तिच्या नजरेतून तो



कातळावर हिरवळ फुटेल. कोरड्याचं अंग भिजेल. तहान शमेल म्हणून का पडतो पाऊस ? त्याला कोसळायला आवडतं म्हणून तो पडतो. झोडपण्यात त्याला आनंद मिळतो. त्याला नाही माहीत पूर आल्याने होणारं नुकसान. कोण घेईल सावली कोण बसेल त्यात निवांत ? आपलं खोड कुणी कापलं तर.. कापलंच तर खुर्चीत वळवलं जाईल की चितेत रचले जाऊ आपण याचा विचार करून बी उगवत नाही. ती रूजते वाढते फोफावते. नशीब. अगदी असंच कोणतंही कॅल्क्युलेशन नव्हतं तुझ्या ओठांमधे. त्यांना फक्त टेकायचं रूतायचं होतं म्हणून तू किस केलंस. नाईलाज असतो इच्छांपुढे. कुणी म्हणेल की ही फक्त लस्ट आहे बाकी काही असूच शकत नाही. मला नाही समजत हे गणित. समजून घ्यायचंही नाही. आकाश भरेल इतका पसारा याआधीही होता की आयुष्यात. त्यात नव्हती जाळणारी वाफ. नजरेला नजर मिळाल्यावर पायांच्या बोटांमधून वरवर येणारी शिरशिरी अंग हादरून टाकत नव्हती. तळमळणारे जीव, मिणमिणत राहणारे.. मंद हसणारे.. रोखणारे टोचणारे झुकणारे डोळे नव्हते. वितळत पायापाशी गळून पडलेल्या मिठ्या नव्हत्या.
पाठीचा मणका म्हणजे एक लांबलचक तहानलेली शुष्क भेग आहे.. हे सांगणारा जिभेचा उष्ण शीतल ओलावा नव्हता. जिभेच्या न्यूड खरखरीत चवीची चव नव्हती. तिळांचं भान नव्हतं. प्रत्येक तिळावर ओठ टेकले गेल्यावर ते तीळ नव्हे तर त्या शरीराच्या दोर्यात ओवल्या गेलेल्या असंख्य फुलांच्या गंधबंद कळ्या आहेत, हे माहीत नव्हतं. त्वचेच्या स्पर्शाने झणझणारे शॉक्स नव्हते. बोलता बोलता बोलणंच तोडणारे आणि सबंध खाऊन टाकणारे एका सिरीयस भुकेचे ओठ नव्हते त्या पसार्यात. या आधीच्या पसार्यात बोलणार्याचे ओठ नव्हते. ऐकण्यासाठी थांबलेले कान नव्हते. संभाषणांचे कपटे बोळे नव्हते. ओढून घेणं ताणून धरणं नव्हतं. जिभेखाली शब्द अडकत नव्हते. अडकलेच तर डोळ्यांचे दरवाजे साट्कन उघडून बाहेर निघू शकत नव्हते. ओटीपोटाच्या दोन्ही बाजूला फुटणारे स्फोट नव्हते. गळ्यात आवंढे नव्हते. व्रणांच्या कलाबुतीशिवाय सजलेलं फक्त एक शरीर होतं माझं. शरीर असतं ते जाणवतंच असं नाही. तू भेटल्यावर एक नवीन आकाश मिळालं आणि तू उपसून ठेवलेल्या पसार्यात जाणवलं की शरीरालाही असतात अनगिनत ऋतू ! तिथे पालवतात हिरवी गुलाबी वेड लावणारी पिंपळपानं. थंड शरीराला गरम करत एकसांधतात तुझ्या बोटांच्या पेरांमधली कोवळी उन्हं. तुझे ओठ गोंदत राहतात कानामागे निळसर काळ्या शाईचे एकाच जागी थांबलेले वल्हत राहणारे शांत स्थिर डोळ्याचे तृप्त मासे. श्वास भिजत राहतात. कुस्करली जातात पानं फुलं. डाव करून जातो हा पसारा. ज्यात ताकद आहे. ज्याने विसर पडतो ह्याचा की जगण्यासाठी मुक्याने रोज मरतोय आपण. जगण्यासाठी जगण्याचा एक अंश मिळावा लागतो पण काही करा भेंचोद तो मिळतच नाही, हे कळण्यासाठी जी अक्कल आहे.. समज आहे.. ती का आहे आपल्यात? का कळंतंय आपल्याला इतकं.. का? हा का मिळत राहतो ना रे तुझ्या पसार्यात. 
