नवा शिवाजी जन्माला यायला हवाय

थोर महापुरषांनी आपल्याला अंधारात रस्ते दाखवले. त्यावर आपण चालावं असा हेतू होता त्यांचा. पण त्यांना टॉर्चलाइटस बनवून आपण किती काळ अजून वाटा ढुंडाळत असल्यासारखं दाखवणार आहोत? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचं स्मरण होणं आणि अंतर्मनात त्यांचे आदर्श सतत झळझळत असणं हे मस्तय. पण या महापुरषांना आपल्या बुडाखालचे टेकू बनवणं हे कधी सोडणार आपण ? ही नाव काढून वगळून बोला म्हंटल तर उरणार आहे का तुमच्याकडे काही बोलण्यासारखं ?
हे टेकू काढले तर ढासळणार का तुम्ही ? त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालत पुढे आलं पाहिजे. आताच्या समस्या वेगळ्या असताना आता ज्या शिवाजीची गरज असेल तो आधीच्या शिवरायांपेक्षा कितीतरी वेगळा असायला हवाय नं.. किती काळ इतिहासात जगणार आपण? महापुरषांच्या विचारांच्या मशाली सतत पाजळत ठेवणं आणि आपण आपला आताच्या काळाला लागू पडेल असा कोणताही विचार पुढे न आणणं या पळवाटा आहेत. वर गेलेले सगळे विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, महात्मा हताश झालेले असतील हे सगळं पाहून नक्कीच कारण अजूनही आहे आपल्याला जिथे तिथे त्यांनीच बोळ्याने दूध पाजण्याची गरज. यासाठी केला असेल का त्यांनी जो काही केला होता तो खटाटोप ?
फेसबुकवर तर आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे प्रोफाईल पिक असलेल्या फ्रेंड रिक्वेसस्ट मी डीलिट करते. लाजून नजर खाली झुकवलेल्या चार माधुरी दीक्षितांच्याही रीक्वेस्ट आल्या होत्या. पण मी त्याही स्वीकारल्या नाहीत. कितीही धकधक झालं तरीही मी फसत नाही. टुकटूक. क्वचित असे चेहरे असलेली प्रोफाईल हे केवळ त्यांच्या मनात आदरभाव असल्याने असलं काही करत असावेत असा एक डौंट मनात ठेवते. खरोखरच ते त्या चेहर्यांचा काही गैरफायदा घेत सोशल मीडियावर धुमाकूळ घालतही नसतात. अश्या भल्या लोकांबद्दल काही अडी नाही भौ मनात.
मागे एक लेख लिहला होता. त्याखाली हे तुम्हांला लिहता येणं शक्य झालेलं आहे कारण तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात. हो आहोत भौ आहोत मग ? मग तुम्हांला हे लिहण्याबोलण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं असताना तुम्ही आधी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल गौरवपर काही का लिहलं नाही, अशी लगेचच कमेंट पडते. ही कसली दहशत आणि सक्ती आहे? शिवाय त्याचा मूळ लेखाशी काडीमात्र संबंध नसताना हे असले मुद्दे घेऊन यायचं कारण काय असतं? समाजसुधारकांच्या नावाचा वापर करून दुसर्यांना त्रास देणं, वेठीला धरणं, त्यांना विषयबाह्य प्रश्नं विचारून लेखावर त्याखाली चाललेली चर्चा भरकटवणं असले भुरटे उद्देश असतात ह्या सावित्रीच्या नावाचं कार्ड वापरून घाण करणार्या लेकरांचे नक्कीच. आम्हांला नाही लिहायचं सावित्रीबाई फुले ह्यांच्याबद्दल. त्यांनी स्वत: सांगितलेलं होतं का, की मी हे कार्य करते आहे ह्याचा उदोउदो करूनच मग प्रत्येक लेकीबाळीने लिहावं असं.. ते आधी दाखवा मग बोला.
