सुपरवुमनची सुट्टी



मी सुपरवुमन नाही. सुपरवुमन ह्या कौतुकात एक छुपा स्वार्थी डाव आहे जो मला लक्षात आलेला आहे. मी आळशी आहे, मलाही कंटाळा येतो, कधी तोंडात शिव्या येतात, कधी रडू येतं, थकवा येतो, अंग दुखतं, मान मोडते, ढोपरं फुटतात.. हे मान्यच नसलेली ही सुपरवुमन कॉन्सप्ट भंगार आहे साला. मला जे आवडतं ते मी करते. काही कर्तव्याची काम पार पाडते. तुमच्या आणि माझ्या आयुष्याला आवश्यक कॉमन अशी काम करण्यासाठी कधीही तत्परतेने उठून जिथे आपण आपले ढुं हलवण्याची तसदी घेत नाही तिथे ही गृहीत धरलेली सुपरवुमन नाईलाजाने वाकत राहते झुकत राहते पळत राहते वाढवत राहते स्पॉडेलायटिस.
आता वर्षातले १० दिवस ही सुपरवुमन एक स्वत:ची सुट्टी घेणार. तेव्हा ती काय करते आहे, कुठे जात आहे.. कुणासोबत, तिथे जाऊन ती डोंगर पाहील की दर्या हे ती सांगणार नाही. आवश्यक आहे अशी एक सुट्टी. परत येऊन सगळं निभवायचं आहे. मी नसताना तुम्ही काय कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघा.
घरदार, नवरा, मुलं.. सगळं जितकं हवंहवंसं वाटतं तितकच काही दिवस ह्या सगळ्याकडे पाठ फिरवून एकटं निवांत अगदी कुणाची एक हाक येणार नाही अश्या ठिकाणी सुट्टीसाठी निघून जाण्याचं प्रत्येक स्त्रीचं स्वप्नं असतं.. तिथे तिला कुणाचीही आई, बायको, मुलगी इ. काही व्हायचं नसतं. तिला काही काहीच व्हायचं नसतं.. बस एक वेळ हवा असतो.. अनेक भूमिका निभावत असताना तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या तिला गोळा करून पुन्हा एकदा जोडण्यासाठी.
सुपरवुमनच्या जाचातून सुटकाही हवी असते घराला नी त्यातल्या माणसांना. हो ना? काय बरं मी करेन बाहेर जाऊन एकटी.. कशी बरं एकटी एंजॉय करीन? म्हंजे मुलं बाळं नवरा आईवडील सासुसासरे एखादा ग्रुप सोबत नसताना कसं कसं म्हंजे शक्याय का ते? माझा जीव लागेल का एकटीने चांगलंचुंगलं आयतं खाताना. होSSS. लागेल ! मी... मी एका महागड्या हॉटेलात जाऊन त्याची खिडकी उघडून बाहेर झाडाच्या फांदीवर शांतपणे बसलेला कावळा पाहीन. अगदी शांतपणे.

Comments

  1. कसल्याही प्रकारच्या अपेक्षा नसलेला जीवा चा जिवलग छान शी साथ देवू शकतो...

    ReplyDelete
  2. खूपच छान कल्पना आहे, आवडेल अशी सुट्टी, प्रत्येक स्त्रीला,आझाद पंछी सारखं स्वछंद, मुक्त उडायला... शांत, विचारहीन,तणावरहित थोडा वेळ तरी जगायला...

    ReplyDelete

Post a Comment