असा दिसलास मला तू. माझ्या नजरेतून तू. किती सिंपल आहे हे सांगणं की कसा वाटतोस मला तू ! आहे का सिंपल ? तुझ्या मिठीशिवाय कापतंय शरीर. आय कॅन फील यू ऑन माय नेक. हे प्रेम नाहीये. हे भिनत जाणारं विष आहे. लाजणं हे काय असतं ते मला माहीत नव्हतं. कसं बरं असेल ? नक्की काय होत असेल ? मरो. तो प्रांत आपल्यासाठी नाही किंवा श्शी पुरषाला बघून लाजण्यासारखं काय असतं इथवर.. पण मी हरले तुझ्यापुढे. बावचळून गेले होते. तुझ्या स्पर्शापेक्षाही तुला हवा असणारा माझा स्पर्श तुझ्या डोळ्यात दिसणं हे अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं होतं. तू पाहूच नयेस माझ्याकडे. तू पकडू नयेस माझ्या डोळ्यातला केऑस.. तू प्रश्नं विचारणार म्हणजे पाहणार माझ्याकडे. तू पाहिलंस की आग लागणार. नको नको मी हीच करूणा भाकत असायचे. 
लाजल्यावर डेंजर घटना घडतात. आपला त्यावर काही कंट्रोल नसतो. ताठ होऊ नकोस, असं शरीराला समजवण्याचा वेळ मिळत नाही. लाजणं हे इतकं घातकी असतं की पुढचे अनेक तास आबादीतून बर्बाद होण्यासाठी शरीर आंदोलनच करायला लागतं. नजरेने इंधन भरलं जाऊ शकतं. श्वासाने त्वचा गरम होऊ शकते, ओठांनी विषय मिटू शकतात. घड्याळ्याचा काट्याला बकासूरासारखी भूक लागू शकते. वेळ वाया जातोय का, असं वाटत असताना शरीराचं त्वचेतून - मनातून वाया जाणं संपू नये हे वाटतं. सत्कारणी लागावे वाटणारे सारे विषय क्षणात किरकोळ वाटू लागतात. किरकोळ ऐवजी झाट म्हणावं असं वाटत होतं, असो. सतत दुखावल्या जाणार्यांच्या गंजलेल्या झाटभर भावनांचं ओझं पेलणारं मन आकर्षणाच्या भोवर्यात ओढलं गेल्यावर विसरून जातं त्याच दुनियेला जी विचारीत राहते निर्लज्जपणे एक्सप्लनेशन्स. लाजल्यावर खूप खूप पसारा होतो.. नंतर खूप कपडे आवरावे लागतात हे लक्षात ठेवायचं. 
लक्षात ठेऊनही काय करता.. काही पसारे घालावेच लागतात ते पुन्हा घालायची सुप्त इच्छा मनात असतेच. त्याला जागा हवी म्हणून ते आवरावेच लागतात. तुझं वॉलेट, तुझा गॉगल, कॅप, सॅक, चाव्या, कॉर्ड्सच जंगल, एक लाख चारशे वीस टू डू लिस्ट, तुझे बोथट आणि काही टोकदार अनुभव होते त्या पसार्यात. ते हळूहळू आवरू लागले होते मी. त्यांना एक जागा देऊ लागले होते. हात नकळत वळायचे. तुझ्या कपड्यांच्या घड्या नकळत व्हायच्या. अरे आपण अजून चक्क पसारा आवरू शकतो, असं डोक्यात भिनायला लागलं होतं. मग कळलं की पसारा आवरायला पसार्याला जीव असावा लागतो. भावनाशून्य पसार्यापेक्षा उंचबळणारे पसारे ओढून घेतात. जणू त्यांना हात असतात. जणू आवडलेल्या माणसाचे पसारे मिठी मारू शकतात. तू नसताना माझा वेळ सहज जात होता कारण तुझ्या पसार्याला तुझी ऊब होती. तो तुझा पसारा होता नं.. त्यामुळेच त्याला एक रंग होता. तो इतरांना खूप वैतागवाणा वाटत असेल. मी रमले होते. तुझा रंग मी पाहिलाय. तो आहे तसाच मला आवडतो.
