अंबिके..



लिहण्यासाठी टेबल, वरती पुस्तकाची आटोपशीर कपाटं, त्याला काचेचे दरवाजे असं सारं एका भिंतीपाशी करून घ्यावं म्हणून सुतारकाकाला बोलावलं. पुस्तकाच्या कपाटात आतून मार्बल लावतो म्हणे. पुरा प्लायमधी केलात तर खर्च अजून वाढेल. मी बरं म्हणाले. डेस्क लाकडात करायचं आहे. ते प्लायमधेच करू अगदी रीसायकल्ड वूड, स्लीपर वूड जरी घेतलं तरी खर्च फार वाढेल म्हणे. मी बरं म्हणाले. तर ८५ हजार सांगितलेन. माझ्याकडे इतक्या किमतीची पुस्तकही नाहीत. मग ती ठेवायला इतका खर्च... किंमत ऐकून पोटात गोळा आला. नवरा म्हणाला अगं जागा राहते पुढे येणार्या पुस्तकांना.. मग तो गोळा आकाराने वाढला.
इतके पैसे असतील तर अजून त्यात भर घालून पुण्यासारख्या ठिकाणी यावं एक मोकळा वन रूम किचनचा फ्लॅट भाड्याने घ्यावा लांब कुठेतरी स्वस्तात. तिथे एक टेबल, एक सिंगल बेड, एक हॉट प्लेट, चहा साखरेचे डबे आणि अगदी दोन चार भांडी ठेवावीत, बाकी खाण्याचा डबा लावावा आणि घरात बाकी काही सामान अजिबात न घेता एक कपड्याची सुटकेस तिथे आणून टाकावी हे जास्त भारी वाटतं. घरात साला इतका खर्च करून तरी तो कोपरा, निवांतपणा मिळतो का..
घरात आरामाच्या सगळ्या गोष्टी असतात मग तितक्याच आवरण्याच्याही गोष्टी. मग कंटाळा येतो लोळावसं वाटतं. हे काही खरं नव्हे. काही सलग काम करण्यासाठी साधारण वर्षभर तरी सगळ्यांपासून तुटून आयसोलेशनमधे राहणं, दोन दोन दिवस आंघोळ न करता, कधी काहीच न लिहता नुसतं दोन दिवस तसच बसून रहाणं, ह्या त्या गल्ल्यांमधून निरूद्देश चालत राहणं. अश्या ठिकाणी असणं जिथे इंटरनेटचा किडा उत्सूकतेची खोलून पोखरणार नाही. नसतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे अश्या ठिकाणी गेल्याशिवाय पर्याय नाही. का केलं मी लग्नं, का जमवली माणसं, का घेतलं घर, का हे सारं मला आधीच सुचलं नाही.. असा वैताग येतो कधीकधी. अनेकदा बायको, आई, चांगली मैत्रीण, चांगली मुलगी होण्याचा कंटाळा येतो. माझ्या नवर्याबाबतही मला हे सारं वाटतं. चांगला मुलगा, उत्तम नवरा, प्रेमळ बाप होण्यात त्याचा किती वेळ जातोय असं मला नेहमी वाटतं. तो सतत फोटोग्राफी करत बसला तर काय अमेझिंग वाटेल त्याला.. त्याने काही मस्त काम केलं की तेव्हा मात्र एरव्ही अबोल असणारा तो किती भरभरून बोलत असतो. त्याचा सारा आनंद कामानं मिळाणारी झिंग त्याच्या डोळ्यात दिसते तेव्हा वाटतं उगाच लग्न केलं मी ह्याच्याशी. माझ्यामुळे तो नको नको ते सारं करत बसला. माझ्या वडिलांचं, काका काकूंचं आजारपण ह्यात त्याने जी काही साथ दिली त्यांचं जे काही इतकी वर्षं ममत्वाने केलं ते एक नवरा म्हणून फार ग्रेट आहे पण त्याच्यातल्या कलाकाराला मी हे सारं करायला लावलं. ह्यात ढकललं ह्याचा फार गिल्ट येतो मला. असा किती वेळ व उत्साह असतो आयुष्यात आपल्याला. कामाबातचा उत्साह उकळत तापलेला असताना खरच लग्नं, पोरं काढणं हे करायलाच नकोच. कलाकाराने प्रेम प्रकरणं करत बसावीत लग्नं करू नये. हे सगळं खूप छान आहे तरीही. नको ती सारी झेंगट मागे लागतात. 
घरात काही सुशोभिकरणासाठी खर्च करायचा म्हणजे माझ्या अंगावर भितीने काटाच येतो. घर आपण ओतू तेवढा पैसा खातं. घर आपण आपल्यासाठी बनवत नाही. ते आल्यागेल्यांनाही छान वाटेल असाही विचार बॅक ऑफ द माईंड असतोच. मग एखादा छानसा वॉलपेपर लाव, वुडन फ्लॉअरिंग, रंगीत झुळझुळीत पडदे, स्वच्छता ह्याचा आग्रह होतो स्वत:कडूनच. कश्याला हवंय हे सगळं? ते क्लासी दिसावं वाटतं. त्यात फालतू पैसे खर्च होतात. काय गरजे ? एकटं राहिलं की हे सारं गळून पडतं आपोआप. मग अमक्याने अमकं काम करायचं तमक्याने तमकं अश्या जबाबदार्या वाटून घेतल्या जातात. सारं यांत्रिक बुरबुरीत व्हायला लागतं.
