प्लीज

सतत आकांत करू नये
सतत रागवू नये छंद म्हणून
सतत ब्रेक अप करण्याच्या धमक्या देऊ नये
सतत केसाने गळा चिरत राहू नये
सतत सतत सतत
फैलावर घेऊ नये आडवंतिडवं
शब्दांच ब्लेड फिरवून सतत कापून
शिरांमधून रक्त काढू नये हळूहळू
सतत प्रश्नं विचारून चोक करून
आपला चॉको घ्यायला लागेल समोरच्याला
इतकं अगतिक करू नये कुणासही प्रेमाखातर
सतत हे खरं की खोटं करू नये
सतत अश्रू पुसू नयेत
सतत सांत्वन सतत विचारपूस
सतत फिरवणं डोक्यावरून मणक्यावरून
चेहर्यावरून छातीवरून हात धिराचा, प्रश्नांचा..
सतत सुश्रुषा सतत झडती सतत सतत
डोकं कवटी हात पाय
खांदे पाठ स्तन लिंग कुले
मांड्या ढोपरं नी कोपरं दाबून चेपून देऊ नयेत सतत
सतत काळजीने तीळतीळ तुटणारं हार्ट नकोय भेंच्योत
सतत पझेसिव्ह होण्याने नात्याच्या पाचरीतून
धडाधुम्म होत बाहेर पडणारा असह्य कुजबट
भावनांचा जळजळीत उष्ण तीव्र भयावह फार्ट नकोय
सतत नकोय कुणाचंही जजमेंटल होणं
सतत घालावी लागू नये समजूत
जर असेल एक कणभर प्रेम तर..
मग असायला हवा थोडा आंधळा विश्वास
मग असायला हवी मिठापुरती सहनशीलता
मग असायला हवी गृहीत धरू देण्याची सवलत
मग असायला हवी खोटं बोलण्याची मुभा
मग असायला हवी नात्याला संयमाची धार
ज्याने हळूहळू संबंध होतात व्यापक
नाहीतर
एका क्षणात क्लिक झालोय अय्या
एका क्षणात जिवश्च कंठश्च झालो अय्या कसं नं हे..
हे भेटलो आणि हे पहा कसे कसे झालोय
आम्ही परस्परांच्या सहवासात मंत्रमुग्ध
सेल्फी पोस्ट सेफ्ली पोस्ट
सतत नकोय ना
नात्याच्या चढत्या उतरत्या ग्राफचं डॉक्युमेंटेशन
सहवासाच्या चेंगट चांदणरातींची दहशत
साला मां की किरकीरी..!
असं नाहीये आपल्यात काही
आणि तू कितीही आदळापट केलीस तरीही
मी असं होऊ देणार नाही
कारण मी आपल्या नात्याकडे
खूप वेगळ्या दृष्टीने पाहतो
जसं सगळ्यांच्यात असतं तसं नाहीये आपल्यात
कारण मी मानतो की सगळी नाती नसतात एकरेषीय
ही फॅंटसी असेल तरीही तरंगू दे त्यात मला
जे जसं आहे ते छान आहे ह्याचा मी केलेला हा सूक्ष्म विचार
त्याला मरू देऊ नकोस
प्लीज.

Comments