काट्याकुट्यातून आपण फुलायला हवं

हल्ली तसं उदासच वाटत असतं. दरवर्षी मी दिवाळी जोरदार साजरी करते. खरेदीवर जोर अश्या अर्थी नाही. पण सफाई असते. तोडकेमोडके का होईना फराळंचं काही करते. चिवडा व बेसनाचे लाडू अगदी सुंदर होतात माझे. बाकी बोंब आहे. कबीरला कपडे, फटाके. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मरीन ड्राईव्हवर जाऊन आकाशात होणारी फटाक्यांची आतषबाजी पाहणे. तिथे रस्त्यावर उरले सुरलेले फटाके शोधणार्या मुलांसाठी नवे फटाके चॉकलेट घेऊन ते वाटणं. शिवाय दररोज चिकन, मटण, मासे ह्यांचं जेवण, फ्रीजमधे आईस्क्रीम भरलेलं असे. दारासमोर रांगोळी काढायचे काही फसलेले तरी हसरे प्रयत्न. त्यासमोर शांतपणे तेवणार्या पणत्या.
घरात हॉलच्या कोपर्यात पारंपरिक मराठमोळा लांबलचक शेपट्यांचा रंगीत आकाशकंदील झुलत असायचा. घराच्या प्रत्येक खिडकीत दिव्यांचं तोरण लावे. मग रस्त्यावर जाऊन रात्री अंधारात माझं घर कसं दिसतं हे कौतुकाने पहात बसायचं. आजच्या दिवळी माझे वडील हटकून जेवायला घरी येत असत. मी लहान असताना काका काकूच्या गोरेगावच्या घरी ते फटाके घेऊन यायचे. आता मी चांगली मोठी घोडी आणि आई झाले आणि ते आजोबा झाले होते तेव्हा ते माझ्यासाठी फळं, मिठाई घेऊन यायचे. मग आम्ही सगळे पाडवा किंवा भाऊबिजेच्या दिवशी गोरेगावला काका काकूंकडे जात असू. काकू काय काय करायची माझ्यासाठी.. रव्याची खीर, श्रीखंड, गोड्या मसाल्याची भरली वांगी बटाट्याची रस्सा भाजी, भाकरी, पाट्या वरवंट्यावर वाटलेली कांद्याची लाल चटणी.
लहान असताना मी लौकर उठून कारिंटं फोडून आंघोळ करत असे. काकू तेल लावायची, उटणं लावे. काकांना उटणं लावायची तेव्हा ते म्हणत, चला निदान उटणं लावताना बायको मला वर्षातून एका तरी हात लावते. तेव्हा ती मस्त लाजायची. ते घर मी दिवाळीच्या आधी कितीवेळा धुतलं असेल.. किती काय साफ केलं असेल. आता मला कुठलंही घर साफ करायला उरक राहिलेला नाही. काकू गेल्यानंतर बाबा गेल्यानंतर माहेरच्या घरांच्या खिडक्या म्लान पडून आहेत. काकाही फटाके आणत. ईसाभाईकडून एक मोठ्ठा खोकाभरून फटाके. फटाकेच फटाके. तेव्हा काय पैसा लागतो, कोण कसे मॅनेज करतात ह्याची भ्रांत नव्हती. दिवाळीला सगळ्या वातावरणालाच एक वेगळा मंगल सुवास येत असे. कपडे अंगाला नवे लागत असत. फराळाची चव लागत असे. काकू फराळ करायची त्याला वळणे, कातणे, भाजणे, निवडणे, डबे भरणे ह्या कामांत माझा हात लागत असे.
मी माझ्या काही मैत्रिणींना दिवाळीच्याआधी भेटवस्तू पाठवायची. पत्रं लिहायची. मी जशी होते तशी आता राहिलेले नाही. किंवा मी ज्यांच्यासाठी तशी होते ती माणसं माझ्यापासून, मी त्यांच्यापासून फार दूर निघून गेलेलो आहो. मला खात्री आहे की अश्या दिवसांत त्यांना माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. पण हरवलेले दुवे शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी अंगात धैर्य असावं लागतं. ते ज्यांच्याकडे नाही आणि माणसापेक्षा त्यांच्यात होणार्या अप्रिय घटनांनाच धरून बसणारे मी सोडून देणं पसंत करते. विष विषाने किंवा अमृतानेही मरत नाही ह्यावर माझा विश्वास आहे. मनात काहीतरी सोलत राहतं ते राहतंच.



मला तुझ्याबद्दल काही वाटतं, हे वाटणं समोरच्याकडून अलवार व्यक्त झालं की मनाला होणारा आनंद पुढचे काही दिवस मनात साखर ढवळत राहिल्यासारखा विरघळत राहतो. जागोजागी फिरून, एखाद्याची मापं, आवडनिवड यादबिद ठेऊन काही विकत घेऊन पाठवणं मला भलतंच आवडतं. परत सुरू केलं पाहिजे, हे मी गेली कित्येक वर्षं ठरवतेच आहे. पण आज माझ्याकडेच सकाळी एक कुरीयर आलं. माझ्या मैत्रिणीने मला ओंजळभरून सुगंध पाठवला आहे. एका छानश्या बॉक्समधे सुगंधी साबण होते. मला काय वाटलं हेही मी तिला धड व्यक्त होत सांगू शकलेली नाही. पण माझ्या भावना तिला पोहोचल्या असाव्यात ह्याची खात्री आहे. दिवाळीला घरातली मोठी माणसं मुद्दाम वेगळे वासाचे साबण घरी हटकून आणतात... आधी वाटलं साबण का पाठवले असतील हिने.. पण लगेच मला खूप खाप लहान झाल्यासारखं वाटलं. फार भारी वाटलं. तिने हे सारं करण्यासाठी वेळ काढला ह्याने भारी वाटलं.
प्रत्येक दिवाळीला ही अनमोल आठवण दरवळत राहील. हे सांगत राहील की काट्याकुट्यातून आपण फुलायला हवंय. आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी हसायला हवंय. मी माझ्यासारखी हल्ली दिसत नाही वागत नाही आणि मी तशी दिसू शकते स्वत:ला शोधू शकते, हे कित्येकदा बोलून दाखवणारं कुणी आसपास असावं अगदी तुझ्यासारखं. मी माझ्यासाठी काहीच घेतलं नाही, हेच मनाला नाही म्हंटलं तरी सारखं लागत होतं. काकू बाबा माझ्यासाठी म्हणून काहीतरी देत असतं. तिथे बाकी माझा नवरा मुलगा कुठेच नसत. फक्त माझ्यासाठी म्हणून दिलं गेलेलं असे. आज तसाच फील आलाय मला. खूप प्रेम गं तुला भाईगिरी करणार्या ए मुली.
थोबाडे.... भाईगिरी जरा कमी कर. साला केवढी दहशत आहे तुझी. ओरडणं आणि फैलावर घेणं ह्यात फरक असतो रे.. मी गरीब बिचारी म्हणून तुझं ऐकून घेते. असो. बाय.. संपलं पत्र. काम कर आतॉ. मी पहिल्यांदा बाय म्हणालेय.. हाहाहा.

Comments

  1. मनात रुतलं गं!!!

    ReplyDelete
  2. हरवलेले दुवे... विष विषाने किंवा अम्रुतानेही मरत नाही... व्वा, व्वा, व्वाच.

    ReplyDelete

Post a Comment