डोहामधली सालस हडळ

मनात मोठं रान गं रानामधे बाहुल्या
उन्हात तिची मूर्ती उभी सभोवती सावल्या
सावल्यांच्या तहानेला आसवांचं पाणी
पाण्यामधे पाय तिचे डोहामधे गाणी

ती बसली होती कितीतरी वेळ पाण्यामधे पाय सोडून
मी एक डोळा उघडा ठेऊन तिची पाठ पहात होते
वाकल्याने पाठितून बाहेर आलं होतं
बाक आलेलं धनुष्य
ती गेली पाण्यात हळूहळू चालत.
ती मरणार नाही. ती मरणार नाही.
कशी मरेल? कशी मरेल?
तिला मला मारायचं असेल
ती गेली आतआत आतआत
वळली.. ती अशीच वळते रोज
ती बाहेर येते आहे
सावकाश चालते आहे माझ्यादिशेने
तिच्या नागडेपणाची भीती वाटते
माझ्या झाकलेपणाची त्याहून जास्त वाटते
कुणीच पाहू नये मला नागडं
माझा पाय बंद झालेला आहे
मी खाली वाकत चाललेली आहे
पाय पकडायचाय मला
तो मला उचलावा लागेल
उचलून पुढे ठेवावा लागेल.. त्या हडळीपासून पळण्यासाठी
पण पळता येणार नाहीये.. नाही येणार पळता
पळण्याचा प्रश्नच येत नाही
मृत्यूपासून पळून गेल्यावरही जिवंत रहायची सोय मिळत नसते
कुठे गेली ती?
गेली असेल पलंगाखाली. हडळ मेली.
हडळ आईसारखी दिसली होती
किती सुंदर आणि सालस वाटत होती
डोहामधली सालस हडळ |

Comments

  1. जी ए लिहित असल्यासारखा भास् होतो !!

    ReplyDelete

Post a Comment