गर्दीपासून लांबलांब राहणारा माणूस

तो गर्दीपासून लांबलांब राहणारा माणूस आहे |
तो तुला वेगळा वाटेल
त्याचं गबाळेपण आर्टी वाटेल
त्याने नुस्त ब्रश उचलला
तरी तो चित्रकार वाटेल
उच्चारले एखादे अर्धे कळलेले अर्धे नकळलेले वाक्य
तर तो कवी वाटले
तुला हे सर्व उच्च थोर आकर्षक वाटण्याचं कारण त्याचा एकटेपणा
तो कुणाला सहजी मिळत नसतो
तो कुणी सहज जगत नसतो केवळ म्हणून !
पण त्याच्या प्रेमात पडू नकोस
कारण
तो गर्दीपासून लांबलांब राहणारा माणूस आहे |

तो तुझ्या जवळ येईल
आणि तुझीही गर्दी वाटू लागेल त्याला हळूहळू
तुझ्या अंगावर त्याने कविता लिहल्या
की पार पडला कविता वाचनाचा कार्यक्रम
मग निर्मिती नावाची नवी प्रेमिका हाक मारतेय,
गेलं पाहिजे मला गेलं पाहिजे.. असं तो सांगेल
तू नाही म्हणालीस तर टाहो फोडेल
सुटका करून घेण्यासाठी पुरूष लाजवाब रडतात
तुझ्यातून घेतलेलं सुखदु:खाचं प्युअरेस्ट इंधन
त्याच्या कंदिलाची वात मोठी करण्यासाठी जरूरीचं असेल
ते घेऊन तो सोलो ट्रीपसाठी निघून जाईल
ह्या घटनेला ब्रेकअप म्हणतात
तेव्हा तू मनाची समजूत घालून घेणारेस का की..
हे असच होणार होतं कारण
तो गर्दीपासून लांबलांब राहणारा माणूस आहे |

Comments