रागूबाई

मैत्रीण जेव्हा विनाकारण आपल्यावर चिडते
तेव्हा कळतं की जसा आपल्याला कमालीचा
एकटेपणा आल्यावर हक्कानं
चीड काढावी असं एक माणूस पास असावं वाटतं
तेच तिला वाटतय माझ्याबाबत
मी तिला नाही समजवणार की,
चिडू नकोस, वाटेल ते ग्रह नको गं करून घेऊ इ. इ.
कारण तिने ठरवलेलच आहे की आता
तिला जाम जाम चिडायचच आहे !
वर हेही सांगायचं आहे की तिची
माझ्याबद्दल काहीही तक्रार नाहीये
ठीक.
जर कुणाचं आपल्यावर मनापासून प्रेम असेल
तर त्याला चुकायला किंवा चुतियेगिरी करायला
आणि वाट्टेल ते ग्रह करून घेण्यासाठी
एक मोकळी जागा ठेवायलाच हवी

ती मैत्रीण म्हणून मी तिला द्यायला हवी.

अत्ता खरं काय वाटतंय सांगू
तिला दरादरा ओढत शॉवरखाली न्यावं थेट
थंडगार पाण्याखाली उभं करावं
तापलेली असेल आजारी असेल तरीही असं करावं
तिला भिजताना हुडहुडताना बघत
आपण शांतपणे तोंडात एक सिगारेट टाकून
कोपर्यात एक स्टूल घेऊन बसावं ऐटीत
ती सिगरेट पीत नाही म्हणून ती भिजत असतानाच
तिच्या अंगावर धुराचे लोटच्या लोट सोडत रहावं
म्हणजे ती अजून अजून चिडेल
आणि कदाचित
काच फुटल्यासारखी खळ्कन हसेल.

Comments