मी एक शॉपलिफ्टर

It is important to attend and accept our dark sides that keep our pores open to absorb more light. Feeling guilty is not enough. There must be a confession..
हजारो कोटी रूपयांचा गफला बिंधास्त करतात माणसं. ह्या सगळ्याची सुरूवात कुठून होत असेल? लहानपणी..? काही जणं मोठेपणी नव्या दमाने ह्यात थेट निमोसारखे तीर मारत असतील का.. कुठून होते चोरीची सुरूवात नक्की. कसा वाढतो हौसला?
आम्हांला कोटी सोडा लाख सोडा हजार सोडा आजवर घरात फक्त ११ रूपये किंवा फार्फार तर ११० रूपये इकडचे तिकडे करणे जमले. पण होय मी ते फार सफाईनं केलय. कुणाच्याही ते कधी लक्षात आलं नाही. शाळेत असताना हिरोची शाई पेनं घेण्यासाठी काकांच्या खिशातून ५ - ५ करत - जमवत २५ रूपये दरमहा चोरायचे. मग त्यातून नवीन पेन घ्यायचं विकत. पेनं बक्कळ होती. तोटा नव्हता. मग ही चोरी.. चसका लागला होता.
शनिवारी रविवारी बाबांकडे जायचे रहायला. त्यांनाही घेऊन जायचे दुकानात पेन घ्यायला. आधीची पेनं बिघडलीत का, असं बाबांनी कधी विचारलं नाही. कारण फार महाग गेम्स, बाहुल्या, खेळणी, फ्रॉक्स, शूज, स्पोर्ट्स गिअर हे कधी मी मागितलं नाही. असं काही असतं हे माहीत कुठे होतं ? मग पेनच तर मागतीये नं.. देत. त्याने मी स्पॉईल होईन असं काही त्यांना वाटलं नसेल. माझं हस्ताक्षर सुरेख होतं.. मला शाईचा वास फार आवडायचा. माझा लिखाणाचा स्पीड चांगला होता. मग लेखणीच माझं खेळणं बनल्यासारखं झालं होतं.
पण ते असं आहे का भौ भले सुंदर पादलात तरीही त्याचा सुगंध की दुर्गंध लपून रहात नाही तो नाहीच. तो लपवता येत नाही. अचानक सुगावा लागला ह्या चोरीचा घरी. चांगल्या स्थितीत असलेल्या हिरो शाई पेनांची संख्या ५० ६० का, असा प्रश्न विचारण्यात आला. पाच सहा पेनं असू शकतात ती साठ सत्तर असण्याचं कारण काय? ती सारी पेनं एका जाळीच्या पिशवीत भरून टॉईलेटच्या फ्लश टॅंकमधे मी ठेवलेली होती. तो एक दिवस काम करेनासा झाल्यावर बोलावलेल्या प्लंबर काकांनी हे सारे तुंबलेले त्यातून बाहेर काढले. नवीन ओली ओली पेन.. वा !
जवाब दो, असं विचारल्यावर कबुलीही दिली लगेच. मग काका खो खो हसायला लागले. काकू रागे भरली. काय हे मयुरा.. अगं इतकी पेनं काय करायची ती इतकच म्हणाली. तीन चार वर्षांत मी चिकार पेनं जमवली. ती नंतर कुठे गेली कळलीही नाहीत. मला शाई पेनांचा शौकच होता. त्यातल्या निबच्या मध्ये ब्लेड घुसवून त्याचे टोक फाकवायचे. त्याने जास्त कमी येणारी शाई कंट्रोल करता येते आणि अक्षर जाड पातळ बनवता येते. दोन तीन रंगांच्या शाया एकत्र करून वापरणे, कॅमलिनमधे पार्करची जांभळी निळी जादा घट्ट शाई मिसळून वापरणे, शाईचा बर्फ होतो का ते करून पाहणे. एकेक वाक्य वेगवेगळ्या रंगाच्या शाईने लिहून मोठे पत्र लिहणे असे अनेक बिनकामाचे अमोघ आनंद देणारे खेळ केले..
माझ्या पैसे चोरीबद्दल शांतपणे ऐकून घेतल्यावर काका मला थेट नॉव्हेल्टीमधे घेऊन गेले आणि मग तिथे आधीच माझ्याकडे असलेली हिरोची मरून, ऑलिव्ह ग्रीन आणि काळ्या रंगांची हिरो पेनं पुन्हा घेऊन दिलीनी. मी उड्ड्या मारत मारत दुकानाबाहेर पडले. त्यानंतर पुन्हा कधी काकांच्या खिशाला हात लावला नाही. जे हवं ते थेट मागितलं त्यांनी थेट दिलं. मला ज्याच्याशी लग्न करायचं होतं त्याच्याबद्दलही मी थेट सांगितलं ते थेट हो म्हणाले. काका रोखठोक होते आहेत. मीही त्यांचेसोबत राहून तशीच बनले.