बायकांचा साला हाच प्रॉब्लेम आहे. त्या ना च्युत्यासारखंसं काहीतरी आवरून ठेवून.. जीव ताबडवत काहीतरी रांधून ठेवून साला ते पायबिय चेपून डोकंबिकं दाबून कधी खिडक्यांचे पडदे बदलून तर कधी एकदम ७० कानातले विकत घेऊन प्रेमाची नौटंकी करतात. त्यांना दडवताच येत नाही. त्या फुगे घेतात आणि आकाशात सोडून त्याकडे फार पोएटीक पाहतात. त्या तसंच वागतात. बायका बायकाच असतात. साला बायका अबायकीय काही वागून प्रेमात घुसणं शक्यच नाहीये का? निसर्गाने बाई नावाचा केवढा मोठा पसारा घालून ठेवलेलाए. तो आवरणं कुठल्याही पुरषाला किंवा त्याच्या बापाला शक्य नाही. माझ्या आवरलेल्यात तुझं अचानक पसारा करून जाणं बेफिकीर. त्यामुळेच झाला सगळा प्रॉब्लेम. माझा विश्वास आहे यावर ठाम की कशानेही प्रेम होऊ शकतं बायकांना. त्या येडझव्या असतात. बाई या नावात इतर कुठल्याही पसार्याला हरवणारा पसारा आहे. तुला अजून पसारा करता यावा म्हणून.. वस्तूंचा पसारा करता यावा, बोलण्याचा पसारा माजवता यावा, गाण्याचा गोंधळ करता यावा, ठिणगीतून शरीर पेटवता यावं यासाठी आधीचं ते सारं मला आवरावं वाटत रहायचं. तुझे पझल्ड श्वासही आवरावे लागायचे जे माझ्या नजरेच्या काट्यांमधे अडकून फाटून माझ्याच चेहर्यावर मोडून पडलेले असायचे. तू उसवलेल्या माझ्या ओठांच्या धाग्यांना रफू करून परत चकचकीत करून ठेवावं लागायचं. माझ्या हाडांमधल्या उंचसखल डोंगरतळ्यांमधे भूकंप माजवणारे नेमके किती ओघळ फेकून गेलास, त्याची संख्या नसेल माहीत तुला.. त्याच्या आफ्टरशॉक्सचा पसाराही मलाच आवरावा लागायचा. 
अॅशट्रेमधल्या थोटकांसारखंच कधी पूर्ण कधी अर्ध्यापर्यंत वापरून मी ढकलून दिलेलं तुझं शरीर विझल्यावर निपचित पडलेलं असायचं. तू आग बनून आत शिरत असताना डोक्यातले लाखो विखार कसे काय बरं विझायचे? तू माणूस आहेस की तंबाखू ? तुझं शरीर आहे की सिगारेट ? तुझी चव जी मला लागली तशी नसेल लागली अन्य कुणालाही. इतका माज तर मी करणार कारण मी बाई आहे. तू दिलेल्या धुंद कैफाच्या डोळ्यांनीच कितीवार पाहिलं तुला तरी समाधान होत नसायचं. एकच पाकीट आहे आपल्या हातात. जे संपेल म्हणून जपून वापर असं सांगणार्या मनाचा आणि नाही नाही ते तसं जपून जपून कश मारत ओढता येणार नाही, त्यात काय मजा..हे सांगणार्या दुसर्या मनाचा संघर्ष रोखता आला नाही. कितीतरी पाकीटं संपली. मी कित्येकदा भरलेला अॅशट्रे रिकामा करत राहिले. तो परत परत भरत राहिलाच. धूर उठताना झुरतच उठायचा. मला भान देण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांत कसूर न करणारा धूर गरगरणार्या पंख्याखाली गाळासारखा साचून माझ्या गळ्यात उतरून मी घेलेलेले आनंदाचे सारे घोट पिण्याच्या बेतातच असायचा बास्टर्ड. हे संपणार आहे.. हे इल्युजन आहे. प्रत्येक मिनिट भूतकाळात बदलत जातोय हे लक्षात घे... हो हो कळतंय. फक्त एकदा मिठीत असताना नकोय हं मला हे भान. मला एकदा सोडा त्याच्यासोबत.. प्लीज. आपण रममाण असताना आपल्याकडे एक निगेटीव्हिटीचा लोट येत असतो गिळायला, हे असं का वाटतं माहीत्ये..? कारण आपल्याला सगळ्यांना आनंद सहन होत नाही. दुसर्याचा तर नाहीच आपला स्वत:चाही नाही. आपल्याला शहर लागलेलं आहे. 
