नात्यातली बिळं

गैरसमजातून दुसर्या डोंगरावर जाऊन बसलेले काही काळानंतर लांब लांब ढांगा टाकत पुन्हा शेजारी येऊन बसले नाहीत तर समजावं.. उन्हे ये नजारा पसंद नही. त्यांनी प्रेम लावलंच नाही,पावडर फासली तोंडाला फक्त.
शुल्लक कारणांवरून खूप वर्षांपासून असलेलं नातं च्युत्या गोष्टींसाठी फेकून देतात माणसं. " इतक्या वर्षांत तू मला फोन नाही केलास.. माझी आठवण आली का तुला.. आम्हीच का फोन करायचा.." असं म्हणणार्या माणसांना त्यांनीही कधीच न केलेले फोन बरोबर आठवत असतात.उंदीर साले. नातेवाईकांत तर ही बिळं फारच सापडतात.
गोड गोड वागणारी माणसं गळ्यावरून हळूच सुरी फिरवायलाही मागेपुढे पहात नाहीत. असल्यांशी मिळमिळं वागून, त्यांच्यासमोर सतत पडतं घेऊन आपणही काय मोठा तीर मारत असतो. नाती ही पैशासारखी असतात. ज्यांचा वेळेला उपयोग झाला नाही तर काय फायदा? सतत फायद्यासाठी आपण नाती बघूही नयेत हेदेखील खरं असलं तरी समोरचा आपली मागून टिंबटिंब मारतो आहे हे कळल्यावर तरी उगाच त्याच्यासमोर हॅ हॅ हॅ करत तोंडपुजेपणा करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे का हेही तपासून पहायला हवं.काहीवेळा पटकन स्नेह जुळतो. तिथे काही माणसं या जुळलेल्या स्नेहाचं फूल क्रेडिट स्वत:कडे ठेऊन नव्या मित्रमैत्रिणीबाबत पटकन मत ठरवून मोकळे होतात. फाडकन काहीतरी बोलतात.. अतीदुर्दैवी जीव !
एकच लक्षात ठेवायचं की,आपली अंतर्वस्त्रसुद्धा रंग बदलतात चार मशिनवॉशनंतर. लालचे निळे होतात आणि निळ्याचे पांढरे ! इतके की ती लपवून वाळत घालावी लागतात. इथे तर फार विचित्र मेंदू असलेला माणूस आहे. समोरच्याचं काय चुकलं काय बरोबर याची फार धुलाई करायला गेलात तर नात्याचं चड्डी बनियन व्हायला वेळ लागणार नाही. ज्या स्पष्टवक्तेपणाने दुसर्याचं मन दुखावलं जातं तो काय कामाचा? असं मला सांगितलं होतं माझ्याच एका लाडक्या मित्राने. आपण समोरच्याला स्विकारलं पाहिजे. तू तसा तर मी अशी... तू च्यूत्येगिरी केलीस तर लक्षात ठेव हां मी सुपरच्युत्येगिरी करणार, हे असं वागल्याने काय होतं? एकच कळतं आपल्याला तोडणारा हा समोरचा माणूस दगड आहे. दगडाकडे कितीवेळ बघत बसणार.. ते पायाखाली जातात किंवा फेकून मारता येतात नी फुलांचे गजरे होतात..
..
एवढ्या तेवढ्यावरून जजमेंटल होत समोरच्याला तुच्छ समजणारी माणसांना सरळ फाट्यावर मारायचं. शितावरून भाताची परीक्षा करावी पण माणूस म्हणजे भात नव्हे.

Comments