मी एक शॉपलिफ्टर
अहमदनगरला आजोळी जायचे तेव्हा मी आणि माझी बहीण अंजली गंजबाजारात फिरायला जात असू. तिला नं साधी एक सेफ्टी पिन जरी घ्यायची असली तरी आम्ही दोघी टकाटक तयार होत असू आणि मार्केटला जात्सू. मुंबईबाहेरच जग अधिकच छोटं आहे. तिथे आपल्याला येता जाता तिथल्ले दुकानदार, खरेदीला येणारी गिर्हाईकं, नाक्यावर बसणारे हिरो सारे सारे हळूहळू ओळखायला लागतात. मी अंजली वैकरची मुंबईची बहीण हेही तिथल्या अर्ध्या गंज बाजारालाच नव्हे तर पार दुर्गासिंग लस्सीवाल्यालाही माहीत झाल्यासारखं होतं. 
भर दुपारचं कडाक्याचं मे महिन्यातलं ऊन तेजतर्रार तरूण कातडीला जराही भाजायचं नाही. तिथे महावीर म्हणून दुकान आहे. तिथे इमिटेशन ज्वेलरी मिळते. म्हणजे तेव्हा धा वीस पन्नास रूपयांपर्यांत कानातले मिळायचे. माझा स्टॉक मुंबईचाच असायचा. शिवाय मी फार ज्वेलरी घालायचे नाही. तेव्हाही माझ्याकडे मोठे लोंबकळणारे कानातले असायचे. तेव्हा चांदीच्या मोठ्या कानातल्यांचं माझ्याकडे मस्त कलेक्शन होतं. ते सारे कानातले एका लाकडी नक्षीदार बॉक्समध्ये ठेवलेले होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी तो बॉक्स कुठेतरी हरवला.
अंजू मला घेऊन जायची. सेफ्टीपिना अगदी घराच्या गल्लीतून बाहेर पडल्या पडल्याही कुठेही मिळाल्या असत्या. पण नाही आम्हांला बाजार पालथा घालायची हौस होती. महावीरच्या दुकानात आम्ही गेलो की दुकानदार एका ट्रेमधे ढीगाने कानातले घालून ठेवायचा आणि दुसर्या कस्टमर्सकडे वळायचा. त्याकाळी सी सी टीव्ही कॅमेरा इ. नसे.
माझं ज्याच्यावर तुडुंब प्रेम आहे त्यांना खूष करायची माझी फार चांगली आणि तितकीच ले डूबनेवाली घाणेरडी वाईट खोड पहिल्यापासून मला आहे. त्यामुळे आता माणसाला शक्यतो फार जवळ येऊ देत नाही मी. फार वेळ घेते त्याला. कारण ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा ती माणसं फटक्यात जजमेंटल होत आपल्याला निघृणपणे कापून तोडून पाश मोकळे करून घेतात ह्याचा प्रत्यय मला वारंवार आला आहे. पण मन भिकारचोट असतं. त्याला चांगल्या सवयी अंगी बाणवल्या जात आहेत हे कळत आणि ते बंड करून पुन्हा पुन्हा कुणा न कुणावर न्योछावर होण्यासाठी मातीत मिळायला पावसासारखं धावत सुटतं. तर तेव्हा मी माझ्या ह्या बहिणीवर असंच जिवापाड प्रेमाची बरसात करत असे. वयही सतरा अठरा होतं माझं त्यामुळे प्रेम आंधळं होतं. अजूनही मी आंधळी आहेच.
महावीरमधे अचानक माझ्या डोक्यात एक किडा घुसला. आपण अंजलीला खूष केलं पाहिजे, असं काहीसं माझ्या डोक्यात घुसलं आणि मी माझ्या कुरत्याच्या खिशात त्या ट्रेमधे नवे कोरे दोन कानातले टाकले. मी हे ठरवून केलं नाही. Something pushed me towards it. तिला हवं होतं ते एक कानातलं तिने विकत घेतलं ते घेतलं. घरी आल्यावर मी तिला ते दोन कानातले गिफ्ट केले त्यासरशी तिच्या चेहर्यावर भला मोठा आनंद हिंदकळायला लागला. कुठून आले हे कानातले? तिने विचारलं. मी उचलले.
