नारळाची वडील वडी

नारळाची वडील वडी..
वडी वडी नारळवडी
सरोवरी घालू नये साखर खडी
वडी वडी नारळवडी
दुधाचा मुलामा मलईची लडी
वडी वडी नारळवडी
जायफळ किंवा वेलचीची कडी
वडी वडी नारळवडी
दोन चार चेपून घ्यायची पडी
🤔 हे काय आहे.. नारळाची वडील वडी करताना आईचं एक गाणंही सोबतीला हवं असं समजून घ्या. 🤤
...
नारळ वडी कधीही करता येते. त्याची काही लगाबगा घसाघसा तयारी करावी लागत नाही. माझ्यासारख्या आळशी लोकांसाठी ही पाककृती बेस्टय. आधी नारळ परीक्षा. नारळवाल्याकडे नारळ घेताना आत पाणी आहे का ते पहावं. त्यासाठी नारळ कानापाशी धरून गदगद गदगद हलवून बघायचा. तेव्हा नारळावाल्याकडे जरा भुवया आक्रसून पहायचं. भुवया आक्रसून नारळाची तपासणी करण्याचे कारण आपण नारळवाल्याला उगाच नारळातले दर्दी वाटू लागतो. आपण काहीच प्रश्न न विचारता नारळवाला आपणहून बडबडायला लागतो. अरे बहोत बढिया नारियल है. ऑप लेके जाओ.. हमेशा का गिर्हाईक है आपको गलत माल नही देगा इ. इ. 😀😀 उतनाच्च अपुनकाभी टाईमपास हो जाता है.
नारळाच्या आत किती पाणी आहे हे पाणी हलायचा जो आवाज येतो त्याने जोखायचं. आतून खूप खळबळ आवाज येत असेल तर तो कोवळा नारळ. तो न घेता पाण्याचा ज्यातून कमी आवाज येतो तो नारळ घ्यावा. नारळात पाणी कमी असेल तर ते नारळात मुरलेलं असल्याने नारळ चवीला गोड लागतो आणि त्यात साखर जरा कमी घातली तरी जमत्ये.
एकदा मी नारळ इतका जोरात हलवून पाहिला की तो टाण्णकन माझ्या डोक्यालाच आपटला. असे पॉ क्षण दुसर्याच्या समोर का घडत असतात राव? दुसरे माझ्याकडे पहात असतानाच नेमकं असं का घडतं? ह्याला काही उत्तर नाही. त्यावर नारळवाला दात काढून हसला होता. मलाही घरी येताना रिक्षात हसायला येत होत. रिक्षावाला कन्फ्यूज ! 😁
बरं आता नारळ ज्यांना घरी फोडता येतो त्यांनी नारळवाल्याला कष्ट देऊन रेडिमेड.. मी फोडूनच आणला ग्गं बाई, असा आगावपणा करू नये. काय आहे की आपण बायका पडलो आळशी.. च्यायला तो नारळ फोडून आणला की लग्गेच घरी आल्यावर घसाघसा करायला घ्या. ते कुणी सांगितलं ? नारळ अख्खा असेल आणि त्यात पाणी जास्त असेल तर तो घरात भिंतीपाशी उभा करून ठेवावा. तसे नारळ वर्षभरही टिकतात.. 😜 नाय नाय पण नारळ असा उभा करून ठेवला की तो महिनाभर टिकतो. पाणी कमी असल्यास आठवडा दीड आठवडा राहू शकेल.
उत्साह उतू जात असला तरीही आपणच नारळ फोडण्यात मजा असते. त्यातलं पाणी लगेच तोंडात ओतता येतं. पाककृती कशी अशी सर्वसमावेशक असली पाहिजे. त्यात पहिल्यापासून आत पडणार्या खाद्यप्रकारांवर हात मारता आला पाहिजे. हा रोमांन्स आहे. आम्ही बाबा वस्तू झाल्यानंतरच चव पाहतो. मिठाचा अंदाज घ्यायलाही कधी आधीच थोडं खाऊन बघत नाही.. असं टेचात सांगणार्यांची मला अॅलर्जी आहे. मलाही माझ्या हातावर फूल भरौसा आहे त्यामुळे मी चवाचवी करायला जात नाही. पण समजा चिकन असेल, खिमा असेल तर मी चमचे घालघालून सारखं सारखं मीठ बरोबर आहे ना.. अजून काही कमी जास्त घालायचं आहे का ते दोन चार वेळा तरी बघतेच हो. सगळ्यांच्या आधी आपण चमचा चमचा खिमा चोपल्याची मजाच काही और आहे.
असो तर आपण कुठे होतो.. नारळवाल्यापाशी. 😀😀 नारळवाले फार देखणे नसतात. तिथे फार रेंगाळू नये. घरी जाताना ऊसाचा रस प्यायला थांबावं. तिथे जरा श्रमपरीहार होतो. कुठलीही पाककृती करताना आपण आनंदी असणं महत्वाचं आहे. निवांतपणा पाहिजे.
प्रत्यक्ष कृती
..
