आहे हे असं आहे - २

पुण्यात सगळ्यांना भेटायचं असेल तर कुठे काय हा संभ्रम पडलेला आहे. एका वाचक मैत्रिणीने तर चक्क अजिबात थेट ओळख देख नसतानाही स्वत:हून मेसेज केला. तू मला आवडतेस. इथे येणार आहेस कळलं.. तुला कुणाला भेटायचं असेल तर माझ्या घरी उतर. इथे काय तो दंगा करा. तू येणार आहे त्या NFA च्या समोरच माझं घर आहे म्हणून.. मला ही तत्परता कधी व कशी जमेल ते माहीत नाही. घरी कुणी येणार असेल तर मला टेंशनच येतं. बाहेर भेटायला बरं वाटतं. पण लोकांच तसं नसतं. छान आवरली सवरलेली घरं असतात. माझ्यातही असा उत्साह होता एकेकाळी. दृष्ट लागावी असं आवरलेलं घर असायचं. मग आताशा तो उत्साह हळूहळू इतका ओसरत गेलाय की घरात आवरणं सोडा आहे त्याच पसार्यात मी त्यातलाच एक भाग बनून गेलेली आहे. घरातून मी फारशी बाहेर पडत नाही. कुणालाही भेटत नाही. माणसं टाळते. का.. कारण काहीच नाही. असच पडून रहायला आवडायला लागलय म्हणण्यापेक्षा एकटेपणाची सवय फार फार वाईट पद्धतीने झालेली आहे.
ऑफीसमधे होते तेव्हा फार सोशल होते मी. आता क्वचित एखाद्या मैत्रिणीला कधी भेटायला जाणं असतं. तेही समोरच्याने १०० वेळा बोलावलं तर मी जाते. मी आपणहून भेटायला येते असं कधीही सांगत नाही. ह्यात आढ्यता अजिबात नाही. घराबाहेर पडायचा कंटाळा येतो. किंवा जाऊया जाऊया असं होतं. आळस येतो.
घरातही मी लिहीत असते. आसपास काय चाललय ते ते त्यांच त्यांच आयुष्य अॅडजस्ट करून घेतील इतकी एककल्ली झाले आहे मी. नवरा ह्यात मला अजिबात व्यत्यय येईल असं काही घडू देत नाही. तो मला खूप समजून घेतो. ह्याबाबत माझ्या सगळ्याच बाजू तो समजून घेतो. कधीही कसलीही तक्रार करत नाही. घर टापटीप ठेवण्याची त्याला आणि मला फार आवड आहे. पण माझ्यात ती विझली अताशा. तो आवरत असतो एकहाती. खूप करतो. मुलाचं. माझंही. तू बाहेर पडत जा. लोकांना भेटत जा.. का टाळतेस लोकांना असं सांगत राहतो.
फेसबुकवर पोस्ट वाचणारे भरभरून प्रतिसाद देणारे अनेकजण भेटण्याची इच्छा वारंवार इतक्यांदा व्यक्त करत राहतात की मला फार अपराधी वाटतं.
मी म्हणजे खरं सांगायचं तर एक पिसाचा मोर आहे. एक पिस मागे लाऊन नाचणार मोर असं मला प्रामाणिकपणे वाटतं. फेसबुकवर लिहायला लागल्यापासून आपण आपल्या मनातल्या भावना अनुभव नीट मांडू शकतो इतका आत्मविश्वास मी इथे कमावला. पण त्यापुढे.. माझे नीट धड काहीही काम लिखाणातले मी अद्याप करू शकलेली नाही. माझे धड एकही पुस्तक नाही. असे असताना लेखक म्हणून मी मिरवणं त्यासारखं बनून मी लोकांना भेटणं हे मला फसवल्यासारखं वाटतं. मला ऑकवर्ड वाटतं. ज्यांना भेटायचं असतं त्यांच्या डोक्यात हे सारं काही येतही नसेल. इथे बर्यापैकी पॉप्युलर असेलल्या अनेक लोकांना मी असं लोकांना भेटताना पाहिलेलं आहे. आनंद साजरा करतात मस्त. पण मी हे करायला हवं का.. इतपत काय आहे आपल्यात असा प्रश्न पडतो.
मला नेहमीच विचित्र प्रश्न पडत असतात. उगाच हो हो माहीत आहे. माझ्या सख्ख्या मित्रांचे फोनही मी उचलत नाही. टाळते. का.. काहीच कारण नाही. पण ते मला समजतात. मग मुद्दाम उंगल्या करायला ते मला लॅंड लाईनवर पहाटे तीन वाजता वगैरे फोन करतात. मी घाबरीघुबरी होऊन फोन उचलायला जाते. मग ते ख्या ख्या करत हसत सुटतात. आधी दोन तीन पद्धतशीर शिव्या घालतात आणि आता तुला बोलावच लागेल ही सक्ती करून गप्पा मारून घेतात.
बोलायचंय भेटायचंय असं म्हणणारी माणसंही किती असतात आसपास.. फार कमी असतात माहीत आहे मला. तीही किती काळ आपलं टाळणं मनावर घेत राहणार असतात. इतकं काय देणं लागतात ती आपल्याला. काही तगून राहतात. काही रागवून आपली वाट सोडून निघून जातात हेही मला माहीत आहे. जे आपल्याकडे हून येतात त्यांना आपण धरून ठेवलं पाहिजे माणसं जोडून ठेवली पाहिजेत हेही पटतं. पण काय झालंय मला ते कळत नाहीये.. मला एकटीलाच बरं वाटतं. एकटेपणा नकोय त्याची मला भीती असेल तरीही आहे हे असं आहे.

Comments

  1. लेखक मंडळी अशी एकलकोंडी असतात..नसली तर कालांतरानं होतात..it is natural..!

    ReplyDelete
  2. भेटायचं तर बार मध्ये भेटायचं , नायतर मोकळ्यांत नाय भेटायचं #GB

    ReplyDelete
  3. लेखक मंडळी अशीच असतात आणि त्यामुळे तुम्ही असे आहात...!
    हा positive नाहीतर Negative thought आहे...का म्हणून एकटे राहायचे जर भेटायला बोलायला आवडत असेल तर...
    न भेटलेल्या व्यक्तींवर लिहण्यापेक्षा, भेटून लिहलेले कढीपन भारीच..��

    ReplyDelete
  4. लोकं anonymous का लिहितात तेच कळत नाही :-D

    ReplyDelete
  5. मी पण भयंकर एकटा पडलोय, कधी कधी वाटतं सगळ्यातून मुक्त होवं
    पण तुमचा ब्लॉग वाचला तर मोकळं वाटतं
    खूप काही बोलायचं भेटायचं...����

    ReplyDelete

Post a Comment