शहर लागलं की असंच होतं. आपण नाण्याची एक बाजू पहात मज्जा करू शकत नाही. सेकंड साइड, सेकंड ओपिनियन, पर्याय, पळवाटा, मग असं झालं तर... आणि आणि ते तसं झालं तर.. मग मी काय करायचं.. कसं, कधी, कुठे, केव्हा, कुणामुळे. प्रश्न विचारतो आपण. आपल्याला उत्तर नकोयत. ती फेस करता येणारच नाहीत. पण प्रश्नछळ करायचा आहे. एकमेकांशी बोलता येत नाहीये. जे रूतलंय त्याने गॅंगरीन झालं तरी चालेल पण ते उपटून फेकून देता येत नाहीये. मग मी काय करू तूच सांग ? तू किती छान आहेस.. का आहेस रे असा ? तुला कशातच काही गैर वाटत नाही. तुझ्या डोक्यात पसारा नाही. मी हरवून गेलेले लक्षात आलंय तुझ्या. मला काहीच कसं प्रीटेंड करता आलं नाही ? मला का नाही आलं रोखता स्वत:ला ? का लिहत्येय मी हे सगळं ? ही काय च्युत्येगिरी आहे.. शरीराने शरीराला दिलेल्या, मनाने दुसर्या एका मनाला दिलेल्या नशेमन भावना, जाणिवा गाडून टाकण्याची या प्रेमाकर्षक पसार्यात भीषण ताकद आहे. काय करू रे जगून ? फूल मेलोड्रामा नं डोक्याला शॉट नं? Not to worry. नाकावर संथ हलतोय जबाबदार्या, महत्वाकांक्षांचा, पाठलागांचा, अपेक्षांचा व्हेंटिलेटर. अजून तरी सांगू शकतेय तुला की मला पडलं होतं भर दुपारी एक दु:स्वप्नं. आता मला दिसतोय एक नजर पोहोचत नाही इतका उंच दरवाजा आणि माझ्या हातात असलेली पोलादी कुलपाची चावी. तू आहेस दरवाज्यापलिकडे. कुणी भेटतं आपल्याला ते निव्वळ योगयोग म्हणून नव्हे, असं मीच लिहलं होतं एकदा. जे आपण लिहतोबिहतो त्याचा प्रत्यय यायलाच हवा, असं आहे का ? मी भिंत आहे का एखाद्या किल्ल्याची? माझ्या छातीवर नाव लिहून गेलायस नं तू? शरम नाही वाटत तुला ? तुलाही आहेत अश्या वाईट सवयी.. श्शी ! तू निघून गेल्यानंतर बसायला लागलेल्या आफ्टरशॉक्सने बघ काय होतय. 
मला शहर लागलंय. इथे स्वप्नं तुटतात माणसांसारखी. आठवायचा प्रयत्न केला तर अनोळखी चेहरे दिसायला लागतात त्यातले. अश्यात कसे लगेच मी लिहून आकारून शाकारून उभे केलेत पहा शब्दांचे मॅनिक्वीन. त्याच्या नजरेतून ती.. तिच्या नजरेतून तो.. माझ्या नजरेतून तू.. आह.. जे वाटतंय त्याला आकार देण्याचा हा प्रयत्न. किती फसवं आहे हे. हे खरंखुरं जाणून घेण्यासाठी नाहीचे विचारलेलं तुला कुणीही ? ते पान भरतील तुला चुना लावतील. फिलिंग्जचा दररोज च्युत्याबाजार लागतो. त्यात प्रेमासाठी किंमत मोजावी लागते. जे हलकं आहे ते मिरवायला लागतं. तू कापल्यावर मला रक्त लपवायला लागतं. मनाच्या एका सूक्ष्म कोपर्यातून ऐकू येणार्या तुझ्या हाकेचा गळा घोटावा लागतो. तुझ्यासोबत शहर लागत नाही. पण त्यातलं ज़हर समजायला लागतं. त्रास वाढतो खूप. फार रोमॅंटिक आणि तितकीच डीव्हॅस्टेटिंग आहे तुझी नजर. मला नक्की काय वाटतं तुझ्याविषयी हे उलगडून सांगणं म्हणजे साडीचं अंग आणि पदर दाखवण्यासाठी तिची घडी उलगडण्याइतकं सोपए का ? काहीही विचारतात लोकं, माझ्या नजरेतून तू इ.

Comments