प प्रॉन्सचा


नवरे खूप मदत करतात, ते खूप चांगले असतात. पण फरसाण आण हं येताना नक्की अशी मार्दवपूर्ण आठवण फोन करून केली की एकसाथ १० ते बारा प्रकारचे पाव पाव किलोचे फरसाण एकदम आणायची काही गरज ? त्यातला एखादा फरसाण घरातल्या सगळ्यांनाच इतका आवडतो की सगळ्यांनी त्यातली एक एक मूठ बकाणे भरले की तो संपतो. आहे का अजून.. नाही नाही तो पाव किलोच होता नं.. आता दुसरा खा. असं सांगितलं की ही खरेदी करणार्याच्या चेहर्यावर जरा जरा पश्चात्ताप दिसतो. हा चांगला होता नं फरसाण.. हाच जास्त आणायला हवा होता नं.. तो म्हणतो. संपलाय की नई तो आता. आता तू व्हरायटी म्हणून आणलेला डाएट चिवडा खा हं, मी चिडवते.
मागे एकदा आमचे हे भाऊच्या धक्क्यावर मित्रासोबत गेले होते. बायकोला प्रॉन्स आवडतात म्हणून त्यांनी तिथून काही एक किलो प्रॉन्स आणले. घरी आल्यावर ती सारी दौलत दाखवताना मोठ्या प्रेमाने आपण जणू हिला धा हजाराची पैठणीच आणली आहे असा आनंद त्यांच्या चेहर्यावर होता. तो एक फार चांगला कलाकार आहे. फोटोग्राफी तर आहेच पण घरात अभिनयही छान करतो. फार जेन्यूईनली आणतो काही आणताना मनापासून आणतो. पण प्रमाण.. चिकार प्रेम. तुला प्रॉन्स आवडतात नं मग घे.. प्रॉन्स पुलाव, प्रॉन्स कोलिवाडा, प्रॉन्स फ्राय, बटर प्रॉन्स, कोलंबिचं तिखलं, कोलबीचं लोणचं.. कर आणि मनसोक्त खा. असा तो दिलदार आहे. मग हिरमोड व्हायला नको म्हणून मीही ह्या ह्या ह्या केलं... अय्या प्रॉSSSSSन्स इतSSSSSके..... खूप होते राव. त्यांची सालटी काढा त्यांच्या पाठिवरचे धागे हिरवी हिरवी घाण काढा.. किती व्याप असतो.. त्यात मदत करायला मस्तीला हे येणार का.. नाही. अहो खरेदी करून घरी बॅगा तर कुणीही आणून टाकील. पण पुढे पुदिना निवडत बसायला, कोथिंबिर खुडत बसायला आणि हे असे धाकले प्रॉन्स साफ करत बसायलाही पाहिजे नव्हं का..मला कोळणींनी साफ केलेले मासे आवडत नाहीत. ते साफ करणं कापणं हे सारं मीच करते. मला मासे साफ करायला आवडतात. ते अगदी बारकाईने साफ केले की घरच्यांनाा कधी बाधत नाहीत. मनासारखे कापतातही येतात. हलव्याचे खवले सुरीने टवके उडवून साफ करताना जाम कचरा होतो पण त्यात खपल्या काढल्याचा एक विचित्र आनंद मिळतो. माश्यांचे बलबलीत डोळे अलगद सोडवून ते मुठीत धरून मी ते कबीरला सरप्राईज म्हणूनही देते.
एकदा कबीरला सांगितलं डोळे बंद कर सरप्राईज आहे. बिचार्याला वाटलं आही खडीसाखर देईल, चॉकलेट देईल, गूळाचा खडा देईल. डोळे मिटले गं बाई माझ्या लेक्राने गच्च गच्च. मग त्याने अलगद त्याचे हाताचे पंजे उघडले. तर त्याच्या हातावर मी पापलेटचे चार डोळे ठेवले आणि म्हणाले आता उघड डोळे. डोळे उघडल्यावर त्याने त्या गोल गोल बटणासारख्या दिसणार्या वस्तूकडे पाहिलं. हे काय आहे आही... हे पापलेटचे डोळे आहेत, असं सांगून मी खदाखदा हसायला लागले. तर तो इतका घाबरला की ते तिथेच टाकून बोंबलत पळून गेला. मला असं घाबरवायला खूप आवडतं. मासे बाजारातून साफ न करता घरी आणले की असे विविध प्रकार करता येतात. माश्यांची घाण नीट जमा करून पॅक करून कबीरकडे देते. मग तो खाली जाऊन बसतो मांजरं हुडकत. त्यांना ती घाण मचामचा खाताना बघून त्याला कोण आनंद होतो. प्रॉन्स व्यवस्थित साफ केलेले असतील तर काय बिशाद आहे ते बाधण्याची ! साफ करून मासे फ्रीजरमधे वाटे करून डबाबंद करून ठेवले की त्यांची नष्ट घाणही येत नाही. मासे चिकन मटण सारं साफ करून फ्राजर भरला की आठवडाभर डोक्याला ताप नसतो आणि विविध प्रकार करण्याचा उत्साह टिकून राहतो. बरं ते ठीक आहे.. मी प्रॉन्स पुलाव अप्रतिम सुंदर बनवते. खतरा लागतो. खतरा. रेसिपी देईन कधीतरी. माझ्या रेसिपी साध्या असतात. झटपट काम फटाफट. जेवण गट्टाम. बात खतम.

Comments