एकटं राहणं आणि बाहेर डू नॉट डीस्टर्बची पाटी लावणं हे स्वप्नं झालय आता. तसंही इथे मरायला कोण येतय... पण घर म्हंटलं की घरातले सारे व्याप, घोळ, कागदपत्रं, बिलं मागे लागतात. घर कधीही मिनिमलिस्टिक होऊ शकत नाही. घर मोठं असेल आणि त्यात एक वेगळी खोली कामासाठी फक्त मिळणार असेल तर शक्य आहे. तिथे बाकीच्या माणसांचा राबता असता कामा नये. पण आम्ही लिहणार तिथे धाकले मालक शिनचॅन, मि. बिन बघायला येणार मोठे मालक.. त्यांच वेगळच असतं. तो मला काही डीस्टर्ब करीत नाही. पण तो वेगळ्या खोलीत शांतपणे बसून त्याचं त्याचं काही मोबाईलवर बघतो आहे ह्याचाही मला त्रास होतो. मला कळलय.. मला काही काम करायचं असेल तर मला आसपास लांबलांबपर्यंत कुणीकुणीही नकोय. ही माझी गरज आहे. ह्य, हे असं असतं का आहे त्यात काम करता आलं पाहिजे जमवता आलं पाहिजे, शिस्त पाहिजे, सांगाल. पण प्रत्येकाचं वेगळं असतं ना.. हे का मान्य नाही ?
लिहायला एक नॉनग्लॅमरस, साधं, हवेशीर, थोडं कमी प्रकाश असलेलं, कोझी लहान रूम हवी. जिथे एकही पुस्तक नसेल डोक्यावर छत्रछायेला, एकही फोटोफ्रेम एकही झुंबरशुंबर नसेल. एक टेबल एक खुर्ची, सिगरेटची काही पाकिटं, पेनं, लॅपटॉप, कंटाळा आणि उत्साह एकसाथ इतकं पुरेल. फळं आणून ठेवायची भरपूर, पाण्यासाठी एक थंडगार माठ. बास. लिहावं कागदाचे बोळे फेकावेत.. ते कुणीही उचलू नयेत कुणीही असं कायकाय वाटतं. ही अशी स्वप्नं किती साधी आहेत नं. पण घरात अडकलो की ह्यातली अर्धी स्वप्नं महाग होतात. घरात राहून लिहणार्या शिस्तीने काम करणार्या आणि सारं घर जिथल्या तिथे निटनेटकं ठेवणार्यांच मला कौतुक आहे पण मी फारच विस्कटलेली आहे. मला काहीच आवरायचं नाहीये. मला काहीच सजवायचं नाहीये. पण आवरावं लागेल कारण मी एक बाई आहे. हे दु:ख नाही हं.. झक मारत आवरावं लागेल असं सांगतेय. कारण घरात मी एकटी नाही बाकीचीही माणसं राहतात नं.. एकटं राहिल्यानेच काही सुचणार आहे आणि घसघशीत काम होणार आहे असंही काही महत्वाचं नाहीये. तो.. ते तसले आग्रहच नसणं हेच महत्वाचं आहे. काही होणार की नाही, अश्या जाबविचारूक प्रश्नांनी वाट लागते. झालं तर झालं नाही तरी ठीक आहे. पण स्वातंत्र्य असावं. 
जेव्हा डोक्यावर घर नव्हतं आणि भाड्याच्या घरात होते तेव्हा स्वत:च्या घराचे डोहाळे लागले होते. ते झाल्यावर आता तिथून पळण्याचे डोहाळे लागतात. विचित्र आहे सगळं. अंबिके तूच बघ बाय आता. संचारू देत आता.

Comments

  1. पटलं गाड्या मनाला।

    ReplyDelete
  2. Khup mast... Tagmag pan janvate Ani nemka Kay havay Kay nakoy ha gondhal hi mast mandlay, kharach vat ta sagla sodun dyava at least ekhada week Ani mag parat recharge houn yava...

    ReplyDelete
  3. कुटूंबाचे आणि एकटे राहण्याचे फायदे तोटे आहेत.का जगायच?या प्रश्नाचे नेमके उत्तर म्हणजे स्वतः आनंद मिळवणे व इतरांना आनंद देणे.कस जगायच?याचे उत्तर म्हणजे समाजमान्य,बहुसंख्य जसे जगतात तसे.कारण अधिकाधीक लोक ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जावे.व लोक याच मार्गाने का गेले असावेत त्याचा अभ्यास करावा.घरात पसारा कमी असावा.लोळणे, चालत राहणे या चांगल्या सवयी आहेत.एकट असण्याचाही कंटाळा असतो.कुटूंबातील नाती जगण्याला कारण असतात.

    ReplyDelete

Post a Comment