आयुष्य हरामी आहे

आपलं माणूस कायमचं अंतरल्यावर
जाणीव होते की ते किती आपलं होतं त्याची
त्या माणसासाठी काय काय करायचं ठरवलं होतं ते..
आणि अरे.. हे पण करायला हवं होतं नै आपण,
असं सगळं जे द्यायचं राहून गेलं ते.. ते
सर्व अवजड होऊन तापत राहतं डोक्यात
निराशेने डोळ्यातून वाहायला लागते एक छोटीशी नदी
ही नदी रूमाल शोधत राहते लुप्त होण्यासाठी
गेलेल्या माणसानं आपल्या मनावर शेकडो चित्र रंगवली होती
डोळे डबडबले की ती नवनवीन चित्र स्पष्टच दिसत राहतात
भिजलेला रूमाल विसरलेपणाच्या धुळीला
वायपरसारखा घासून घासून साफ करतो आणि
घट्ट दाबून बंद केलेल्या डोळ्यांआड आठवणींचे दिवेच पेटतात लख्ख
डोळे डबडबतात
त्या रूमालाच्या नाजूक रंध्रांत झिरपलेली
मघाची अख्खी नदी पूरच घेऊन येते बुडवायला
सगळी चित्र भिजून जातात रंग पसरतो चेहर्यावर.. 

तुझ्या आठवणींचा रंग कसा दिसतो
ते पहायला तरी तू हवा होतास
पण तू थांबला नाहीस
त्यात तुझा दोष नाही कारण मुळात हे
आयुष्यच हरामी आहे

कुणाहीसाठी काय करावं वाटतं ह्याची
TO DO LIST तयार हवी कारण..
आयुष्य हरामी आहे
ते दगाबाज आहे
मला आईला गजरा आणायचा आहे
९० वर्षांच्या बाबांसोबत पिक्चरला जायचं आहे
साडेपाच फूट उंच मुलाला किंवा मुलीला
पुन्हा कुशीत घेऊन एकदा झोपायचं आहे
तिला फुगे आणून द्यायचे आहेत
एकट्यानेच प्रवास करायचा आहे
बायकोला एकदा तरी तोंडाने I LOVE YOU म्हणायचय
मनात आलं की करून टाकावं ताबडतोड कारण
आयुष्य हरामी आहे

आपल्याला जे हवं ते करावं 
पण दुसरा आपल्यासाठी 
काही करेल अशी अपेक्षा नको
कारण अपेक्षा रूजल्या की खातात माती
जोमाने वाढतं दु:ख आणि फोफावत राहते हळहळ कारण
आयुष्य हरामी आहे

Comments

Post a Comment