तुंबलेलं रहायचं की मोकळं व्हायचं ?


विवाहितेनं पतीखेरीज मित्रास, सहकार्यास, चुलतमामे आतेभावास, फेसबुकर्यास कधी "तू मला आवडतोस" सांगितलं म्हणजे लग्गेच तिला, तुझं तुझ्या नवर्याशी सगळं ठीक आहे ना? हे विचारतात. यावर तुला असा अनुभव आलाय का, हेही काही बुद्धीदळीद्र आलेले मनात किंवा कमेंटमधे विचारणार. नवर्याशी सगळं ठीक अाहे ना म्हणजे सगळ्या भुका व्यवस्थित भागताहेत का, हेच आणि हेच ताडणं. नवर्याशी काही काही प्रॉब्लेम नसताही समजायला सोप्पं जावं म्हणून जिथे लगेच परपुरूष ही संज्ञा वापरली जाते अशी व्यक्ती आवडणं म्हणजे अरे ब्बाब्बा रे ब्बाब्बा. मला अमका तो आवडतो, असं सहज आपल्या मैत्रिणीला सांगण्याचीही चोरी वाटते ३० शी ३५ शी ला आलेल्या स्त्रीला. माझी मोरी आणि मुतायला चोरी हे बायकांना मोकळं होण्याबाबत सगळीकडेच सहन करावं लागतं आणि आता आपण चाललोय २०१७ मधे. वाह ! मग बायका काय करतात माहीत आहे का, त्या इनडायरेक्ट इनडायरेक्ट कविता, पत्रं लिहतात सरेआम आणि ठिबकसिंचन मेथडने भावनांच्या बागा बांधतात. हम्मम्म हम्मम्म... हीचं ना नक्की अफेअर असणार कुणाशीतरी... ती विवक्षित कविता वाचून एखादी यमुनाबाई आगाशे जमुनाबाई आगाशेच्या इनबॉक्सवर पाय वर करून जाणार च्यायला.. कधी संपणार हे? 
एखाद्यासोबत बसून दोन गाणी ऐकायला बरं वाटतं, दोन तास गप्पा मारल्या की फ्रेश वाटतं. समोरचा आवडलेला नसेल तर हे होणं शक्याय का? मग तू आवडतोस बाबा, हे बाईने सांगितलं की शरीर शरीर शरीर शरीर या शब्दांचा मनात कर्कश्श भोंगा वाजायला लागून आसपासच्यांची फाटायला लागते. स्त्रीच्या मनाचा - देहाचा ताबा सप्तपदीनंतर पतीच्या हवाली असतो या रॉकसॉलिड धारणेतूनच, तिचं नवर्याशी जमत असेल का यापासून ते तो तिला पुरत असेल का इथपर्यंत प्रश्न पडणं हे कसं सहाजिक्कच आहे, हेही डांबरघट्ट उत्तर तयार असतं. आता थेट शरीराविषयीच बोलते.
बायकोचं गरोदरपण. पण काय करणार कंट्रोल होत नाही म्हणून प्रॉस्टिट्यूटकडे जातो कधीमधे हे सांगणार्या पुरूषमित्राचं शांतपणे ऐकून घेणार्या मैत्रिणीच्या मनात कोणतेही प्रश्न येत नाहीत. जसे की ही तुझ्या बायकोशी केलेली ही प्रतारणा नाही का इ. तुझ्या बायकोला कधी चेंज हवा असेल किंवा तू बाहेरगावी असताना तिला कंट्रोल झालं नाही तर तीही तुझ्यासारखी आपली गरज सुखाने भागवून आली तर चालेल का? असे प्रश्न विचारले तर, माहीत नाही यावर मी कसा रिअॅक्ट होईन हे कॉलरबचाव उत्तर येणार. 