का उभारत राहतं सरकार नवे नवे बुरूज आणि स्मारकं पुन्हा पुन्हा ढासळण्यासाठी ? जनतेला जाणत्या राजाची गरज आहे. सारी स्थिती गोंधळलेली आहे. इतिहासाच्या त्याच त्याच त्याच त्याच पराक्रमांच्या लेण्यांवर का चढवत राहतात मोठे होऊ पाहणारे सोन्याचा कळस ? शिवाजी महाराज किंवा आणि कुणी थोर महापुरूष जन्मालाच आले नसते तर आज त्यांच्या नावाचा वापर करून मोठं होऊ पाहणारांची व आपल्या तुंबड्या भरू पाहणार्यांची तर भली पंचाईतच झाली असती. मोठं होण्यासाठी पराक्रम गाजवण्यासाठी जाणता राजा होण्यासाठी दुसर्या कुणाला सतत मोठं करत रहायचं आणि मग त्या मोठ्या मोठ्या होत चाललेल्या फुग्याच्या दोराला हात धरून वरवर जात उंच व्हायचं, असं करण्याचा महाराजांनी प्रयत्न केला नसेल. त्यांना तेवढा वेळही नसेल. मग महाराजांच्या नावावर इतक्या वर्षांनी आजही राजकारण करत - खेळत असलेल्या राजकीय पक्षांच्या पंखामधे स्वत:चं असं काही बळ आहे की नाही ? 
कोणत्याही थोर राजा, सुलतानाची, समाजसुधारकाची प्रेरणा केवळ मनात ठेऊन त्यांचे दाखले न देता धडपडता येणार नाही का ? नवा इतिहास रचण्यासाठी पेटून उठावं, काहीतरी लखलखीत स्वच्छ करावं असं तळमळीने वाटायला लावणारे हजारो गंभीर, काळे कुळकुळीत प्रश्नं देशात आहेत. या प्रश्नांमधूनही मोठं होता येईल जर तसाच अर्थस्वार्थ असेल तर. जनतेसाठी आपण काय करत आहो याचा सतत गाजावाज करून काय होणार. जनतेची बोंब होणार फक्त अजून काय ? 
रोजच्या आयुष्यात मरणार्या करोडोंना त्याच कसलं आलंय कौतुक ? रस्तावरच्या खड्ड्यांमधे विनाकारण मरतात लोकं. त्यावर आहे का काही सोल्युशन ? ट्रेनमधून प्रवास करणारा घराबाहेर पडतो तो संध्याकाळी वापस येईल का, याची गॅरंटी नसते. पगार म्हणून दोन हजाराची नोट घेऊन बाहेर पडलेल्या अती गरीब लोकांना ते खर्च कसे करावेत ते कळत नाहीये. आपल्याकडे मॉल्स आहेत. बागा आहेत, समुद्र किनारे आहेत. लागलच तर राणीच्या बागेतले वाघसिंव्ह हत्तीघोडे कांगारूशांगारू इमूशिमूपेंग्विनशेंग्विन ते आहेत.. बास झालं जनतेला इतकं मनोरंजनासाठी. 
लोकं कसं जगत असतील रोजचं आयुष्य याची काहीही फिकर न करता धडाधड योजना राबवण्याने तुम्ही आज मोठे व्हाल. कारकीर्द संपल्यावर खतम खेळ. उद्या दुसरे राजे येतील अशीच शिवाजी महाराज, टिळक, आंबेडकर, फुले, सावरकर, गांधी, नेहरू यांच्या नावांच्या ढाली घेऊन. या सगळ्यांनी काय केलं ते माहीतीये हो लोकांना.. तुम्ही यातल्या कुणाचंही नाव न घेता काय करणार ते बोला. काय खरं नाही. जनतेला नकोयत स्मारकंनफिरकं. गरीबाला भरकटवण्याचे त्यांना आशा दाखवून स्वार्थ साधण्याची कामं आहेत ही सारी.
हे सगळं त्यांना बरं वाटेल ज्यांची पोटं व्यवस्थित भरत आहेत. खरं तर शिकलेले, वाचणारे, लिहणारे, कॉलेजमधला युवावर्ग , उच्चभ्रू, उच्चशिक्षित यांना असल्या गोष्टींमधे रसही नाही. टेक्नॉलॉजी, विज्ञान, गॅजेट्स, अॅप्स हे सारं कुठल्याकुठे गेलंय.  त्यात काही नवीन आणणारे आता लोकांना हिरो वाटू लागले आहेत. लोकांना नव्या टाइपचे लीडर पाहिजेत बॉस.. हे काय.. स्मारक्स अॅण्ड ऑल. नवा शिवाजी कसा असेल? कसं असावं नव्या शिवाजीने? आजच्या काळातला तेजतर्रार लढवय्या कसा असावा? त्याच्याकडे घोडा नसेल ना तलवार. त्यापेक्षाही काहीतरी भन्नाट असेल डोळे दीपवून टाकणारं. विलक्षण. तो आहे कुठे? तो जन्माला यायला हवाय. नवा शिवाजी जन्माला यायला हवाय.

Comments

  1. मस्स्त लिहिलं आहे... हेच जर कोणी पुढारी बोलला की त्याची जात काढून त्याला बदनाम केले जाते आणि परत बोलणार नाही याची व्यवस्था सुद्धा. असे बोलणारे पुढारी जेव्हा तयार होतील आणि जे फक्त विकासावर बोलतील तेव्हा अशा स्मारकाची आणि प्रतिकांची गरज लागणार नाही निवडणुका जिंकायला आणि तेव्हाच खरा शिवाजींचा वारसा पुढे नेऊ आपण..

    ReplyDelete
  2. भन्नाट च 👍👍👍👌💐 पण आपण च मूर्ख म्हणून आपल्याला मूर्ख बनवणाऱ्यांच फावतं...

    ReplyDelete

Post a Comment