझी आई मला आठवतच नाही. पण ती होती हे फीलिंग.. मला एक आई होती हेही सुखावणारं आहे. आईची एकही आठवण माझ्याकडे नाही. पण तिच्या नसण्याची हरदम येणारी आठवण मी सेलिब्रेट करते. तिच्या साड्या फार सुंदर असत असं ऐकलं होतं. बस् तिच्याबाबतच्या अश्या कुणीकुणी सांगितलेल्या आठवणी आईच्या हाताच्या जिथेतिथे सेलिब्रेट केल्या जाणार्या चवीच्या तोडीच्याच मला वाटू लागल्या.

मी शाळेत असताना एका जाड्या मुलीबद्दल गॉसिप करत होते. सोनू कित्ती ढोली आहे नं.. मी शाळेत असतानापासून हे असलं कधीकधीही कुणालाही न बोलणारी कुणालाही त्याच्या रूपरंगावरून न हिणवणारी होते. पण त्या दिवशी आसपासच्या मुलींच्या बोलण्यात वहावत गेले. मी बोललेलं नेमकं तिच्या कानावर गेलं. ती मागे वळली आणि शांतपणे म्हणाली, "तुमच्या बापाचं खात नाही मी." आम्ही सार्या गोठलो. तिला त्यावर काही बोलण्याची कुणाची टाप होती? सोनू स्वत:साठी बोलली. हिणावणार्यांसमोर उभी राहिली आपल्या शरीरासाठी. मला ती तो क्षण किती सुंदर वाटतो हे कसं सांगावं? सोनूचं वजन आजही जास्त आहे. पण ती जेव्हाही मला दिसते सुंदरच वाटते.

सतत वजनावर बोलणारी एक चवळीच्या शेंगेसारखी मैत्रीणही सुंदर वाटते. तिला किती तो ध्यास सारखा छान छान दिसायचा. मस्तय की नाही. ती म्हणते.. अगं रेणुका काहीतरी कर मेले अशीच म्हातारी होऊन मरून जाशील. हाहाहा.

मी सहासात वर्षांची असताना काकाकाकूंसोबत पहाटे चार वाजता उठून केलेला अर्धवट झोपेतला नेपाळमधला प्रवास आणि त्यानंतर दिसलेला बर्फराशीतून सोन्याची उधळण करत वरवर येणारा सूर्य. मी पाहिलेला पहिला सूर्योदय.. त्याच काकांच्या मांडीवर मी डोकं ठेवलेलं आणि एका अनोळखी प्रवाशाने माझे पाय त्याच्या मांडीवर ठेवले होते. माझं डोकं एसटीच्या खिडकीच्याबाजूला होतं. रात्रीचा प्रवास. गोंदवल्याला जात होतो. मधेच डोळे उघडले तर माझ्या इवल्याश्या डोळ्यात मावणार नाही इतकं दाटगच्च चांदण मला दिसलं आणि माझं जगच पालटून गेलं.. निबंधात मग जिथे तिथे चांदणच चांदण फुलायला लागलं. शाळेत निबंधस्पर्धेत नंबर पहिला.

त्याची माझी झालेली ती नजरभेट आणि मग ती आठवल्यावर घरी गेल्यावर मीच मला मारलेली घट्ट मिठी.. तो येणार म्हणून मी पहाटे तीनपर्यंत जागून आवरलेलं घर. मी बाळाला हॉस्पिटलमधून घेऊन घरी आले तेव्हा त्याने दरवाज्याला लावलेलं जमिनीपर्यंत आलेलं फुलांचं तोरण.. घरात जागोजागी ठेवलेली चाफ्याची फुलं. हे सगळं करण्यासाठी त्याने घालवलेला वेळ आणि म्हणून मला हॉस्पिटलमधून आणण्यासाठी त्याला झालेला उशीर. पाळीचे दिवस त्यात आमचं झालेलं भांडण. माझा अबोला. " तू माझ्याशी बोलू नकोस पण मला तुझे पाय चेपूदेत.. " ते शब्द. त्याने दाखवलेले मी पाहिलेले अतिशय सुंदर फोटोग्राफ्स..

हेनरी कार्टिअर ब्रेसांच्या फोटोंवरून हात फिरवताना, रोथकोच्या चित्रांकडे पाहताना अंगावर येणारे रोमांच. गायतोंडेंच्या पेंटिंगसमोर बसलेली मी आणि सभोवताली कुणीही नसणं अगदी हवाही नसणं.. हे सारं.. पॅरिसमध्ये मी एक महिना एका चित्रकारासोबत राहणार जिथे कळत नसेल त्याला माझी आणि मला त्याची भाषा तरीही कसा संपेल दिवस आणि कशी संपेल रात्र याचा न लागणारा पत्ता. ही फॅन्टसी. का जायचंय मला पॅरिसलाच.. काय खूळ आहे हे.. भाषा कळणारा कुणी भेटला तर काय प्रॉब्लेम असणार आहे का?

त्याचा काळा शर्ट.. त्यातला तो. तोच शर्ट घालून बसलेली मी. मी का लिहलं पाहिजे आणि कसे गोळा करायला हवेत आपण आपापले तुकडे हे सांगणारी ती लेखिका. तिने माझ्यासाठी बनवलेल्या कॉफीची चव. कुणाकुणाच्या प्रेरणा आणि त्या ऐकताना मीच मंदिरात बसले आहे जणू असा येणार अनुभव. काय काय सुंदर वाटतं त्याची यादी संपणारी नसते. ती न संपणारी यादी आपल्याकडे आहे याहून सुंदर काय असू शकेल? कबीर..

Comments

  1. शहारा आला अंगावर.....खर सौंदर्य अनुभवलं...

    ReplyDelete
  2. खुपंच भारी....खुप हवंहवंसं वाटणारं... अप्रतिम!

    ReplyDelete
  3. रेणुका तू तुझ्याच अलौकिक सौंदर्याचं सुरेख सुंदर वर्णन केलयं..👍👍👍👌💐

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलंत आपण..

    ReplyDelete
  5. Hats off. Ase watane...hedekhil sundar

    ReplyDelete
  6. अहा, मी जगले हे सगळं👌👌

    ReplyDelete

Post a Comment