आयुष्य निवांत चाललंय का..

आयुष्य जगता आलं पाहिजे शांत स्मूथ
त्यात ईझ पाहिजे
भट्टी पेटलेली आहे काहीतरी रटरटतय
लोखंड तापतय उत्पादन चालू आहे सतत
मग ते विकायचं खायचं विकायचं खायचं
त्यानेही अॅव्हॉईड करता येईल का कंटाळा?
त्यात मी इंजिनिअर
म्हणजे मला कलेचा किडा चावलेला असणारच
हे तुम्ही समजून घ्यायला हवं
आयटीत काम करणारा माझा एक मित्र आहे
त्यालाही लेखक व्हायचय आता
एक मित्र डॉक्टर
त्याला फक्त पेंटिंग्ज करायची आहेत आता
हातात सगळं काही असूनही आयुष्य रिकामचोट
असल्यासारखं वाटतं आम्हांला
कारण आम्ही सर्व एकाच बॅचची एकाच वर्गातली मुलं
आमच्या सगळ्यांच्याच डोक्याचं वायरिंग असं विचित्र झालय इतरांपेक्षा
शिकलोय पण त्याने जगतोय खूष आहोत
असं ठासून म्हणता येत नाही बूच लागलेली असताना
घाई करतात माणसं.. पर्फेक्ट जगून दाखव अशी रट लावतात
त्याने बिघडतं सगळं
सतत कसा असेल उत्साह कसं जमेल हे ?
सतत कसा करायचा, का करायचा अभिनय
बिझी असल्याचा एक मिनिट वेळ नसल्याचा अभिनय
कारण तसं नाहीये. मला वेळच वेळ असतो.
जो मला कुणालाही द्यावासा वाटत नाही येताजाता इतकच
म्हणून चिडतात माझ्यावर पालक, मित्र, समाज, गर्लफ्रेंड
सूर नसला तरी गावं वाटलं.. गाता आलं पाहिजे
अगदी एट कोर्स मील नाही पण
मनात आलं रे आलं की
कडकनाथ कोंबडा खाता आला पाहिजे
व्यसनासाठी नाही पण क्वचित गांजा लावावा वाटला
तर ओढता आला पाहिजे
आर्टबिर्ट करून ती विकली गेली नाही तरी भले
पण तरीही मी आर्टच करेन ना आईशप्पत
मी तेच करणार
मेल्यानंतर फेमस होतात आर्टिस्ट
नंतर मिळतात त्यांच्या वर्कला कोट्यवधी रूपये ऑक्शनमधे
ही परंपरा आहे आपली. तसंसुद्धा चालेल
पण मी नोकरी करणार नाही
हा सारा पेशवाई माज मला करता आला पाहिजे
आणि हे सगळं निवांतपणे करू देणारी
भरपूर पैसा कमावणारी बायको सर्वात आधी
मला पटवता आली पाहिजे
पैसा ती आंटे की मी आंटो हे महत्वाचं नाहीये
तो कुठून येतोय हेही महत्वाचं नाहीये
आयुष्य निवांत चाललंय का तेवढं महत्वाचं आहे डार्लिंग.  

Comments

Post a Comment