डोळे असतील तर कळेल

मनापासून येणारं पण प्रयत्नपूर्वक व
आताशा शेवटच्या धुगधुगीसारखं उमटणारं क्षीण हास्यही
शरीराच्या नसांनी जेव्हा घोटलं जातं
तेव्हा डोळे कणकण प्राण सोडत राहतात
नोंद न झालेल्या आत्महत्या करणारे श्वास घेताना दिसतात
त्यामुळे समजूत करून घेताय तुम्ही की
ते श्वास सोडतही असावेत
तुम्हांला दोष दिसतात सतत. सगळ्यात. स्वत:हातही.
इतके सतत की तुमच्या डोळ्यांचीही कीव येऊ लागली होती
आता तीही करावीशी वाटत नाही
तुमच्या टोचण्याने समोरच्यांना
आपण म्हणजे एक विषारी नदीच आहोत
कोमेजूनच उगवणार्या कोंब कळ्यांना पाणी पुरवणारी यावर विश्वास बसेल
त्या गाळातून भीषण न्यूनगंडांनी भरलेलं बेट तयार होऊन
त्यावर आपण नक्की एकटेच फिरत राहणार यावर विश्वास बसेल
आतल्या विषारी नदीला समुद्रच मिळणार नाही
यावर जड जड पावलांनी शिक्के मारत जाणारी ती बघा
तिने आत्महत्या केलेली आहे. कळली का तुम्हांला?
डोळे असतील तर कळेल.

Comments