तर या ठिकाणी.. जय हिंद

आज प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने दिलसेचे नेते श्री. वाइकर यांना या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची मी नम्र विनती करते. बुके द्या बुके द्या.. तो लाल लाल.. पिवळा त्यांना नै..
..
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. महात्मा फुल्यांचा, आंबेडकरांचा विजय असो. शिवाजी महाराजांचा विजय असो. साबरमतीचे संत जे की गांधीजी इतके महान होते अख्ख्या जगात कुठेही जा त्यांना ओळखत नाही असा एक माणूस दाखवा. टिळकांच्या पगडीपासून ते नेहरूंच्या कोटावरच्या गुलाबर्यंत सगळं फेमस आहे जगात या ठिकाणी म्हणून.. ओ.. माईकमधून आवाज येत नाहीये.. हॅलो हॅलो हाल्ल.. आला आला. अरे बाळा पॅण्ट सोड माझी. वैणी घेऊन जा ह्याला. ओ वैणी...
इथे उपस्थितांपैकी ज्यांचे नातलग या ठिकाणी सीमेवर लढताना या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो, या शहीद जवानांपुढे मी मतनस्तक आहे. मी याठिकाणी आपल्या सोसायटीचे सचिव माननीय झाडे यांचा यांना सलाम. या ठिकाणी आपले सचिव कोणताही सण असो तेव्हा वेळ देणारे आपले या ठिकाणी मि. जुन्नरे यांना सलाम. या ठिकाणी या ठिकाणी काही असो आपल्या झेंड्याला या ठिकाणी सलाम करायला येतो. तर या ठिकाणी महिला वर्ग आला आहे. घरात न बसता या ठिकाणी. या ठिकाणी महात्मा गांधी, टिळक, सावरकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि त्यामुळे आपण या ठिकाणी या झेंड्याला सलाम करायला आलो आहो या ठिकाणी. या ठिकाणी खरोखर आपण सर्व जातपात धर्म विसरून सुट्टीला बाहेर न जाता येतो. माझे सहकारी या ठिकाणी या इमारतीचे माळी मि. कदम इथे आले आहेत. इथल्या खुर्च्या लावण्याचं मोठं क्काम त्यांनी आज केलेलाय याठिकाणी.

या ठिकाणी सरकारने महिलांविषयक कायदे केले. माइक बंद झाला. ऐकू येतंय शेवटपरेंत? हो. हो. हो.  मुलांबद्दल कायदे, खूप कायदे आले ही चांगली घटना आहे असं मी म्हणीन या ठिकाणी. आपल्या प्रतिक्षानगरच्या रस्त्यांचे ते खड्डे काम बुजवत असतात या ठिकाणी. प्रतिक्षानगरमधे..... प्रतिक्षानगरमधे..... आपल्या निसर्ग सोसायटीचं नाव खूप मोठं झालेलं आहे. याचा मला अभिमान आहे या ठिकाणी.
आजकालची पिढी आपली मुलं खूप बुद्धिमान झालेली आहेत. म्हातार्यांना जे समजत नाही असे गेम ते पटापट या ठिकाणी खेळतात. मी त्यांना सांगतो मुलांनो तुम्ही मोबाईल जरूर खेळा पण या ठिकाणी झेंड्याचा आदर झाला पाहिजे. या ठिकाणी आपण आलात त्यामुळे या ठिकाणी या स्वातंत्र्यदिनाला तसेच भारतभूच्या प्रजासत्ताक दिनाला मोठी झळाळीच आलेली आहे. 
सगळ्यांनी माझे भाषण ऐकता ऐकता उभे राहून खाण्याचा संयम दाखवला या ठिकाणी त्याने माझा ऊर भरून आलेला आहे असा हा झेंडा. मी माझे भाषण संपवतो. सगळ्यांनी गुरूकृपाचे समोसे बसून खावे. इमारतीत कचरा करू नये. जयहिंद. सगळ्यांना शुभेच्छा. भारतमाता की जाय.
हं होहो हो सांगतो.. आता या ठिकाणी माझा नातू चि. कु. डोडो ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गाऊन आपली कला पेश करेल तरी सगळ्यांनी शांत बसावे या ठिकाणी. चला, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरूमेदेवो सर्वकार्येषु सर्वदा. धन्यवाद.

Comments

  1. खूप खूप छान ...कित्ती कित्ती कौतुक करु ...अस्सच डोळ्यात अंजन घालणारे लिहीत जा 👌💐

    ReplyDelete

Post a Comment