बटर बोटॅटो

आळशी गृहिणींना जेव्हा जेवण करायला कंटाळा येतो आणि त्यांचे गृहाणे हजार रूपयांचे पिझ्झा ऑर्डर करायच्या तैयारीत असतात तेव्हा हे बटाटेराव मदतीला येतात. मधल्या वेळी नुस्त काहीतरी गरम टेस्टी चावत बसायचा मूड येतो तेव्हा बटाटे खरोखर गुणी बाळा सारखे मी मी मी करत दुडदूडत येतात.
कुकर लावताना डाळ तांदूळ शिजवायला ठेवतो त्यावर एका डब्यात बायडिफॉल्ट तीन ते चार बटाटे आणि तीन चार अंडी मी ठेऊन देत असते. त्या डब्यात अजिबात पाणी घालायला लागत नाही. कुकरचा आकार मोठा असेल तर त्यात साचणार्या वाफेत बाळ बटाटा आणि अंडा स्वामी लै झाक उकडून निघतात.
कुकर मोठा असतो तेव्हा मोठ्या आचेवर एक शिटी घेते आणि नंतर पंधरा मिनिटं आच बारीक करून ठेऊन देते. मोठा कुकर तापायला वेळ लागतो. पण तो तापल्यावर त्यात वाफेचा खूप साठा होतो. एक शिट्टी माफ करून टाकायची पण पुढे जमणारी वाफ वाया घालवायची नाही. इतक्या मोठ्या वाफेवर बारीक गॅसवर काहीच मिनिटात आतले अन्नपदार्थ चांगले शिजतात. दणादण शिट्ट्या तोंडाने वाजवायच्या आयटमकडे बघून त्या कुकरने वाजवायची भुक्कडगिरी का करा ? कश्यावरूनही मी समोरच्याला नावं ठेऊ शकते. समाजाकडून बरच शिकले आहे मी. समाज.. असो असो
त्तर ही शिजलेली अंडी व बाळ बटाटा फ्रीजमधे द्याचे ढकलून हवे तेव्हा वापरता येतात. खूप यमयमीत खायची इच्छा झाली की हे बटरमधे लोळलेले कडेकडेनं सोनेरी झालेले आणि मग चिझचा मास्क लाऊन सुख अंगावर घेऊन जिवाचा शिवा करणारे बटाटे कधीतरी करायचे. इथे कधीतरी हा शब्द महत्वाचा आहे. बटाटा अधिक पोटॅटो म्हणजे बोटॅटो.
सादर आहे बटर बोटॅटो
शिजलेल्या बोटॅटोंना सोला. मग त्याचे जाडे जाडे एकसमना तुकडे करा. त्यांना एका पस्रट भांड्यात घालून त्यावर बारीक केलेली साखर ( माझ्याकडे पिठीसाखर तैयार नसते. चमचाभर साखर खलात घालून खरडून तीच ओतते. जास्त कामं करायची नाहीत. च्यायची कटकट.. 😀), मीठ लाल, काळं पिवळं पांढ्र आपका चॉईस.. , अर्ध्या लिंबाचा रस हे घालायचं. आणि ते भांड वरखाली हलवून सार्या बटाट्यांना लागेलसं करायचं. माझ्याकडे धने जिरे पावडर तयार असते. त्यात मी नेहमी १०० ते १५० ग्रॅम अळशीही भाजून पूड करून घालते. त्या धने जिरे अळशी मिक्सचाही एक चमचा बटाट्यांना खायला घालायचा..
आता भाजो बिझनेस.
तुमच्या आवडीच्या कढईत आधी एक चमचा तूप टाका. शांतपणे ऐका हं उड्या मारू नका. 😛 नंतर त्यात बारीक कापलेली हिरवी मिरची. मिरची सुरीने बारीक कापता आली पाहिजे खडखड. ती मिक्समधे बारीक करायची गोष्टय का हाड्ड. 😀 मग त्यात कडिपत्याची बारीक बारीक कापलेली आठ ते दहा पानं टाकायची. हे पण सुरीनेच कापायचंय. कडिपत्ता केसांसाठी चांगला असतो यू नो. यू नो ना.. 😜😜 काही डुक्कर लोक्स कडिपत्ता बाजूला काढून फेकून देतात. पण आपल्याला त्यांच्या आरोग्याची काळजी असल्याने आपण तो कापून घातला की इतका बारीक कडिपत्ता ऐन भुकेत हादडिंग चालू असताना बाजूला कोण काढीत बसेल.. 😋 म्हणून कडिपत्ता बारीक कापायचा आणि त्यात टाकायचा. अशी कारस्थानं नै काय काय करावं लागतं बब्बा.. 
