हुजूर ए खजूर



काही दिवसांपूर्वी माझी मैत्रीण शब्दगंधा कुलकर्णी हिचा फोन आला होता. मी किती आळशी आहे ह्याची तिला पूर्ण कल्पना आहे. तिने खजूर आणि तूप हे एकत्र केल्यावर तो प्रकार प्रकृतीस कसा उपकारक आहे ह्याबद्दल सांगितले. मला असं छान छान काळजीने कुणी बोलत असेल की ऐकत रहावं वाटतं. मला उरक नाहीये अजिबात. मी मुलखाची आळशी. इथे खाण्यापिण्यावर छान छान पोस्ट करणार्या ब्लॉग चालवणार्या काही स्त्रियांवर भयंकर जेलस वगैरे आहे.😘 त्यांच्याकडे पाहिलं की सारखं वाटतं साला आपल्याला हे काही जमत नाही. ऐसा क्यू. राहण्यापासून ते विविध जिन्नस करण्यापर्यंत, मेहमाननवाजी करण्यापासून ते वर्षभर धडाधड कामं करण्यापर्यंत, सतत छानच दिसण्यापासून ते तसं दिसण्यासाठी धडाकेबाज व्यायाम करणार्या अनेक स्त्रिया मला भयंकर सेक्सी वाटतात. आवडतात यार ज्याम. पण मी त्यांच्यावर वरून जळते आतून पोटभर माया करते. त्यांच्याकडून काही शिकून आपणही असं वागलं पाहिजे जरा सुधारलं पाहिजे हे मी वेळोवेळी ठरवते. मला तितके जमेल असे नाही पण थोडंबहुत प्रयत्न करूच शकते.
त्यात शब्दगंधाचा फोन आला आणि तिने ही सोपी फटाफट कृती सांगितली. मी इंटरनेट सर्चिला थोडा वेळ खर्चिला. हा फार डेंजर पौष्टीक मामला आहे राव. लहान मुलांसाठी फार फार चांगलाय म्हणे. हे सकाळी किंवा रात्री एक ते दोन मुलांना द्या वर दूध द्या, तबियत बागबाग होऊन जाईल म्हणे बुवा.
मी ह्यात अर्धा किलो बिनबियांचा खजूर घेतला. बिया काढत बसायची च्यायची कटकट नको. रेडीमेड सीडलेस खजूर जिंदाबाद. एक पसरट खोलसर भांडे गरम केले त्यात चार पाच चमचे तूप घातले. ते चमच्याने सारे ढवळले. मग चार ते पाच मिनिटांनी टपरवेअरच्या ' हॅलो किटी ' च्या डब्यात ते भरून ठेवले. लगेच त्यावरची मांजर म्यॉव म्यॉव म्हणाली. म्हंटलं गपे म्हशी .. तुझ्यासाठी नैत काही हे खजूर माझ्या लेकासाठी आहेत. आली मोठी शॉणी. 😀
आता हा डबा दिलाय फ्रीजमधे ठेऊन. त्याने खजूरावर लागलेलं तूप आत मुरलं आणि थंड हवेत साकळून घट्ट बसतं. ह्याचा स्वाद तर काय लागतो. नादखुळा.
तूपातले हे खजूर तितके गोड का लागत नाहीत ते मला माहीत नाही. पण गोडी उतरलेली नाही तर अवीट झाली आहे. एक खजूर तोंडात ठेवला की अहाहा हा.. थेट स्वर्गाची कवाडं उघडी. तोंडात खजून विरघळत असताना डोक्यात तूप चढते. मुलं पण चॉमचॉम नॉमनॉम करत मुकाट्याने खातात.
मोठ्या माणसांनीही हे जरूर खावं. कोक पिण्यापेक्षा वेफर चिवडे नी फरसॉणचे बकाणे भरण्यापेक्षा हे काय वाईटे? 😈 हे असे खजूर फ्रीजबाहेर ठेवले तर टिकतात का ते मला नाही माहीत. तसंच ठेवल्यास किती महिने राहतील, कश्यात ठेवावेत ते मला नाही माहिती. मैत्रिणींनो तुम्हांस याबद्दल अधिक माहिती असल्यास मला सदर पोस्टखाली कमेंटमधे जरूर कळवा. 😘😋
ह्या खजूराचे पोट फाडून आत तुपात तळलेले बदाम घालून मग वरून तुप लिंपूनही ते सेम टू सेम ह्याच पद्धतीने सेट करता येतील. छेडा हमको येडा समझा है क्या. हमकोभी आता है. पण माझ्यातल्या कंजूष स्त्रीने असे करण्यापासून मला परावृत्त केले. सगळ्ळीकडे बद्दाम बद्दाम बाप का मला समझ रख्खा है क्या?
हे हुजूर साहेब खाल्याने कामवासना वाढते असे सांगणारे काही व्हिडीयोही पाहिले. म्हणजे व्हिडीयो नाही बघितले. पण तसे टॅग मात्र ह्या रेसिपीचा सर्च दिल्यावर नजरेस पडले हे मात्र आहे. जे पाहिलं ते सांगतेय. त्यात लपवायचंय काय. हे असं होतं का ते नाही माहीत.
ह्याचे फायदे तोटे खरे किती नी काय ह्यात का पडा? काही म्हंजे काहीच मेहनत नाही ह्यात विशेष. म्हणजे कुकरही लावता न येणार्या पुरषांनाही हे सहज करता येतील आणि त्यांच्याच मुलांना खाऊ घालता येतील.. इतकं सोपं आहे हे.. क्काय ! 😂🌹

Comments