मित्र

एक मित्र असावा
बर्यापैकी अपरिचित
त्याच्याविषयी काहीही वा सर्व वा आतबाहेरून
जाणून घेण्याचा अट्टहास नसावा. नकोच.
केला तर हाकलून द्यावं त्याने अंमळ
मी ताळ्यावर येईपर्यंत.
त्यालाही हाकलून देता यावं
लांब जाऊन पुन्हा विटांनी बांधून भिंत
उभं रहावं भक्कम त्याने
तो एका भिंतीसारखा
रॉक सॉलिड खडकासारखा असावा
ज्याच्या हातांच्या लांबरूंद
काटकोनाच्या कोपर्यात
शांतपणे जाऊन बसता येईल
उगवता येईल चूपचाप रोपासारखं
तो फक्त निमूट पाहील आपलं वाढणं
आणि पावसाने तुडवल्यावर आपलं मरणही
तो वाढवणार नाही न वाचवणार
तो फक्त एक व्हिटनेस असेल
आपल्या एक्झिस्टन्सचा.

Comments

Post a Comment