भुर्जीपाव - एक फालतू कविता

माणसं परस्परांना
इंटरेस्टिंग वाटू लागतात
मग त्यांन्ला लगेच तात्काळ भेटायचं असतं
लगेच सांगून टाकायचा असतो भूतकाळ
भविष्यातले प्लॅन्स, वर्तमानातलं रितेपण
शरीर नागडं झालं ना
तरी औत्सूक्य संपत नसतं
पण मनाचे कपडे धडाधड उतरवायचे नसतात
घाई घाई घाई उघडंनागडं होण्याची
'' I am like an open book '' वगैरे येडझवेगिरी
टाळ्या वाजवू का मग?
कश्याला ना कश्याला व्हायचंय गं
तुला गोष्टीच्या पुस्तकासारखं ?
कुणी शाईसारखा बदाबदा गळत असेल
तर का व्हायचंय तुला टीश्यूपेपरसारखं ?
इतकी तणनशक्ती शोषण्याची क्षमता
इतकं ट्रान्सपरन्ट क्रीस्टल क्लीयर होण्याची
काय गरज काय ?
कुणी सत्कार करणारे का शिवाजी पार्कात तुझा त्यासाठी...
ह्याने काय होतं..
पदार्थात मीठ जास्त पडतं
इतकं की लिंबू पिळून किंवा मारूनही
खारटपणा वरवर येतच राहतो
फेकून द्यावा लागतो नात्याचा भुर्जीपाव
कचरापेटीमध्ये.

Comments

Post a Comment