इथे फेसबुकवरही मोकळेपणाने लिहणार्या, बिनधास्तपणे लिहणार्या, शरम सोडलेल्या, भडक लिहणार्या, लोकं चाळवली जातील असं मुद्दाम लिहणार्या अशा कॅटेगरी पाडलेल्या आहेत. तुम्ही लिहताच तसं मग जर तुम्हांला टिंबटिंब प्रकारच्या कमेंट्स आल्या तर त्यात आश्चर्य नको, असं सांगतात इथे लोकं ! इथेही स्त्रियांनी चापूनचोपून शंभर पिना लावलेलं गोलघट्ट साडीदार लिहावं अन्यथा जशा कमेंटस किंवा इनबॉक्स मजकूर येतात ते भोगावं हूंचू न करता, त्यात समोरच्याचा काय दोष असा विचार केलासांगितला जातो. तू लिही आणि जे दात काढतील त्या बायाबाप्यांचे दात तोड.. असं आपण सर्वांसमक्ष सांगितलं तर चुकून आपल्याही जग अल्ट्रा फेमिनिस्ट म्हणेल की काय या भितीने जिथे पेटलंय तिथून पळून जाणार्या स्त्रियांचीही कमतरता नाही. पुस्तकांवर लिहावं, समाजातल्या, धर्मातल्या, राजकारणातल्या समस्यांना हात घालावा पण यात जिथे जिथे सेक्स हा विषय मुरलेला आहे तिथे बाईने हात घालू नये. म्हणजे कशाला ना.. मग ती बोल्ड लिहणारी बाई, चळवळी, वळवळी, झेंडेवाली बाई असं.
बायकांनी बोलताना शिव्या वापरल्या तर त्या त्यांच्या कपड्यांना साजेश्या नसतात मग किती विनोदी वाटतं ते.. यावरून खिल्ली उडवणं. कपडे परवडत नसतात अनेकदा पण योग्य तिथे शिव्या घालायला पैसे पडत नाहीत. शिव्या फाकडू पोरींच्या तोंडात शोभतात, वन पीस काकडी मुलींच्या देहावर शोभतात.. हे सगळं बोलणारे पुरूष आणि त्यांना चढवणार्या बायका एका हद्दीनंतर डोक्यात जातात. पोट सुटलेल्या जाड्या गेंड्या पुरषांनी बायकांवर कमेंट करण्याआधी जावं रोज दहा किलोमीटर पळून यावं स्साला. कुणी काय घालायचं, कसं बोलायचं, कसं व्यक्त व्हायचं, कुणाला भेटायचं या सगळ्याचे वाद स्त्री जिथे जिथे तिथे तिथे तापलेल्या इस्त्रीसारखे काहीतरी सरळ करून दाखवतो भेंचोत, यामिषाने फिरत राहणार. तुम्ही इथेच राहणार. याच विचारांत सडणार आणि कमळं उगवणार इथेच्च लाइक्सची. कशी जिरवली याअर्थी पाठीवर थाप मारणार्यांच्या कौतुकाची कमळं.
मास्ट्रबेशन हा असाच एक विषय फक्त पुरषांनी करावा बोलावा विनोदावा हे ठरलेलं आहे. आपल्या आसपासच्या पुरषांनाच काय कितीतरी बायकांनी स्वत:चं मन चाळवून आत तुंबलेलं मोकळं करण्याची गरज आहे. त्या तुंबीत घाणीचा वास मारायला लागलेला आहे.

Comments

  1. अगदी मनातले ...तू जे लिहितेस ना...सलाम तुला..✌��

    ReplyDelete
  2. Jara jad jatay svikarayala pan nirikshan yogyach aahe !!!!

    ReplyDelete
  3. Jara jad jatay svikarayala pan nirikshan yogyach aahe !!!!

    ReplyDelete
  4. इतकं जीवतोडुन लिहिलंयस पण कित्येकांच्या पार डोक्यावरुन गेले असणार..थेट हृदयापर्यंत पोहोचवयास काळीज पण तसं मोठं दिलदार असावं लागतं....पुरुषां तितकेच अश्या कचकडी बायकांना पण हे सणसणीत कितपत झेपेल ? शंकाच आहे...काय लिहितेस अगदी अवधूत गुप्ते च्या भाषेत सांगायचे तर तोडलएस मित्रा..👍👍👍 बहोत खूब 👍👍👍👌💐

    ReplyDelete

Post a Comment