आधी काय तूप मग मिरची मग कडिपत्ता.. मग त्यावर एक दोन बारीक बारीक उभी कापलेली लेहसून..अहाहा..लेहसून जळू द्यायची नाही पण सफेदही राहता कामा नये. हे सर्व चालू असताना पुरूष लोक्स एका हातात तंबाकू घेऊन दुसर्या हाताच्या एका बोटाने ती जशी चोळतात..😁😂 सेम तीच अॅक्शन करत जिरं चोळायचं आणि लसूण होत आली की त्यावर छन्नकन टाकून द्यायचं.
जिरं चोळलं की त्याचा मस्त वास हाताला लागतो.. तो पदार्थाला लागतो की नाही त्याशी काय घेणं देणं आहे? तो वास नाकाने असा आतपर्यंत ओढून घ्यायचा. आतपर्यंत म्हणजे नक्की कुठपर्यंत.. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हम पुढे.. प्रोसेस महत्वाची आहे. आपल्या हातची चव काय अशी उगाच येत असते का. प्रत्येकीचं स्वयंपाक घरातलं आपलं आपलं सीक्रेट असतं. सगळ्याच अश्या माझ्यासारख्या सांगत नैत काही. 😍😍
तूप मिरची कडिपत्ता लसूण आलं झालं. आता त्यात भाजलेले दाणे थोडेसे अगदी कमी हं.. शोभेला घालायचे. अगदी काजूबिजू माज नको.. पण काजू बाजू करून जरा जरा दाणे, थोडे काळे तीळ असतील तर ते टॉस करायचे.. बास बास आता जास्त काही नको नाहीतर शिजलेल्या बटाट्याची पांढरी भाजी होईल. आता त्यात दोन चमचे काठोकाठ प्रेमानं भरलेलं अमूल बटर सोडायचं... ते तापू लागलं की खूप धूर धूप होऊ लागतो. मज्जा येते. स्वयंपाकघरात घमघमाट येऊ लागतो आणि सार्या जगावर आपलंच राज्य आहे, असं काहीतरी भ्रमिष्टासारखं वाटू लागतं. आता बटाटे टाकायचे. 😂
हे सारे फोर्कने अलटपलट करायचं म्हणजे बटाटे चिघळून ते उचटणं कालथा ह्यांच्या धक्क्याविना अभंग एकशेपी राहतात. थोडे जास्त किडे असतील तर बढाईखोर राणी बडीशेप व छप्पन टिकली काळी मिरीची बारीक पूड भुरभरायची. ह्याची पूड करून घालण्याचं कारण म्हणजे आपण आत काय काय घातलंय हे सारं खाणार्याला कळता कामा नये. तसंही घरातल्या पुरषांना आपण त्यात काय काय चाणाक्षपणे घातलेलं आहे हे ओळखण्यात विशेष रस असतोच असं नाही. डोळे बंद करून पदार्थातल्या इनग्रेडियंट्सची ओळख चवीचवीने सांगणारे ते पुरूषच वेगळे. 😛😛
चला आता बटाट्यांना तूप व बटर छानच लागलेले आहे. बटाटे वितळून अजून शिजून पातळ गिळगिळीत होता कामा नयेत नाहीतर डिशचा मामा होईल. आता शांतपणे मन स्थिर ठेऊन छोट्या किसणीने आकाशातून जसा बर्फ पडतो तसं चिझ किसावं. किस केल्याने पीस भेटतो हे तर आपण सारे जाणताच.
😘😂😛
टाट्यांना फारच लांबचं दिसतं म्हणून त्यांना डोळे येतात.
किस सॉरी चिझ टाकले की बाजूला कोथिंबीर बारीक कापून तयारच ठेवायची. फोटोत ती बारीक कापलेली दिसत नसेल म्हणून काय झालं ? अश्या सारख्या सारख्या चुका काढायच्या नाहीत. चिझ आणि कोथिंबीर टाकली की गॅस फाटकन बंद करून वरून काचेचे झाकण कढईला मारायचे. काचेचे झाकण मारले की आतलं चिझ वितळताना याची देही याची डोळा दिसू लागतं. असे केल्याने तोंडालाच काय डोळ्यालाही पाणी सुटू लागते.
मग जास्त टाईमपास न करता हे सारे प्लेटमधे टाकायचे आणि एकाच प्लेटमधे दोनतीन जणांनी एकसाथ एका बैठकीत बसून खायचे. लै भांडणं होतात. फोर्कची मारामारी होते. मी खाणार मी खाणार असे आवाज ऐकायला येतात. बटर बोटॅटो की जै. खादाड्याचा आत्मा अमर रहे. त्याचे शौक चिरंतन राहो. जय हो. जय हो.
बटाट्याकडे पाहूनच तर ही गझल कवीस सुचली नसेल ना.. तू नही तो जिंदगी मे और क्या रेह जायेगा... दूर तक तनहाईंयो का सिलसिला रेह जायेगा.. 💖💝 बटाट्या लब्यू रे. 😛




Comments