एक वाटी नारळ आजोबा खवून घ्या. नारळाचा चव ज्या वाटीत मावेल त्या वाटीचा तीन चौथाई हिस्सा साखर आज्जी घ्यावी. जायफळाचे एक खांड आणि ते किसायला बारीक किसणी तयार ठेवावी. तापून आरामसे आरावून पडलेलं दूध ज्या घट्ट खमंग सायीच्या पांघरूणाखाली गुडगुडून झोपलेलं असतं त्याचं ते पांघरूण खस्सकन ओढून घ्यावं. 😋😋 ते एका कपात चमच्याने फेटून सारखं करून बाजूला ठेवावं. बस्स गुरू हो जा शुरू. नारळ, साखर, मलई सगळं एका नॉनस्टिकच्या कढईत घालून मध्यम आचेवर परतायला घ्यावं. कढई कालथा हे सारे अश्या पाककृती करायच्या वेळेस विसळून घ्यावेत. सारं स्वच्छ निर्मळ आहे हे डोक्यात राहतं आणि मग नि:संशय कार्यसिद्धी होते. चला मम म्हणा. :P
साखर वितळायला लागली की त्यात चार पाच चमचे दूध टाकावं. ह्याने वडी लुसलुशीत मऊ होते म्हणे. कुणास ठाऊक. दूध जास्त टाकलं तर वडी मऊऐवजी मू होईल का..? ह्याह्याह्या.. हे सारं मिश्रण लौकर आळत येतं. तसं होत असताना त्यावरच छोटी किसणी धरून जायफळाचं खांड किसावं. नारळाच्या मिश्रणाला ही जायफळाची पप्पी साधारण मिश्रण होत आलं की द्यायची. त्याने वडीला छान छान सुगंध येतो. गरमागरम हाटत असताना तो सुगंध जास्त तापल्याने पातळ होण्याची शक्यता असते. 😜 वडीत जायफळ किंवा वेलची काय घालायचं ते आधीच ठरवा. दोघांनाही अमेझिंग सुगंध आहे. जायफळपूड आणि वेलचीपूड दोन्ही एकदम टाकल्यावर त्यांच्या सुगंधाचं टेक्सचर बर्बाद होतं. वेलचीसोबत जायफळपूड वापरल्यास सुगंध उग्र होतो. हे म्हणजे एकाचवेळी दोन बॉयफ्रेंड केल्यासारखं होईल. असो नको तिथे नको तो विषय नको.. 😉
आता कालथ्याला नारळाचे मिश्रण मिठ्या मारायला लागेल आणि कढईचा तळ ते सोडायला लागेल. झाले म्हणजे नारळवडीला आता सासरची ओढ लागली ती माहेर सोडण्याच्या तयारीत आहे भौ आता काय खरं नाही. ताटाला तूप लाऊन घ्यायचं त्यावर हे सारं मिश्रण ओतायचं आणि कालथ्याने चपट करत पसरायचं. पाच ते सात मिनिटात ते जरा कोमट झालेलं असतानाच त्याच्यावरून सुरी फिरवायची. तेव्हा ते ओलं असताना सुरी आरपार जाते आणि वड्या नीट पडतात. मिश्रण कोरडं झालं की वड्या पाडताना उगाच नारळ भसकन तुटायला लागतो. वड्यांचे आकार कापून ताट तसंच ठेवायचं. दहा ते पंधरा मिनिटांनी हातानेही वडी सुटेल.
वडीचे मिश्रण गरम असताना ते ताटात लिंपून झाल्यावर गार्निशिंग करायचं. पिस्ता मामी बदाम तात्या इ. भुरभुरून वरून लाटणे फिरवायचे म्हणजे ते गार व्हायच्या आधीच सुक्या मेव्याचे पातळ उभे काप नारळवडीत चेपले जाऊन फिक्स बसतील. मनुके घालायचे असल्यास ते कढल्यात मिश्रणाचे बाळंतपण चालू असतानाच टाकावेत. वडीच्यावर मनुके टोचले तर मस्तच दिसतील. पण मिश्रण जास्त कोरडं झालं असेल किंवा मनुक्यांच्या डोक्यात कसला जुना रागबिग असेल तर ते वड्या कोरड्या झाल्यावर बसल्या जागून टण्णकन वडीबाहेर उडी मारतील आणि मग नारळवडीच्या गालावर खळी पडेल. त्या आपल्याकडे बघून हसायला लागतील. तेरा कैसा पोपट हो गया रे मामू, असं म्हणायलाही नारळवड्या मागेपुढे बघणार नाहीत.
माझ्याकडे भाजलेले तीळ आणि खसखस उरली होती. तीही मी नारळ वडीत ढकलली कढईतच. वरून काळे तीळ टाकून लाटणं फिरवलंय. वड्या तैय्यार. रापचिक झाल्यात. आम्ही पुरणपोळ्या वगैरे फालतू गोष्टी करत नाही. जे कठीण तेच पहिल्या फटक्यात ए1 करून पार होत असतो.
😂😂😛






Comments