शहर

व्यक्त न होणे हेच बोलणे
ओठ मिटोनी लपणे कणभर
दिसते तरीही आणि समजते
वाट पहाणे एक शहरभर

कापूर वारे कापूर गहिवर
विरह जाळतो नेत्र कुशीवर
हलके हलके काजळ काळे
अलगद धरते एक शहरभर

धमन्यांमधूनी रक्त धावते
आणि धावते वीज धरेवर
भरून येते अधरांवरती
हलकी थरथर एक शहरभर

गर्दीमध्ये तू असताना
मी असताना वळणावरती
वळणावरती श्वास थबकतो
चाफा फुलतो एक शहरभर

दंगलधोपे खूनखराबे
बंद शटर अन रोज तमाशे
तरीही वाजते गल्ल्यावरती
गझल तुझी
मय एक शहरभर

माहीत नव्हते हरवून जाईल
अवचित जे सापडले होते
ओळखू येते माझे मीपण
एकाकीपण एक शहरभर


रस्त्यांच्या रेघोट्यांवरती
केली होती गिरबिट ओली
सारे पुसले पाऊस आला
पत्ता चुकतो एक शहरभर

तुझे हसणे तुझे बोलणे
तू रागवणे तूच भडकणे
तुझं अक्षर
मी साला निरक्षर
तुझीच चर्चा एक शहरभर

तू विन्मुखता भाळावरती
आठ्यांचे तटतटते जंगल
सांग कसे मी करू शांतवन ?
वणवा पसरे एक शहरभर

तू गेल्यावर मीही जातो
उरतो रस्ता जिथे भेटतो
त्या जागेवर गर्दी जमते
आणि शांतता एक शहरभर

तहान आहे पण भूकच नाही
थोडे आहे पण थोडे नाही
ओठांवरती ओठांपुरते
सारे मिळते एक शहरभर

रखरखणार्या शहरामध्ये
तूच एकटी रिमझिमणारी
तुझ्या लोचनी भरता पाऊस
मळभ दाटते एक शहरभर

हातामध्ये गजरा बांधून मीही पडतो
शेजेवरती.
शेजेवरती तू नसताना
उठते मोहळ एक शहरभर

सूर्यास्ताच्या मागे जाऊ
हातांमध्ये हात गुंफूया
ओंजळीतल्या रेषा जातील
हरतील हरवून एक शहरभर

पसरत जातो तरंग वर्तुळ
बोट टेकतो जिथे स्तनांवर
बुडतो तरीही का जागते
तहान सारखी एक शहरभर

तुझ्या तिळांना मोजत मोजत
जोडत जातो उत्तररात्री
खेचून घेते रांगोळी
गेरूची तगमग एक शहरभर

मणक्याखाली जाताजाता
जिथे पायरी अखेर उरते
गळ टाकून मी तिथेच बसतो
तळे साचते एक शहरभर

तू रूसल्यावर गुंगून जातो
शोधत फिरतो शब्द सहोदर
पाठ मुरडते मौनरागिणी
मैफल जमते एक शहरभर

नाव रेणुका वाळूवरती
मी कफ्फलत गिरवीत जातो
लाट शोषते अक्षर बसरा
माळ विखुरते एक शहरभर

तू आवडते शहर तुझेही
तुला भेटण्या होते दगदग
भेटून जातो येतो म्हणूनी
खर्च वाढतो एक शहरभर

Comments

  1. वाह!! एखाद्या पुरुषाला आपलं इतकं व्याकुळवणारं वेड लागावं असं नक्की वाटायचं वाटतं कदाचित वाटत राहील . कोणी सांगावं असा कोणी अस्तित्वात असेलही. पण या भावनेला इतकं सुरेख शब्दात व्यक्त करणं नाही जमत.

    ReplyDelete

Post a Comment