खपली

आपल्याला ज्याच्यासोबत सुखाने श्वास घेता येतो
त्याच्यासोबत राहता येत नाही
आणि
ज्याच्यासोबत आपण लग्नं केलय म्हणून राहतो त्याच्यासोबत
सुखाने जगता येत नाही, ह्या सत्याचे वळ
किती सुरेख बसवले आहेस तू गोंदण करून मनगटावरच्या शिरेवरती
त्या फडफडणार्या तडफडणार्या टोचणार्या
शिरा उश्याला घेतात स्त्रिया
कापसाचा कोयता कापत राहतो मेंदू
पण आतल्या वेदना अमर्त्य असल्यासारख्या
लस्टफुल यंग असल्यासारख्या निखारत राहतात
आगीत डोळे टाकून बुब्बुळांच्या निखार्यावरती
शेकल्या जातात कित्येकींच्या थंडगार रात्री
घट्ट चिमटून डोळ्यांच्या पापण्या
बांध घालतात डोळ्यातून रक्त बाहेर पडू नये म्हणून
मुलाबाळांच्या तोंडाकडे बघत म्हणत राहतात
ऑल इज वेल ऑल इज वेल

ही तुझी नाही अनेकींची कथा आहे
अश्या कथा असलेल्या रडक्या स्त्रिया आमच्याच नशिबी का..
अशी तुझ्या नी माझ्या पुरषाची
मित्रांच्या बैठकीत मांडली जाणारी व्यथा आहे
बोलण्याची गरज होती म्हणून बोलले
खपली काढली तुझ्या न दिसणार्या जखमेवरची
खपली कुरतडताना थोडं बरं वाटतं म्हणून बोलले
कागदालाही जखमा असतात खपल्या पांढर्या असतात इतकंच
दिसत नाहीत त्या जोवर कुणीही मांडत नाही तिथे शब्द
कोरड्या कागदावर शाई लवंडावी लागते
तेव्हा भरून येतं जमिनीला आणि कविता स्फुरायला लागतात जिच्यातिला

उध्वस्त झालेल्या आहोत. कश्या ते सांगता येत नाही
मनाची भिंत एक लाख स्फोट झेलू शकते
जर कुणाचं प्रेम मिळत असेल तर..
आता शांत झालोय
कुणाला काही समजावणं नाही
प्रश्नं विचारणं नाही
आता आपल्या काही मागण्याच नाहीत
तडकून ठिकर्या होऊन इथे तिथे पडलेले
आपले तुकडे शोधत असताना भेटलोत गं
शोधताना तुझा एक तुकडा मिळाला
माझा तुकडा झाकावा आणि तुझा तुकडा पहावा
इतके हुबेहुब तुकड्यांचे आकार आणि त्यावरच खरचटलेपणही
आपल्यासारखंच दुसर्यालाही दुखतंय
हे कळल्यावर एक विचित्र दिलासा मिळतो म्हणून बोलले
मला हलकं वाटतंय. तुला ?

Comments

Post a Comment