त्या उचलण्याला आता शॉपलिफ्टिंग असं म्हणतात. येस मी तेव्हा शॉपलिफ्टर झाले होते. मी नक्की काय केलं होतं आणि ते किती बेक्कार होतं ह्याची कल्पनाही मला नव्हती. त्या चोरीत दुकानदाराचं ७५ रूपयांचं नुकसान झालं होतं. पालकांनी दिलेल्या उत्तम संस्कारांची क्षती होते आहे हे गावी गेल्यावर माझ्या गावीही राहिलं नाही. मी चोरी करावी गरज आहे म्हणून अशी माझी स्थिती कधीही नव्हती. मग मी असं का केलं.. थ्रील. थ्रील म्हणून केलं. मी किती सफाईदारपणे हे करू शकते ह्याचा माझ्या बहिणीला परमानंद झाला... मग मी निर्ढावले. खरोखर पुन्हा एकदा महावीरमधेच कानातल्यांच असंच शॉपलिफ्टिंग केलं. ती पुन्हा खूष झाली. मला ते माझ्यासाठी नकोच असायचं. ते तिला द्यायचं असायचं. हे चूक आहे नको हं करूस, असं काही ती म्हणाली नाही. मी काही गंभीर करते आहे असं न तिला वाटलं न मला तेव्हा उमजलं.
मुंबईहून दरसाल उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे नगरला जाताना बहिणींसाठी, मैत्रिणींसाठी त्यांच्या मुलांसाठी काही ना काही घेऊन जायचे हे मी न चुकता करत असे. मग त्या भेटवस्तुंवर खर्च करण्याची माझी सवय मी कमवू लागल्यावर वाढली. ते सारं मी मुंबईहूनच घेऊन जात असे. मुंबईत मात्र हा शॉपलिफ्टिंगचा प्रकार कधी केला नाही. कारण माझ्याकडे मला हव्या त्या वस्तू घेण्याइतपत पैसे नेहमी असायचे. ज्यासाठी पैसे नसत ते चोरी करावं असं मनात आलं नाही.
माझ्याकडे जितके पैसे असायचे त्यात मला ज्यांच्यासाठी काही घ्यायचे आहे त्याच्या बजेटमधे मी त्या खरेद्या बसवायचे. माझ्यासाठी काही न घेता इतरांसाठी वस्तू विकत घेण्याचा मग शौक निर्माण झाला व शेवट त्यांचे माझ्यावर प्रेम राहिले नाही ते मी आणलेल्या वस्तूंमधे अधिक गुंतत गेले ह्याची जाणीव झाल्यानंतर मी त्या सार्या खरेद्या थांबवल्या. मग एकूणच त्या लेनदेन प्रकाराबद्दल घृणा निर्माण झाली.
आता क्वचित घरात नवर्याच्या खिशातून एका प्रामाणिक बायकोसरिके १० रूपये ५० रूपये चोरण्याचे उद्योग अधूनमधून करत असते आणि त्याबद्दल मला अपराधी वाटत नाही. बायको म्हणून तो माझा हक्क आहे.
ह्या चोर्यांमधली शॉपलिफ्टिंगच्या मी दोनवेळा केलेल्या प्रकाराची मला निहायती बेकार लाज वाटते. तो काळा डाग वाटतो मला. ते माझे मीच वेळीच थांबवले ह्याबद्दल हायसेही वाटते. काय करत असतो आपण अजाण अडनिड्या वयात.. असं काही वाटलं तरी चोर्या थांबत नसतात. लोकांचे हृदय, त्यांची झोप व त्यांची स्वप्न चोरण्यापासून सारे करून पार झालोत आपण. वो तो होनाही था.
कुठल्याही क्रीएटिव्ह माणसाला चोरीत दडलेले हटके निर्विष गुणात्मक फायदेही लक्षात घ्यायला हवेत. जसे की लेखकाला, आसपास घडणार्या घटना त्यानुसार स्वत:त होणारे बदल, जे काही होत असतं त्याला रिअॅक्ट होणारे आपले मन, दुसर्यांच्या आयुष्यातल्या घटनांना आपण कोणत्या पर्सपेक्टिव्हने पाहतो ते सारे, रोजच्या जगण्यातले छोटे मोठे क्षण हेरून त्यातलं कॅण्डिड कन्टेंट चोरता आलं पाहिजे. इथे भावनांचा माणसांचा नात्याचा बाजारच तर भरलेला आहे. त्यातलं जे युनिक न्यारं वाटतं त्याचं शॉपलिफ्टिंग करून ते शब्दबद्ध करता येणं ही कला आहे. ते पाप नाही. ते सारं उचलून त्यांना शब्दांचे पाय लावून मॅरॅथॉन धावता यायला हवी. ही चोरी सुंदर आहे आणि ती करता यायला हवी. सर्जनप्रक्रियेसाठी आवश्यक आणि मोलाची आहे ती. सध्या इतकीच चोरी करते मी लिहणं शिकण्यासाठी.

Comments

Post a Comment