शून्य

निरांजनाची ज्योत तेवत असते
देवाला प्रकाश मिळावा असा
काही उदात्त हेतू नसतो त्यामागे
झाड उभं असतं
सळसळत्या पानांत धुंद आत्ममग्न
वाटसरूला छाया देण्याचा
काही कृपाळू हेतू नसतो त्याच्या बहरण्यामागे
शुष्क कोरड्या भेगाळ भगराळ जमिनीची
तहान भागावी म्हणून आकाश काळं होतं
हे ढगांना माहीत नसतं भरून येताना
अगदी तसच आपली स्पेस उपभोगत किंवा
तन्मयतेने बोअरडमच्या चिखलाला काठीने ढवळत
गुंतून गेलेला असतो एखादा मनुष्य
त्याच्या मोनोक्रोमॅटिक मोनॉटॉनस
शून्य परिघात केंद्रबिंदु जैसा

तो भिंतीकडे, पंख्याकडे, जमिनीवर चालणार्या झुरळाकडे
डोळे लाऊन बसलेला असतो
तो व्हिटनेस करत असतो
त्याच्या परिघाआत धिम्यागतीने होणार्या
स्वत:च्याच विखरून पडलेल्या तुकड्यांच्या
बिनाआरश्याच्या कलायडोस्कोपिक हालचाली.
तो काही विचार करतोय का
तो निराश आहे का
तो तुमच्यापासून तुटलेला आहे का
तो स्वार्थी झालेला आहे का
तो तुमच्याकडे लक्ष देत नाहीये का
तो तुमच्यापासून अंतरलेला आहे का
असं तुमच्याशी संबंधित त्या शून्यात काहीयेक नसतं.
तुम्ही त्या माणसाबाबत करत असलेल्या ह्या विचारांचा
त्याच्याशी शून्य संबंध असतो.
का देताय अकारण त्याच्या डोक्याला शॉट ?
Don't screw up his chill.

Comments