मिल

शहरातली निर्मनुष्य एकाकी गल्ली
निर्मनुष्य कोपरे
इथल्या प्रत्येक हॉटेलमधल्या कळकट बाथरूमांच्या
दरवाज्यांना कुणी पाडली आहेत ही भोकं ?
अंधारे अंडरग्राऊंड किंवा
मिणमिणणारा उजेड असूनही
कुणीही वापरत नसलेले अंडरग्राऊंड
तिथून चालताना डोक्याला आपटणारे
वायरीसकट लोंबकळणारे पिवळट हिणकस दिवे
अंधाराने रंगलेले वॉकवे, त्यात भिकार्याचा
गदगद हलताना दिसणारा बोटं नसलेला पाय
त्याच्या डोळ्यापर्यंत चढत जाणारं टपोरं झुरळ
भिकार्याचे प्रकाशमान आरपार नग्न डोळे
त्या डोळ्यांनी मला पत्ता दिला मिलचा
भोसकाभोसकीने रंगरक्ताळलेली मिल
मिलपर्यंत मला सोडणारा कावलेला रिक्षावाला
रिक्षाच्या सीटमधे भरलेला
वखवखीत खरखरीत काटाथर्रगार अंधार
मला फाडण्यासाठी पुढे पुढे येणारे हात
आठवावरून पुसलीच न जाणारी मिल
रस्त्याच्या बाजूला फेकून दिलेलं माझं शरीर
त्या शरीरावरून अंधाराचं पांघरूण सारतानाची मीच
अॅम्ब्युलन्स डॉक्टर
माझी झपझप चालणारी पावलं..
मागे कुणीही नसताना होणारा पाठलाग
उडणारी छाती
चेहर्यावर झुकलेले उष्ण धपापणारे चेहरे
घाबरवणारे प्रहर
हरलेली मी. निष्प्राण तू.
अगदी स्वप्नातही निष्कलंक राहू शकत नाहीयोत
कोणत्याही वयात. कोणत्याही.

Comments